‘हम गरीब हुए तो क्या हुए दिलसे अमीर है..’ सध्या ‘टाईमपास’ (टीपी) या चित्रपटाचे संवाद गाजताय. रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला, तोच हाऊसफुल्ल गर्दीत. संपूर्ण महाराष्ट्रभर अडीचशे थिएटरमधून दिवसाला ५ हजार विक्रमी शो हाऊसफुल्ल गर्दीत दाखवणाऱ्या या चित्रपटाने रविवारचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग धरून तब्बल पाच कोटींची कमाई केली असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. नव्या वर्षांतील पहिल्याच शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या मराठी चित्रपटाने कमीत कमी दिवसांमध्ये तिकीटबारीवर विक्रमी कमाई केली असून आठवडाभरात हा आकडा १० कोटींपर्यंत पोहोचेल, असा विश्वास चित्रपटाचे निर्माते ‘एस्सेल व्हिजन’चे निखिल साने यांनी व्यक्त केला आहे.
‘एस्सेल व्हिजन’ची निर्मिती असलेला ‘टाईमपास’ या चित्रपटाला पहिल्याच दिवसांत हाऊसफुल्ल बुकिंग मिळाल्याने शनिवारी दुसऱ्याच दिवशी निर्मात्यांना थिएटर्सची संख्या वाढवावी लागली. मल्टिप्लेक्समध्ये दिवसाला सहा शो हा ‘दुनियादारी’ चित्रपटाचा विक्रम होता. पण, ‘टीपी’साठी दिवसाला १५ शो दाखवले जात आहेत आणि तरीही रविवापर्यंत सर्व शो हाऊसफुल्ल असल्याचे सुखद चित्र सगळीकडे पाहायला मिळते आहे.
मराठी चित्रपट पहिल्या दिवशी प्रदर्शित झाल्यानंतर त्याला जो प्रतिसाद मिळायचा, तो मग हळूहळू एक आठवडा, दुसरा आठवडा असा चढत जायचा. म्हणजे, रवी जाधव यांच्या ‘बीपी’ चित्रपटालाही १० कोटींचा आकडा गाठायला दहा आठवडे जावे लागले होते.
‘दुनियादारी’ने पहिल्या आठवडय़ात दोन कोटींच्या आसपास कमाई केली होती. पण, ‘टीपी’ने या सगळ्यांवर कडी केली असून केवळ तीन दिवसांत चित्रपटाने ५ कोटी कमावले आहेत. ‘टीपी’च्या या यशाने मराठीतही हिंदीप्रमाणेच तीन दिवसांत सर्वाधिक कमाईचा पायंडा पाडला आहे, असे मत निखिल साने यांनी व्यक्त केले.  रवी जाधव यांचा ‘बीपी’नंतर ‘टीपी’, केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांच्या मुख्य भूमिका, कुमारवयीन प्रेमकथेचा विषय, जोडीला प्रसिद्धीचा आणि मार्केटिंगचा जोरदार तडाखा यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. ‘दुनियादारी’ने २२ कोटींची कमाई करत मराठी चित्रपटांचे व्यावसायिक यश सिद्ध केले होते. मात्र, ‘टीपी’ हा खरा बदल घडवून आणणारा चित्रपट ठरला आहे. मुंबई, पुण्यापासून सगळ्याच शहरात या चित्रपटाला १०० टक्के उपस्थिती आहे. शनिवारपासून साडेपाच हजार शो दिवसाला दाखवले जात आहेत. त्यामुळे, येत्या आठवडय़ाभरात चित्रपट १० कोटींची कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे बॉलिवूडने तीन दिवसांत १०० कोटींचे समीकरण निश्चित केले असतानाच मराठी चित्रपटही तीन दिवसांत १० कोटींकडे वाटचाल करतो आहे. ‘टीपी’ने तीन दिवसांत १० कोटींचा पल्ला गाठल्यास मराठी चित्रपटांसाठी हा आगळावेगळा
विक्रम ठरेल.