23 October 2019

News Flash

Video : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सईने केलं श्रमदान करण्याचं आवाहन

सईने चाहत्यांना श्रमदानाचं महत्व पटवून देणारा व्हिडिओ शेअर केला आहे

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या चाहत्यांना मातृभूमीसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केले आहे. १ मे रोजी सई ताम्हणकर श्रमदान करायला जाणार असून तिने आपल्या चाहत्यांनाही श्रमदानाचे महत्व पटवून देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून अपलोड केला आहे.

पाणी फाउंडेशनच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्र पाणीटंचाईविरहित करण्यासाठी योगदान देणारी सजग अभिनेत्री सई ताम्हणकर यंदाही महाराष्ट्रदिनी श्रमदान करणार आहे. सध्या आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या सईने महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही श्रमदानात सहभागी व्हायला सांगितले आहे.

सूत्रांच्या अनुसार, श्रमदान करण्याचे सईचे हे पाचवे वर्ष आहे. सई न चुकता दरवर्षी महाश्रमदानात भाग घेते. पाणी फाउंडेशनच्या श्रमदानाशिवाय वर्षभर होणा-या कार्यक्रमांनाही सई आवर्जून सहभागी होते.

“पाण्याअभावी रणरणत्या उन्हात तडफडणा-या गुराढोरांसाठी, पाण्याच्या शोधात बालपण हरवलेल्या लहान मुलांसाठी, डोक्यावर हंडे ठेवून पायपीट करणा-या बायकांसाठी, आणि करपणा-या शेतांसाठी मी या महाराष्ट्रदिनी कुदळ-फावडे घेऊन श्रमदान करणार आहे. मी माझ्या पध्दतीने खारीचा वाटा उचलणार आहे. आपणही सहभागी व्हा,” असं आवाहन सईने चाहत्यांना केलं आहे. दरम्यान, यापूर्वी अभिनेत्री स्पृहा जोशीनेदेखील काही दिवसांपूर्वी चाहत्यांना श्रमदान करण्याचं आवाहन केलं होतं.

First Published on April 22, 2019 6:58 pm

Web Title: marathi actress sai tamhankar suggest his fan to do hard work