बिहार ते बॉलिवूड… हा प्रवास अभिनेता मनोज वाजपेयीसाठी अजिबात सोपा नव्हता. इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय येऊन मनोज वाजपेयीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. संघर्षाच्या काळात मनात आत्महत्येचाही विचार आला, पण त्यावेळी त्याच्या मित्रांनी फार साथ दिली. बिहार ते बॉलिवूडचा हा प्रवास कसा होता, याबद्दल त्याने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
स्ट्रगलिंगचा काळ
“मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. बिहारमधल्या एका गावात पाच भावंडांसोबत मी लहानाचा मोठा झालो. एका झोपडीच्या शाळेत मी शिकलो. खूप साधं आयुष्य होतं आमचं. पण जेव्हा कधी आम्ही शहरात जायचो तेव्हा थिएटरमध्ये सिनेमा पाहायला नक्की जायचो. मी बच्चन यांचा चाहता होतो आणि मला त्यांच्यासारखं व्हायचं होतं. वयाच्या नवव्या वर्षीच मला समजलं होतं की अभिनयच माझी आवड आहे. पण स्वप्न पाहण्याची माझी ऐपत नव्हती. अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं. अखेर वयाच्या १७ व्या वर्षी मी दिल्ली युनिव्हर्सिटीत दाखल झालो. तिथे मी नाटकात काम केलं आणि हे माझ्या कुटुंबीयांना माहित नव्हतं. एकेदिवशी वडिलांना पत्र लिहून सांगितलं. तेव्हा ते रागावले नव्हते. उलट त्यांनी माझी फी भरण्यासाठी २०० रुपये पाठवले. मी कोणत्याच कामाच्या लायकीचा नाही असं गावातले लोक म्हणायचे. पण त्याकडे मी दुर्लक्ष केलं. ”
अपयश
“एनएसडीमध्ये (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) प्रवेश घेण्यासाठी मी अर्ज केला. पण तीन वेळा माझा अर्ज नाकारला गेला. मी आत्महत्या करणार होतो. मी आत्महत्या करेन की काय म्हणून माझे मित्र माझ्या बाजूलाच झोपायचे. ते मला कधीच एकटं सोडत नव्हते. माझा प्रवेश होईपर्यंत त्यांनी माझी साथ दिली. त्यावर्षी मी एका चहावाल्याच्या दुकानात असताना तिग्मांशू त्याच्या खटारा स्कूटरवर मला शोधत आला. शेखर कपूरने मला ‘बँडिट क्वीन’मध्ये भूमिकेची ऑफर दिली. तेव्हा मी मुंबईत राहायला आलो.”
मुंबईतला संघर्ष
“सुरुवातीला मुंबईत राहणं खूप कठीण होतं. पाच मित्रांसोबत मी एका चाळीत राहायचो. कामासाठी खूप शोधाशोध केली पण ऑफरच मिळत नव्हती. एका सहाय्यक दिग्दर्शकाने तर माझा फोटो फाडून फेकून दिला होता. एका दिवसात मी तीन प्रोजेक्ट गमावले होते. इतकंच नव्हे तर पहिल्या शॉटनंतर मला साफ निघून जाण्यास सांगितलं होतं. माझा चेहरा हिरोसारखा दिसणारा नव्हता. म्हणून मोठ्या पडद्यावर मी काम करू शकेन असं त्यांना वाटत नव्हतं. कधी घराचं भाडं भरण्यासाठी पैसे नसायचे तर कधी साधा वडापाव खाण्यासाठी पैसे नसायचे. पण माझ्या पोटातली भूक मला यशापर्यंत पोहोचण्याच्या भूकेला मारू शकत नव्हती. अखेर मला महेश भट्ट यांच्या टीव्ही सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी एका एपिसोडसाठी दीड हजार रुपये मिळायचे. माझ्या कामाचं कौतुक झालं आणि त्यानंतर मला ‘सत्या’ची ऑफर मिळाली.”
बिहार ते बॉलिवूड
“सत्या हा चित्रपट माझा आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. मला पुरस्कार मिळू लागले. तेव्हा मी माझं पहिलं घर विकत घेतलं. ६७ चित्रपटांनंतर आज मी इथे आहे. स्वप्न पूर्ण करायचंच असं ठरवलं तर त्या मार्गात येणारा संघर्ष महत्त्वाचा ठरत नाही. महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे त्या नऊ वर्षांच्या बिहारी मुलाचा विश्वास… बाकी काही नाही.”