जगभरात साजरा होणाऱ्या विविध चित्रपट महोत्सवांपैकी ‘बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट’ महोत्सवाला अतिशय मानाचे स्थान आहे. याच महोत्सवामध्ये अक्षय इंडीकर यांच्या ‘स्थलपुराण’ या आगामी चित्रपटाची करण्यात आली आहे. २० फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान हा चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. यापूर्वी ‘स्थलपुराण’ व्यतिरिक्त ‘सामना’, ‘विहीर’, ‘किल्ला’ आणि ‘सैराट’ हे केवळ चार मराठी चित्रपट या चित्रपट महोत्सवात झळकले होते.

या चित्रपट महोत्सवामध्ये आपल्या चित्रपटाची निवड व्हावी यासाठी प्रत्येक होतकरु दिग्दर्शक धडपड करत असतो. त्यातच अक्षयच्या चित्रपटाची या महोत्सवात निवड होणं ही त्याच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. बर्लिन चित्रपट महोत्सवापूर्वी ‘एशियन न्यु टॅलेंट अवॉर्ड’ आणि ‘टॅलिन ब्लॅक नाईट फिल्म फेस्टिवल’ चित्रपट महोत्सवांमध्येही त्याचा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

या चित्रपटातून एका लहान मुलाचं मनोगत मांडण्यात आलं आहे. शहरात वाढलेला दिगू त्याच्या आई आणि बहिणीसोबत कोकणात येतो. शहरातून एका गावात स्थलांतर झाल्यानंतर तेथील भरपूर पाऊस, समुद्राची उत्कट आणि उदास पार्श्वभूमी, आणि भोवतालच्या साऱ्या गलबलाटात त्याचे वडील अचानक अदृश्य होतात. त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न हे या चित्रपटाचं मध्यवर्ती कथानक आहे.

“आपल्या मातृभाषेत केलेली एखाद्या चित्रपटाची निर्मिती ही खरी निर्मिती असते. चित्रपट हा स्वप्नासारखा असला पाहिजे, अंतरंगामध्ये डोकावणारा. तुम्ही ज्या भाषेत स्वप्न बघता त्याच भाषेतच चित्रपट असला पाहिजे तर तो काळजाला भिडतो”, असं अक्षय इंडीकरने सांगितलं. अक्षयने ‘त्रिज्या’, ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.