मितेश जोशी

गणेशोत्सवाचे वारे सध्या सर्वत्र जोशात वाहत आहेत. आपल्या लाडक्या कलाकार मंडळींच्या घरातसुद्धा गौरी-गणपती विराजमान होतात. शूटिंगच्या वेळा सांभाळून, मखर, सजावट ते नैवेद्यापर्यंतची त्यांची उडणारी तारांबळ, गणेशोत्सवाच्या आठवणी व गणेशोत्सवासंबंधीची त्यांची मते त्यांच्याच शब्दात..

‘कुकरची पहिली शिट्टी ५.१५ वाजता’

माझं सासर पुण्यात सदाशिव पेठेत. त्यामुळे इथे गौरीगणपतीचा निराळाच थाटमाट बघायला मिळतो. माझ्या माहेरीसुद्धा गौरीगणपती असतात. त्यामुळे मला सासरी आल्यावर नवीन काही शिकून रुळण्याचा संबंध आला नाही. माझ्या माहेरी मी दहावी पास होईपर्यंत आम्हा भावंडांचा एक वेगळा छोटा गणपती बसायचा. मोठय़ांसोबत आमची उगाच स्पर्धा चालायची. आमचं मखर वेगळं, नैवेद्याचं ताट वेगळं, सगळं वेगळं असायचं. माझ्या लहानपणापासून गणपतीत एक दिवस घरी सहस्रावर्तन होतात. त्या दिवशी उकडीचे मोदक, मसाला दूध आणि मिसळीचा बेत असतो. सासरी उभ्या गौरी असतात. गौरी पूजनाचा दिवस हा काही वेगळाच असतो. परवा शुक्रवारी सासरी पहाटे ५.१५ वाजता पहिली कुकरची शिट्टी वाजली. तऱ्हेतऱ्हेच्या गोड पदार्थानी व भाज्यांनी ताट भरून जातं. सासूबाईंनी आणि मी पदार्थ वाटून घेतले आहेत. सदाशिव पेठेत घर असल्याने रात्री आरतीला बाहेर मोठमोठय़ा आवाजात वाजणाऱ्या गाण्यांची साथ असते, त्यामुळे आम्ही रात्रीची आरती हल्ली संध्याकाळीच भक्तिमय वातावरणात करून घेतो.

आरती वडगबाळकर

‘३७ वर्षांची परंपरा’

आमच्या घरी गेले ३७ र्वष पारंपारिक वरदहस्त असलेला गणपती आणला जातो. माझे आजोबा माझ्या बाबांना पूजा सांगायचे. आता माझे बाबा मला सांगतात. तीन पिढय़ांचा वसा मी याचि देही याचि डोळा पाहिला आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरला असतं, मात्र गणपतीच्या निमित्ताने सहा दिवस सुट्टी काढून आवर्जून मी ठाण्याला घरी येतो. गेले ३ र्वष मालिका सुरू आहे. मात्र  एकदाही मी गणेशाचा हा उत्सव चुकवलेला नाही. टिळकांनी या व्रताला सार्वजनिक रूप दिलं. आमचा गणपती सार्वजनिक जरी नसला तरी दरवर्षी शेकडो नातेवाईक, मित्रपरिवार यानिमित्ताने घरी एकत्र येतात.

हार्दिक जोशी

‘आईच्या हातांची किमया’

