सुबोध भावे ‘प्रा. जहागीरदार’ तर अभिनेत्री राजश्री लांडगे ‘मंजुळा’
लोकप्रिय ठरलेल्या आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात ‘मानाचे पान’ निर्माण केलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘नटसम्राट’ या दोन नाटकांवर आधारित चित्रपटांना अमाप लोकप्रियता आणि रसिकमान्यता मिळाली. मराठीतील लोकप्रिय नाटकांवर आधारित चित्रपट तयार करण्याचा हा कल आता ‘ती फुलराणी’च्या निमित्ताने पुढे सुरू राहणार आहे. ‘ती फुलराणी’ हे नाटक आता रुपेरी पडद्यावर सादर होणार आहे.
आगामी ‘ती फुलराणी’ चित्रपटात अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावे ‘प्रा. जहागीरदार’ भूमिकेत, तर अभिनेत्री राजश्री लांडगे ‘मंजुळा’च्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य अमोल शेटगे यांनी उचलले आहे. ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य टिळक’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटांतील ‘सदाशिव’नंतर सुबोध भावे ‘ती फुलराणी’मधील ही महत्त्वाची व लोकप्रिय भूमिका साकारणार आहे.
जॉर्ज बनॉर्ड शॉ लिखित ‘पिग्मॅलियन’ हे नाटक, त्यावर आधारित ‘माय फेअर लेडी’ हा इंग्रजी चित्रपट पूर्वी येऊन गेला. मुळात हा विषयच आव्हानात्मक असून मानवी भावभावनांचा खेळ यात आहे. विषय भावनाप्रधान व सखोल आहे. नाटकावरून चित्रपट तयार करण्यासाठी म्हणून जे काही स्वातंत्र्य घ्यावे लागते ते घेऊन सध्या यावर काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सुबोध भावे उत्तम अभिनेता आहे. त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि निरागसता आहे.
तो ‘प्रा. जहागीरदार’ या भूमिकेला न्याय देईल असे वाटल्यानेच या भूमिकेसाठी त्याची निवड केल्याचे दिग्दर्शक अमोल शेटगे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

थोडा नाटकाचा इतिहास
पु. ल. देशपांडे लिखित ‘ती फुलराणी’ या नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहासात घडविला. जॉर्ज बनॉर्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या मूळ नाटकाला ‘पुलं’नीं अस्सल मराठी साज चढवला. भक्ती बर्वे (मंजुळा)आणि सतीश दुभाषी (प्रा. जहागीरदार) यांच्या प्रमुख भूमिका यात होत्या. या नाटकात पुढे सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष यांनी ‘मंजुळा’ साकारली आणि आता हेमांगी कवी ‘मंजुळा’ सादर करत आहेत, तर संजय मोने, अविनाश नारकर यांनी ‘प्रा. जहागीरदार’ साकारला.