प्रतिनिधी

करोना संकटाच्या काळात आज गणपत्ती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. म्हणूनच या काळातही प्रत्येक गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचं दिसून येत आहे. परंतु, यंदा सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे. यात अभिनेत्री श्रेया बुगडे हिच्या घरी बाप्पाचं आगमन झालं असून करोनाचं संकट लवकर टळू दे अशी विनवणी तिने बाप्पाकडे केली आहे.

“माझ्या सासरी पुण्याला गणपती येत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आम्ही मुंबईतल्या घरी गणपती बसवत आहोत. या दीड दिवसाच्या कालावधीत रोज ५००-६०० लोकांचा राबता असतो. त्या गडबडीत गणपतीची पूजाअर्चा याकडे थोडं दुर्लक्ष होतं. त्यामुळे, आम्ही यंदा प्रथमच पाच दिवस गणपती बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी करोनामुळे नातेवाईक आणि मित्रपरिवाराला आमंत्रण दिलं नाही. चित्रीकरणाला सुट्टी असल्याने गणपतीसाठी साग्रसंगीत नैवेद्य, पूजाअर्चा, आरास, सजावट याकडे विशेष लक्ष देईन. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर नुकतंच थुकरटवाडीच्या गणपतीचं आगमन झालं. एका विशेष गाण्याने आम्ही गणपतीचं स्वागत केलं. जगावरील करोनाचं संकट लवकर टळू दे आणि सर्वाना उत्तम आरोग्य मिळू दे, ही प्रार्थना देवाकडे केली. लवकरच प्रेक्षकांना हे भाग पाहता येतील. करोनामुळे उद्भवलेल्या संकटाच्या परिस्थितीत गणपतीचं आगमन हे सर्वासाठीच आशेचे किरण ठरेल. गणरायाच्या आगमनामुळे समाजात चैतन्य आणि सकारात्मकता निर्माण होईल. यंदाचा गणेशोत्सव होईल की नाही याविषयी मार्चमध्ये शंकाच वाटत होती. मात्र, सरकारने राबवलेल्या सुरक्षा योजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वर्षांच्या अखेरीस दैनंदिन जीवन पूर्वपदावर येईल, अशी आशा आहे”, असं श्रेया म्हणाली.

पुढे ती म्हणते, “माझ्या आजोळी अलिबागला मोठय़ा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो. लहानपणी इंग्रजी माध्यमात असल्याने मला गणपतीची विषेश सुट्टी मिळायची नाही. तेव्हा पाच-सहा दिवस शाळेला दांडी मारून मी अलिबागला राहायला जात असे. तिथे भावंडांबरोबर पत्ते, गाण्यांच्या भेंडय़ा खेळत रात्र जागवली जात असे. या गोष्टींची आठवण येते. सण उत्सवाच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या बाजारीकरणाला माझा विरोध आहे”.

सौजन्य : लोकप्रभा