मुंबईत घर घेतल्यापासून मी गणपती बसवायला सुरुवात केली. यंदाचं हे चौथं र्वष आहे. मागच्या तीन वर्षांप्रमाणेच यंदासुद्धा माझ्या आईने घरी स्वत: शाडूच्या मातीची मूर्ती बनवली. आई शाडूच्या मातीची मूर्ती चिंचवडच्या घरी बनवते आणि त्याची स्थापना कांदिवलीच्या घरात होते. त्यामुळे चिंचवड आणि मुंबईतील दोन्ही घरांशी गणपती जोडला गेला आहे. माझ्या घरी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जातो. सजावटसुद्धा पर्यावरणपूरक, पुनर्वापर करता येईल, अशीच असते. दीड दिवस गणपती असतो, दर्शनासाठी आमच्या घरी भरपूर लोक येतात. मी तितका धार्मिक नसलो तरीही गणपतीशी माझं एक वेगळंच नातं आहे. वर्षभरात मी जेवढी साधना करत नाही तेवढी वर्षभराची कसर या दीड दिवसांत भरून निघते. गणपतीचं विसर्जनसुद्धा पर्यावरणपूरक पद्धतीनेच केले जाते. माझ्या घरात असलेल्या मोकळ्या भागात आम्ही बादलीत मूर्तीचं विसर्जन करतो. त्यासाठी फुलांची सजावट केलेली असते. बादलीतही गुलाबपाणी, अक्षता आणि फुलं असतात. विसर्जन झाल्यावर, बाप्पाची मूर्ती पाण्यात विरघळल्यानंतर त्याच शाडूच्या मातीने आम्ही दरवर्षी एक हत्तीची प्रतिमा बनवतो. आणि ते हत्तीचं गोंडस रूप आमच्या घरी ठेवतो. यावरून एक कळतं की गणरायाच्या मूर्तीची कुठेही विटंबना झालेली नाही. आपल्यामुळे पर्यावरणाला कुठेही त्रास झालेला नाही, हा विचार मनाला सुखावून जातो. गणेशाकडे मी कधीच काहीही मागत नाही. कारण तो जे देतो, ते माझ्या चांगल्यासाठी आहे, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आपण मात्र १००  टक्के प्रयत्न करायचा, हे लक्षात ठेवून मी आयुष्यात पुढे चालतो आहे. गणपतीनेच दाखवलेला हा मार्ग आहे आणि त्याच्यामुळेच मी नव्या जोमाने काम करू शकतो.

भूषण प्रधान

‘बाबांकडून प्रेरणा’

मी, माझे बाबा व माझा भाऊ  आम्हा तिघांनाही चित्रकलेची खूप आवड! गेल्या सहा वर्षांपासून माझे बाबा घरचा गणपती स्वत: तयार करतात. पहिल्या वर्षी जेव्हा बाबांनी गणपती तयार केला तेव्हा माझ्या मनात आलं की बाबा जर या वयात अवघड मूर्तिकाम करू शकतात तर मी का नाही करू शकत? लगेचच दुसऱ्या वर्षांपासून त्यांच्याकडून प्रेरणा घेत मीदेखील मूर्ती घडवू लागलो. सलग ३ र्वष मी घडवलेला गणपती माझी आत्या तिच्या घरी प्रतिष्ठापनेला न्यायची. यंदाच्या वर्षी चित्रीकरणातून वेळ काढणं कठीण झाल्याने मूर्ती घडवणं शक्य झालं नाही. आमच्या घरातली मूर्ती ही शास्त्राचा आधार घेत एक फुटाची असते. अशा या मंगलमूर्तीला साजेसे नाजूक व रेखीव दागिने आम्ही घालतो. पूर्वापार चालत आलेल्या शिसवीच्या देव्हाऱ्यातच गणरायाची स्थापना होते. त्यामुळे सजावटीसाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. दर गणेशोत्सवातला पहिला दिवस हा मुद्दाम मी घरीच घालवतो. तर शेवटचा दिवस कलावंत ढोल-ताशा पथकासोबत घालवतो.

