‘होम स्वीट होम’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. त्यानिमित्ताने लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषीकेश जोशी, सुमीत राघवन, अभिनेत्री विभावरी देशपांडे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली. आपापल्या संकल्पनेतील घराविषयी, घराच्या ओढीने फुलणाऱ्या नातेसंबंधांविषयी आणि एकूणच लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाविषयी त्यांनी मनमोकळी मतं यावेळी मांडली.

होम स्वीट होम चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनेता अशी तिहेरी जबाबदारी ऋषीकेश जोशी यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची कथाकल्पना समजावून देताना मध्यमवर्गीय कुटुंब आणि घर ही संकल्पना असे काही संदर्भ डोक्यात होते. घर विकत घेण्याचा किंवा घर बनवण्याचा संघर्ष हा चित्रपटाचा विषय नाहीये, तर माणसाच्या आयुष्यात घराचं मुळातच काय स्थान असतं, प्रत्येक माणसाची जडणघडण ही तो कुठल्या वास्तूत वाढलाय, त्यावर अवलंबून असते. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी कशा घरात रहायला हवं आहे. पहिलं घर घेण्याचं त्याचं स्वप्न असतंच, पण ते स्वप्न कधी संपत नाही. प्रत्येकजण स्थलांतरित होतच असतो. तीन—चार पिढय़ा एका घरात वाढल्या तरी पुढच्या पिढीला वेगळ्या ठिकाणी जाण्याची आस असते. घराशी जोडल्या गेलेल्या या भावभावनांचा पट या चित्रपटात पहायला मिळेल, असं त्यांनी सांगितलं. रीमा लागू आणि मोहन जोशी यांच्या व्यक्तिरेखांभोवती ही कथा फिरते, पण एका प्रातिनिधिक घराची ही गोष्ट आहे. त्या घरात या जोडप्याबरोबर पेईंगगेस्ट, त्यांची कामवाली, एक इस्टेट एजंट असे सगळे आहेत. घर ही जागा एकच, पण प्रत्येकासाठी ती जागा वेगळी असते. त्यामुळे घराच्या निमित्ताने माणसांची, आणि माणसांच्या निमित्ताने घराची ही गोष्ट आहे, असं ते म्हणतात. घर हा विषयच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अनुभवातून भिडतो हे सांगताना त्यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने आलेला अनुभव सांगितला. घरामुळे नाती बनतात आणि नात्यांमुळे घराला घरपण येतं. ती जागा नक्की माणसाच्या आयुष्यात काय परिणाम करत असते, याची ही गोष्ट. नुकताच या चित्रपटाचा एक शो झाला. तेव्हा खेडेगावातून आलेला एक सहाय्यक दिग्दर्शक मुलगा म्हणाला,  सारखं घर बदलण्याची आमच्यावर वेळ येत नाही, पण कधीतरी घर बदलण्याची वेळ येते. आमचं घर बदललं तरी माझे आजोबा आजही त्या विकलेल्या घरात, तिथे राहणाऱ्या माणसांना विनंती करतात आणि तिथे जाऊन झोपतात.

दिग्दर्शक म्हणून विषय मांडताना ज्या परीप्रेक्ष्यात मी वाढलो, ते सांगणं सोपं आहे, असं ते म्हणतात. शहरी वातावरणात वाढलेले उगाचच ग्रामीण चित्रपट करतात, नागराज यांनी सैराट केला याचं कारण तो तिथे जगलेला आहे, असं मत त्यांनी मांडलं. नाटक की चित्रपट माध्यम जास्त भावतं, या प्रश्नावर उत्तर देताना नाटक हे माझं आवडतं आणि सगळ्यात आव्हानात्मक माध्यम आहेच, पण चित्रपट माध्यमाची आव्हानं वेगळी आहेत, असं त्यांनी सांगितलं. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, दिग्दर्शक टेबलवर ठरवू शकतो, त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, काय नाही. एखादं दृश्य आहे, त्यात सगळे बोलतायेत, पण त्यातून कोणाकडे लक्ष वेधायचं आहे, हे दिग्दर्शक ठरवतो. कारण लेखन, कलाकारांची निवड, चित्रिकरण, संकलन असे त्याचे टप्पे आहेत, असे ते म्हणाले. हा चित्रपट एका इमारतीत चौथ्या मजल्यावरील घरात घडतो, त्याला उद्वाहक नाही. नंतर टॉवरमध्ये रहायला जायचं स्वप्न असं त्या गोष्टी, सोपानचंही मोठं घर घ्यायचं स्वप्न आहे, अशी एखादी इमारत आणि त्याच्यामागे टॉवर असं स्थळ मिळणं कठीण होतं. चित्रिकरण निश्चित झाल्यावर मग प्रत्यक्ष घराचा एक वेगळा सेट उभारला होता. त्यात बराचसा चित्रपट घडतो. पण चित्रिकरण करताना अनेक गोष्टी घडत असतात, अडथळे येत असतात, ही आव्हाने समजून पुढे गेलं पाहिजे, असं दिग्दर्शकीय अनुभव मांडताना म्हणाले.

अभिनेता सुमीत राघवन म्हणाला, ऋषीकेशचा पहिला चित्रपट आहे, मी त्यात काम करणारच या भावनेने हा चित्रपट केला. माझी छोटीशी भूमिका असली तरी ती किती महत्त्वाची आहे, हे त्याने मला सांगितलं. पण मुळातच मला त्याच्याबरोबर काम करायचंच होतं. चित्रपट पाहिल्यांनतर जाणवलं की आपली भूमिका किती महत्त्वाची होती, तो परिणाम काय होता, हे नंतर जाणवल्याचं त्यांनी सांगितलं.

