अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांमध्ये उफाळलेल्या संतापावरून अभिनेता मनोज वाजपेयीने बॉलिवूड कलाकारांना सुनावलं आहे. “होय, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण बांधिल आहोत”, असं म्हणत त्याने त्यामागील कारणसुद्धा सांगितलंय. मनोज वाजपेयीने सुशांसोबत ‘सोनचिडियाँ’ या चित्रपटात काम केलं होतं.

‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज म्हणाला, “सेलिब्रिटी जर लोकांनी केलेलं कौतुक ऐकत असतील तर त्यांची टीकासुद्धा ऐकली पाहिजे. जर तुमच्याविरोधात असंतोष असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. ही लोकं जर माझा चित्रपट हिट करत असतील आणि मी त्यांना योग्य म्हणत असेन तर जेव्हा हेच लोक मला प्रश्न विचारतील, तेव्हा त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठीही मी बांधिल आहे. सरकारसुद्धा याच नियमावर चालतं.”

आणखी वाचा : प्रसाद ओक सांगतोय लॉकडाउनमध्ये उपयुक्त असा सुखी संसाराचा मूलमंत्र

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरू झाला. अनेक सेलिब्रिटींवर बंदी आणण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली.

मनोज वाजपेयीने याआधी दिलेल्या एका मुलाखतीत सुशांतच्या कामाचं कौतुक केलं होतं.  “सर्वांच्या आयुष्यात चढउतार येतात. सुशांतच्या आयुष्यातही ते आले. मला नाही वाटत की मी त्याच्या इतका प्रतिभावान आणि हुशार आहे. मी वयाच्या ३४ व्या वर्षांपर्यंत काहीच कमावलं नव्हतं. त्याच्या तुलनेत माझं यश काहीच नाही. केवळ चांगला माणूस म्हणूनच नाही तर कमी वयात स्वबळावर इतकं यश संपादन करणारा माणूस मी सुशांतला ओळखतो”, असं तो म्हणाला होता.