सौरभ गोखले

‘अमृतमहोत्सवी परंपरा’

बिग बॉसच्या घरातून बाहेर येत नाही तर लगेच पुढय़ात गणेशोत्सव आला. माझ्या माहेरी दहा दिवस गौरीगणपती असतात. माझे आजोबा मूर्तिकार असल्याने ते आजही घरच्या गौरी स्वत: घरी बनवतात. चार-पाच तास एका जागेवर बसून ते काम पूर्ण करतात. ७५ वर्षांहून अधिक परंपरा असल्याने मला माहेरच्या गणपतीची ओढ जास्त आहे. आजोबांनी त्यांच्या कलाकुसरीतून तयार केलेल्या गौरी मी लहानपणापासून सजवत आली आहे. सासरीसुद्धा गौरीगणपती असतात.मी दरवर्षी एक सण सामाजिक संस्थांसोबत साजरा करते. गेल्या वर्षी गौरी पूजनाला मी ‘इच्छा माझी पूर्ण करा’ या उपक्रमांतर्गत कर्करोग, एच.आय.व्ही.ग्रस्त मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या. एक वर्ष रुग्णालयातल्या परिचारिकांसोबत हळदीकुंकू केलं होतं. मला माणसांत देव शोधायला आवडतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझं समाधान.

नेहा शितोळे

‘मुलतानी मातीचा गजानन’

लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं ते समाज जागृतीसाठी. मी दरवर्षी पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करते. गेल्या वर्षी ट्री-गणेशा आला. यंदाच्या वर्षी मी मुलतानी मातीची मूर्ती घरी आणली. जी हळदी कुंकवाने रंगवलेली होती. मला जिथे जिथे प्रमुख पाहुणे म्हणून गणेशोत्सवात बोलावतात तिथे तिथे जाऊन समाजप्रबोधन करण्याचा माझा प्रयत्न असतो. गणेशोत्सवाचे दिवस हे मला खूप आवडतात. मला वाटतं गणेशोत्सव हा पूर्वापार चालत आलेला असा सण आहे जो तुमच्या मनाला आनंद देतो, रोजच्या धबडग्यातून चार क्षण विश्रांतीचे, थोड मोकळेपणाने आणि एकत्रित जगण्यासाठी देतो. एकमेकांना भेटण्यासाठी श्रद्धेच्या माध्यमातून का होईना वेळ काढला जातो, हे मला महत्त्वाचे वाटते.

मेघा धाडे

‘गणपती सतत बरोबर असतो’

मी मूळचा नाशिकचा असल्यामुळे नाशिकमध्ये नवश्या गणपती म्हणून गणपतीचं मंदिर आहे. नाशिकमध्ये असताना मी नेहमी तिथे जायचो. आता जेव्हा कधी मी नाशिकला जातो, तेव्हा मी आधी त्या मंदिरात जातो, त्यामुळे आमचं नातं खास आहे, असं मी म्हणेन. गणपतीच्या सगळ्याच मूर्ती मनाला भावतात. आमच्याकडे दोन गणपती बसवले जातात. एक माझ्या घरात आणि दुसरा माझ्या हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमधील गणपती दहा दिवसांचा असतो, परंतु माझ्या घरातील गणपती हा वर्षभर असतो. त्याची वर्षभर पूजा होते. म्हणजेच मागच्या वर्षी आणलेली गणेशमूर्ती आम्ही या वर्षी विसर्जित करतो आणि या वर्षी आणलेला गणपती आम्ही पुढच्या वर्षी विसर्जित करणार. त्यामुळे गणपती माझ्या सतत बरोबर असतो. गणपतीत आवडीची गोष्ट म्हणजे मोदक आणि करंजी खूप खायला मिळते. हॉस्पिटलमधील गणपतीची तिथले कर्मचारी आणि रुग्ण मनोभावे पूजा, आरती करतात. मी इको फ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्याला प्राधान्य देतो.

सुयोग गोऱ्हे

अभिनेत्री स्मिता तांबेकडेही दरवर्षी गौरी-गणपतीचा सण उत्साहात साजरा केला जातो. स्मिताचे पती घरीच गणपतीची मूर्ती घडवतात. आणि गणपतीच्या मूर्तीसह गौरीला सजवण्याचे, रंगवण्याचे काम स्वत: स्मिता करते. या वर्षीही तिने गौरीसाठी खास तयारी केली. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मिळणारे खणाचे कापड तिने गौरीसाठी विकत घेतले होते. या खणांच्या साडय़ा करून त्या तिने गौरीला नेसवल्या.