जितेंद्र जोशी हे नाव कोणत्याही प्रेक्षकाला नवीन नाही. मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. मालिका, नाटक, चित्रपट किंवा वेब सीरिज प्रत्येक माध्यमामध्ये तो अभिनयातून व्यक्त झाला आहे. त्यामुळेच आज त्याचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अभिनय म्हणजे कायदेखील जितेंद्रला माहित नव्हतं. ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्याने याविषयी खुलासा केला आहे.

शालेय जीवनात असल्यापासून जितेंद्रला अभिनय करण्याची आवड होती. मात्र, नेमका अभिनय म्हणजे हे त्याला ठाऊकच नव्हतं. इतकंच काय तर वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंत नाटक म्हणजे काय असतं हेदेखील त्याला माहित नव्हतं. विशेष म्हणजे वयाच्या १६-१७ व्या वर्षापासून जितेंद्रने नाटकात काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये रंगलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरविषयी अनेक खुलासे केले असून काही रंजक किस्सेदेखील सांगितले आहेत.