सेलिब्रिटी लेखक
मनवा नाईक – response.lokprabha@expressindia.com

देवपूजा करा, प्रार्थना म्हणा, पाप केलं असेल तर क्षमा मागा देवाकडे, उपास करा, देव शिक्षा करेल म्हणून घाबरा, असं काहीच मला लहानपणी माहीत नव्हतं. ‘देव’ ही संकल्पनाच मला माहीत नव्हती. आमचं पूर्ण कुटुंब नास्तिक, त्यामुळे देव म्हणजे कोण हे काहीच कळेना.

मी सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये शिकले. त्यामुळे सीनिअर केजीपासून जीझ्स ही संकल्पना कळली. शाळेत प्रेअर, मॉरल सायन्स आणि रिलिजनचा तास असायचा. मला ‘हैलमेरी’, ‘अवर फादर इन हेवन’ या प्रार्थनाही पाठ आहेत. आम्ही शाळेत ख्रिसमस पण साजरा करायचो. पण देव काय हे काही स्पष्ट नव्हतं.

एकदा मला प्रिन्सिपलने बोलावलं. शाळेच्या कॅलेंडरवर रिलिजनच्या शेजारी ‘इंडियन’ असं लिहिलं होतं दादाने (बाबा). रिलिजन ‘िहदू’ लिही असं ती ख्रिश्चन सिस्टर म्हणाली. मी घरी येऊन सांगितलं तर दादाने एक चिट्ठी दिली. ‘आम्ही सेक्युलर आहोत. रिलिजन मानत नाही. आम्ही इंडियन आहोत’ असं काहीसं त्यात होतं. ती चिठ्ठी मी शाळेत दिली आणि प्रश्न तेवढय़ापुरता मिटला.

गणपतीला मित्र मंडळीकडे आम्ही जायचो. पण तिथे जाऊन नेमकं काय करायचं मला कळायचं नाही. काय मागायचं देवाकडे, कसं मागायचं, कोण जाणे. मी गणपतीच्या आरत्या शिकले, शुभंकरोती शिकले, पण ‘देव’ हे कोडं राहिलंच.

पुढे जाऊन ‘आय िथक, देअर फॉर आय एम’ ही डेकार्टची फिलॉसॉफी कॉलेजमध्ये शिकले आणि ती पटली. देव हा एक ‘हायपोथेसिस’ असतो हेही पटलं. पण तरीही मला देव हवा होता, ज्याच्या माथी मी सगळं सोडू शकेन असा.

मी दादाला विचारलं आपण देवावर विश्वास नाही म्हणतो, तर मग देव कोणाला म्हणायचं? दादाने मला सांगितलं ‘माणसावर विश्वास ठेवायचा. माणुसकीवर विश्वास ठेव, ते सोप्पं आहे. जे दिसतं ते बाजूला सारून जे दिसत नाही त्यावर कशाला अवलंबून राहायचं? समोर जो माणूस दिसतो तो आणि त्याहून महत्त्वाची ती माणुसकी.. ह्य़ुमॅनिटी आणि गुडनेस (चांगुलपणा) हे आपले देव.. तेव्हा लक्षात आलं कीखरंच देव ही अमूर्त (अ‍ॅबस्ट्रॅक्ट) संकल्पना आहे. सर्वव्यापी आहे. माणुसकी, चांगुलपणासुद्धा अमूर्त संकल्पना आहेत. आणि अशा रीतीने, ३३ कोटींपकी पहिला देव मला सापडला.

पण दु:खात, त्रासात बरोबर मार्ग देणारा देव मी शोधत राहिले. माझ्या मनातले प्रश्न मी दादाला विचारात राहिले. युक्तिवाद करायचं स्वातंत्र्य मला होतं. ते मी पूर्ण वापरलं. चूक आणि बरोबरमधला फरक, भंपकपणा, अंधश्रद्धा, खोटं हा चुकीचा मार्ग आहे. हे मला वेळोवेळी दादाने दाखवून दिलं. खरं बोलणं, प्राण्यांवर प्रेम करणं, निसर्गाला जपणं, स्वार्थासाठी दुसऱ्याचं दु:ख विसरणं चूक असतं, हे सगळंच दादाने शिकवलं.

मी शाळेत असताना कधीच शिकवणीला गेले नाही. कुठल्याही विषयात काही समस्या असेल तर मी घरी विचारत असे. मग दादा मला शिकवायचा. बालभारतीचं पुस्तक त्याला दिलं की तो पहिल्यांदा त्या पुस्तकातल्या शुद्धलेखनाच्या चुका काढायचा. मुद्रकाने कमी दर्जाची शाई वापरली म्हणून चिडायचा. मुलांना छान, सुंदर पुस्तकं मिळावीत, त्यांना अभ्यास करताना आनंद वाटायला हवा, असं त्याचं म्हणणं होतं. महाराष्ट्र ब्युरो ऑफ टेक्स्ट बुक्सची काही पुस्तकं आमच्या िपट्रिंग प्रेसमध्ये छापली जायची. वर्षगणित पुस्तकांचा दर्जा खराब होत चालला होता. दादाने आवाज उठवला. तो मुलांसाठी आणि चांगल्या पुस्तकांसाठी लढला. त्यात त्याचा काहीच स्वार्थ नव्हता. पण तरीही तो लढला ब्युरोबरोबर, शिक्षण खात्याबरोबर. त्याने आमच्या प्रेसमध्ये ही पुस्तकं छापायचं बंद केलं. वाईट काम करणं हे त्याच्या तत्त्वात बसलं नाही.

दुसऱ्याचा विचार करणारा, स्वत:चं नुकसान झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं होऊ नये असं मानणारा, मुलांवर, शिक्षणावर, पुढारलेल्या विचारांवर प्रेम करणारा, माणुसकीचा धर्म जपणारा हाडामांसाचा माझा देव माझ्या आसपासच मला सापडला.

माझ्या आईतही ती दैवी भावना आहे. दुसऱ्याचं दु:ख तिला बघवत नाही. ती सातत्याने समाजकार्य करते. शोषित मुलं, अनाथ, पॅलॅटिव्ह केअरमधली मुलं, वेश्याव्यवसायात बांधल्या गेलेल्या, ड्रग अ‍ॅडिक्टड अशा सगळ्यांसाठी ती झटते. तिने दोन मुली दत्तक घेतल्या. ती गुजरातमधल्या दंगलीनंतर तिथे रिलीफ कॅम्पमध्ये जाऊन राहिली. तिने त्या मुलांना पपेट्स तयार करायला शिकवलं. या वर्षी ती नर्मदा बचावच्या ट्रान्सिट कॅम्पमधल्या मुलांना विनामूल्य शिकवायला गेली होती. आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्यालाही सुख देणं तिला गरजेचं वाटतं. लहान मुलांचं दु:ख तिला बघवत नाही. आपण समाजाचं देणं लागतो असं ती म्हणते. या देण्याच्या प्रक्रियेवर प्रेम करण्याला, दुसऱ्याबद्दल काहीतरी वाटणाऱ्यांलाच तर देव म्हणतात.. इथे मला विं.दा. करंदीकर यांच्या दोन ओळी खूप प्रकर्षांने आठवतात.

‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे,
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे.’

आजच्या जगात माणुसकीची गरज मला जास्त भासते. कारण असं म्हणतात की चांगली माणसं जास्त आहेत म्हणून जग चालत आहे. माणसात आणि माणुसकीत मला माझे देव सापडले… खरेखुरे!!