शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून उलगडण्यात आला. १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमी कालावधीमध्ये तुफान लोकप्रियता मिळविली. विशेष म्हणजे आता या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘मराठा लाइट इन्फान्ट्री’च्या अर्काइव्हमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे.

‘फत्तेशिकस्त’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, गनिमीकावा, युद्धापूर्वीची शिस्तबद्ध तयारी, शत्रूची इत्तंभूत माहिती मिळवून त्याला कोंडीत पकडण्याची कला आणि सहकाऱ्यांच्या मदतीने गनिमावर विजय संपादन करण्याचा ध्यास या गोष्टींचं अत्यंत बारकाव्यानिशी चित्रपटामध्ये सादरीकरण करण्यात आलेलं आहे. ‘मराठा लाइट इन्फान्ट्री’मध्ये सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक जवानाला छत्रपती शिवरायांची युद्धनीती प्रेरणा देणारी ठरणारी आहे. आजही जगभरातील बलाढ्य राष्ट्र ज्यांची नीती युद्धात वापरत आहेत त्या शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास मराठा बटालियनमधील सैनिकांना व्हावा या हेतूनं ‘मराठा लाइट इन्फान्ट्री’च्या अर्काइव्हमध्ये ‘फत्तेशिकस्त’ समाविष्ट करण्यात येणार आहे.

‘मराठा लाइट इन्फान्ट्री’ हे भारतीय सेनेतील सैन्यदलातील सर्वात जुनं सैन्यदल आहे. १७६८ मध्ये स्थापन झालेल्या या सैन्यदलाची ओळख सुरुवातीला ‘ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण’ अशी होती. १८०२ च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. लाइट इन्फान्ट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करणारी पलटण. बेळगावमध्ये असलेल्या या ‘मराठा लाइट इन्फान्ट्री’च्या प्रशिक्षण केंद्रातील अर्काइव्हमध्ये ‘फत्तेशिकस्त’चा समावेश करण्यात येण्यामागे एक विशेष कारण आहे.

‘फत्तेशिकस्त’च्या यशाची आजवर कधीही समोर न आलेली बाजू म्हणजे बेळगावमध्ये जवळपास ४ हजार भारतीय जवानांनी हा चित्रपट पाहिला होता. सैन्यदलाचं प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेट्ससोबतच सैन्यदलातील अधिकाऱ्यांनीही ‘फत्तेशिकस्त’चं कौतुक केलं. हा चित्रपट त्यांना इतका भावला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं दर्शन घडवणारा ‘फत्तेशिकस्त’ आपल्या अर्काइव्हमध्ये असावा असा निर्णय ‘मराठा लाइट इन्फान्ट्री रेजिमेंट’नं घेतला आहे.

वाचा : Video : गुंतागुंतीच्या नात्यांचा ‘मन फकिरा’

लौकिक आणि अलौकिक पातळीवर यशस्वी झालेला, दिग्गज दिग्दर्शकांनी नावाजलेला, तिकीटबारीवर यश संपादन केलेला हा चित्रपट बेळगावच्या द ‘मराठा लाइट इन्फान्ट्री’ रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर गोविंद कलवाड ,डेप्युटी कमांडंट कर्नल पी. एल. जयराम, बेळगावचे समशेर बहाद्दूर हरोलीकर सरकार श्रीमान रमेश केशवराव रायजादे, सेनाखासखेल सत्यशीलराजे दाभाडे आदींच्या प्रयत्नांमुळे ‘मराठा लाइट इन्फान्ट्री’मध्ये समाविष्ट होणार आहे.

निर्माता अजय आरेकर – अनिरुद्ध आरेकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून, त्यांना मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी, नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके, हिंदीतील अनुप सोनी या मातब्बर कलाकारांची साथ लाभली आहे.