मृणाल कुलकर्णीचीही यात छोटेखानी पण महत्वाची भूमिका आहे. या चित्रपटाविषयी बोलताना ती म्हणाली, प्रत्येक सामाजिक स्तरातील व्यक्ती आहे त्यापेक्षा मोठय़ा घराची स्वप्नं पाहत असते. काहींची स्वप्नं पूर्ण होतात, काहींची होत नाहीत. या चित्रपटाची गोष्ट अतिशय व्यापक आहे, असं ती म्हणाली. ऋषिकेश खूप हुशार आहे आणि त्याने संवेदनशीलतेने हा चित्रपट साकारला आहे, असंही तिने सांगितलं. तिला बोलताना मध्येच थांबवत ऋषीकेश जोशी म्हणाले, सुमीत आणि मृणाल दोघांचीही छोटीशीच भूमिको आहे, त्यांच्या तोंडी संवादही कमी आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त चेहऱ्यातून व्यक्त व्हायचं होतं, ते त्यांनी अप्रतिम केलं आहे.

मी खूप वर्षांपासून ऋषीकेशला ओळखते. तो चित्रपट करतोय असं कळलं तेव्हा मीच त्याला फोन केला. त्याने वाचनाला यायला सांगितलं. त्या वाचनातच चित्रपट आवडला. कारण त्यावेळी माझ्या घरातही तसंच वातावरण होतं, म्हणून त्या व्यक्तिरेखा आपल्या वाटू लागल्या. खूप वेळ एकाच प्रकारच्या भूमिका केल्यानंतर वेगळं करण्याच्या विचारात होते. आणि या चित्रपटातील भूमिका करायला मिळाली, याचा आनंद झाला, अशी भावना विभावरी देशपांडे हिने व्यक्त केली. मृणालने यावेळी चित्रपटात वैभव जोशींच्या कवितांचा खूबीने वापर करण्यात आला आहे, याकडे लक्ष वेधलं. ती पुढे म्हणाली, चित्रपटाचा विषय मांडण्याची पद्धत आणि त्याचा लेखक म्हणून आवाका हे खूप महत्त्वाचं आहे. अनेकदा चित्रपटाच्या लेखकाला भेटण्याची वेळ येत नाही. त्यामुळे लेखकाला जे मांडायचंय ते दिग्दर्शकाला तसंच मांडायचं असतं असं नाही. लेखक आणि दिग्दर्शक एक असल्यामुळे एकपद्धतीने विचार होतो, असं ती म्हणाली. आपल्या दिग्दर्शनाविषयी ऋषीकेश म्हणाले की मी अभिनेता म्हणून दुसऱ्या दिग्दर्शकाबरोबर काम करताना हे दृश्य मी असं केलं असतं, हा विचारच करत नाही.  कारण दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे, तसं करण्याकडे मी लक्ष देतो, असं सांगितलं. अभिनेता म्हणून भूमिका करताना स्वत:चं स्वत:तलं काहीतरी वेगळं आश्चर्यकारक सापडलं तर खूप काही मिळवलं असं मला वाटतं. मला चित्रपट लिहिताना आवडला आणि पटला तरच मी लिहितो, किती रक्कम दिली जातेय यावर ते ठरत नाही. मला माझ्या कामातून आनंद शोधायला आवडतं. दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय या तिन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या करण्यातली नजाकत वेगळी असते, असं ऋषीकेश यांनी सांगितलं. अभिनेत्री रिमा लागू यांचा हा शेवटचा चित्रपट होता. त्यांच्या आठवणी जागवताना मृणाल म्हणाली की खूप वर्षांनंतर तिच्या वयानुरुप लिहिलेली चांगली भूमिका तिच्या वाटयाला आल्यामुळे रिमाताई खूश होती. पुन्हा चित्रपटाच्या विषयाकडे येताना ऋषीकेश जोशी म्हणाले की आपल्याला घराविषयी जे वाटतं किंवा घर बोलतं हे दाखवताना व्यक्त होणं महत्त्वाचं होतं, त्यासाठी कविता हे माध्यम निवडलं. आपल्या अभिनय प्रवासाविषयी सुमित म्हणाला, मी बालरंगभूमीपासून सुरुवात केली. वेगवेगळ्या टप्यांवर वेगळे लेखक आणि दिग्दर्शक भेटत गेले, मृणालचं मालिकांमधलं काम बघत होतो, ऋषीकेशला रंगभूमीवर पाहिलं होतं, त्यांच्याबरोबर काम करतानाचा हा टप्पा खूप छान वाटतोय. तर सध्या एकाच वेळी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करणाऱ्या कलाकारांमध्ये वाढ होतेय असे ऋषीकेश म्हणाले. प्रत्येकाला आता वेगवेगळं माध्यम खुणावत आहे. हा संगम चित्रपट, नाटक आणि मालिका सगळीकडेच दिसून येतो आहे. त्यामुळे अशा वातावरणात वावरताना एकमेकांच्या कामांबद्दल कुतूहल असतं. कारण या तिन्ही क्षेत्रात काम करताना वेगवेगळे अनुभव येतात. आणि त्या भूमिकेत शिरल्यावर ती व्यक्ती गांभीर्याने त्याकडे पाहते यावर चौघांचही एकमत झालं होतं.

शब्दांकन – भक्ती परब