बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब होती. पण आता ती लवकरच संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारीत सिनेमात नर्गीस यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमातून ती हिंदी सिनेमात पुनरागमन करायला सज्ज झाली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. २०१२ मध्ये नवऱ्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मनीषाला आता आई बनायचे आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या माहितीनुसार मनीषा लवकरच एक मुलगी दत्तक घेणार आहे.

याबद्दल जेव्हा मनीषाला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, या डिसेंबरपर्यंत माझ्या आयुष्यात सगळे काही ठीक होईल. मी अनेक दिवसांपासून थोडी अस्वस्थ होते. पण आता सगळे काही सुरळीत पार पडत आहे. असे असतानाच एक मुलगी दत्तक घेण्याचा मी विचार करत आहे. सगळे काही सुरळीत पार पडेल अशीच आशा मला वाटत आहे. माझे आयुष्य त्या मुलीच्या अवती- भवतीच फिरावे असे मला वाटते. मी माझ्या आयुष्यातल्या या टप्यासाठी खूप उत्साही आहे आणि मी या आनंदासाठी फार काळ वाट पाहू शकत नाही.

आतापर्यंत अनेक कलाकारांनी मुली दत्तक घेतल्या आहेत. सुश्मिता सेनने दोन मुलींना दत्तक घेतले होते. तर तिच्यासोबतच रविना टंडण हिनेही वयाच्या २१ व्या वर्षी दोन मुलींना दत्तक घेतले होते. याशिवाय कुणाल कोहली, सुभाष घई, निलम, सलीम खान, मिथुन चक्रवर्ती यांनीही मुल दत्तक घेताना मुलीलाच प्राधान्य दिले होते.

संजय दत्तच्या आईचा म्हणजेच नर्गिसचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. मनीषानेही तिच्या वैयक्तिक आयुष्यात कर्करोगाशी झुंज दिली आहे. त्यामुळे नर्गिसच्या भूमिकेला मनीषा न्याय देईल असं हिरानींना वाटतंय. मनीषाबरोबर परेश रावल सुनील दत्तच्या भूमिकेत तर रणबीर कपूर संजय दत्तच्या भूमिकेत असणार आहे. तसंच दिया मिर्झा मान्यताच्या भूमिकेत दिसेल. मनीषाने आतापर्यंत संजय दत्तसोबत ‘कारतूस’, ‘यलगार’, ‘सनम’, ‘अचानक’, ‘बागी’ या सिनेमांत काम केले आहे.