सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत असतो. अनेकदा सद्य परिस्थितीवर लोक आपआपली मतं मांडत आणि काही अंशी लादत असतात. कलाकार आणि राजकारण्यांना या गोष्टीचा सर्वात मोठा फटका बसतो. सर्वात जास्त ट्रोल हे त्यांनाच केले जाते. सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमावर सोशल मीडियावर ज्या पद्धतीने भाष्य केले जात आहे, तसाच काहीसा प्रकार आता मराठीतील एका सिनेमाबाबतीतही होताना दिसत आहे. दीपक पाटील दिग्दर्शित ‘बारायण’ या सिनेमाला सध्या नेटकरांनी आपले लक्ष केले आहे.

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘बारायण’ सिनेमात इतिहासाची मोडतोड करुन संगमेश्वर येथे गणोजी शिर्केंनी शंभुराजांना पकडून मुकरबखानाच्या ताब्यात दिल्याचा प्रसंग दाखविण्यात आला आहे. या सिनेमात गणुजी शिर्के यांच्याबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात असून, तो आक्षेपार्ह भाग वगळावा आणि दिग्दर्शकाने माफी मागावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सोशल मीडियावरुन करण्यात आला आहे.

दरम्यान दिग्दर्शकाने विश्वास पाटील यांच्या ‘संभाजी’ या कादंबरीतील माहितीच्या आधारे ते दृश्य सिनेमात घेतल्याचे स्पष्ट केले. ‘बारायण’ सिनेमात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत, मराठा क्रांती मोर्चाच्या ट्विटर हॅण्डलवरुन त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘या सिनेमातून खोटा इतिहास पसरवला जात आहे, हे गंभीर आणि निषेधार्ह आहे,’ असे ट्विट मराठा क्रांती मोर्चाच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.

‘बारायण’ची ही कथा आहे बारावीत शिकणाऱ्या अनिरुद्धची. अन्य पालकांप्रमाणे याही कुटुंबाच्या अनिरुद्धकडून खूप अपेक्षा आहेत. तो यशस्वी व्हावा म्हणून सगळेजण आपापल्या परीने अथक प्रयत्न करत आहेत. त्याने काय व्हावे हे प्रत्येकाने मनोमन ठरवलेले आहे. पण शांत आणि अबोल अनिरुद्ध कुटुंबाच्या, नातेवाईकांच्या अपेक्षांखाली पुरता दबलेला आहे. ‘तुला काय व्हायचंय..?’, हा प्रश्न आपला समाज आणि शिक्षणव्यवस्था बहुतेकदा मुलांना विचारतच नाही. अशातच अनिरुद्धला बारावीत कमी गुण मिळतात आणि त्याच्या कुटुंबाच्या स्वप्नांचे मनोरे ढासळतात, पण तरीही खचून न जाता तो आपली वाटचाल सुरूच ठेवतो. त्याला त्याची आवडीची वाट सापडते का? तो ती ओळखतो का? बारावी ही संधी नक्कीच आहे पण शेवटची का..?, या आणि अशा अनेकविध विचारांच्या प्रवासाची कहाणी म्हणजे हा सिनेमा आहे.