वादग्रस्त टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाचा मराठमोळा अंदाज सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कलाकारांचा कोणताही मुखवटा नाही, कोणतंही पात्रं रंगवण्याची जबाबदारी नाही. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने कलाकारांचा खराखुरा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस मराठीला सुरुवात झाल्यापासून ते आतापर्यंत या कार्यक्रमात बरीच रंजक वळणं आली. वाइल्ड कार्ड एंट्री म्हणू नका, थत्तेगिरी म्हणू नका किंवा मग राजेश आणि रेशम यांच्यामध्ये असणारी मैत्री म्हणू नका. प्रत्येक कारणामुळे या कार्यक्रमाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा या घरात आणखी एका सदस्याची एंट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मलिका आणि चित्रपटातील आपल्या अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरात येणार आहे. तिच्या येण्यामुळे आता या घरातील समीकरणं बदलणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, गेल्याच आठवड्यात वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून या घरात हर्षदा खानविलकरचा प्रवेश झाला होता. हर्षदाच्या लोकप्रियतेचा फायदाही बिग बॉसला झाला.

वाचा : प्रवासखर्च कमी करण्याच्या सोप्या टिप्स

टीआरपीच्या बाबतीत याच रणनितीचा अवलंब करत आता शर्मिष्ठाच्या लोकप्रियतेचा बिग बॉस मराठीच्या घराला किती फायदा होतो, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या घडीला बिग बॉसच्या घरात विविध टास्क आणि कलाकारांमध्ये असणारे मतभेद चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातही या घरातून बाहेर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काही गोष्टींचा खुलासा होत असल्यामुळे, अरेच्चा हे असं होतं तर…. अशी थक्क करणारी प्रतिक्रियाही प्रेक्षक देत असल्याचं पाहायला मिळत आहे.