मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय म्हणून अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झालेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या माध्यमातून शशांक घराघरात पोहोचला आणि तुफान लोकप्रिय झाला. या मालिकेतील त्याची श्री ही भूमिका कोणीही विसरणं शक्य नाही. परंतु, या मालिकेनंतर त्याचा छोट्या पडद्यावरील वावर कमी झाला. मात्र, आता शशांक पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अभिनयामुळे आणि कूल लुकमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा श्री अर्थात शशांक लवकरच ‘पाहिले न मी तुला’ मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या मालिकेत शशांक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, त्याची भूमिका नेमकी कशी असेल हे मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत शशांकसोबत अभिनेता आशय कुलकर्णी स्क्रीन शेअर करणार आहे. तर तन्वी मुंडले ही नवोदित अभिनेत्री या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.