राजकीय-सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणारा आणि ‘सिंहासन’ या चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनंतर येणारा राजकीय चित्रपट म्हणून ‘नागरिक’कडे पाहिले जात आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला राज्य शासनाचे सवरेत्कृष्ट सामाजिक चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शन (जयप्रद देसाई) सवरेत्कृष्ट संवाद (डॉ. महेश केळुस्कर), सवरेत्कृष्ट गीतलेखन (संभाजी भगत) आणि छायांकन (देवेंद्र गोलतकर) असे पाच पुरस्कार मिळाले आहेत. ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध साऊंड रेकॉर्डिस्ट रसुल पुकटी यांचे साऊंड डिझाइन व ऑस्कर पुरस्कार विजेत्या वेशभूषाकार भानू अथय्या यांची वेशभूषा आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची चित्रपटातील महत्त्वाची आणि विशेष भूमिका ही या चित्रपटाची खास वैशिष्टय़े म्हणता येतील. ‘नागरिक’चे दिग्दर्शक जयप्रद देसाई यांच्याशी केलेली बातचीत.   

वेगवेगळ्या विषयावर मराठी चित्रपट तयार होत असून निर्माते-दिग्दर्शक यांची नवी पिढी मराठीत हा बदल हळूहळू घडवीत आहेत ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. चित्रपट हा अभिजात आणि लोकाभिमुख असला पाहिजे, असे मत ‘नागरिक’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केले.
याविषयी अधिक माहिती देताना देसाई यांनी सांगितले, निव्वळ करमणूक करणारा आणि सामाजिक आशय/वास्तव मांडणारा चित्रपट अशी एक सीमारेषा आपल्याकडे होती. सामाजिक किंवा कलात्मक चित्रपट म्हणजे तो सर्वसामान्य प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाणारा किंवा फक्त एका ठरावीक वर्गापुरताच मर्यादित असे मानण्याचा आणि निव्वळ करमणूक करणारा, हसविणारा चित्रपट म्हणजे कमी दर्जाचा असे मानण्याचा एक प्रघात आहे. व्ही. शांताराम, राज कपूर, ऋषिकेश मुखर्जी यांनी दोन्हीचे भान जपले होते. मराठीत यापूर्वीही काही जणांनी या दोन्हींचे भान जपत चित्रपट तयार केले होते. पण नंतर काही वर्षे एका ठरावीक पठडीचेच चित्रपट मराठीत तयार होत होते. पण आता पुन्हा बदल घडायला सुरुवात झाली आहे. मराठीत नवीन प्रवाह येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. चांगल्या चित्रपटासाठी कोणत्या गोष्टी असणे गरजेचे आहे? या प्रश्नावर देसाई म्हणाले, चित्रपटासाठी कोणतीही गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, अशी असायला पाहिजे. येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटाचे, गोष्टीचे आकलनच होणार नसेल तर तसे करून चालणार नाही. त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांना समजेल आणि मुख्य म्हणजे दोन-अडीच तास जागेवर खिळवून ठेवेल असा असला पाहिजे. चित्रपटाची कथा, पटकथा ही सशक्त आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल आणि खिळवून ठेवेल अशी असली पाहिजे. केवळ नाच, गाणी, हसविणे म्हणजे मनोरंजन नाही तर गोष्टीतील थरार, वास्तव हेही मनोरंजन होऊ शकते. rv04‘नागरिक’विषयी ते म्हणाले, माझे शिक्षण अमेरिकेत झाले. ‘फिल्म’ या विषयात मी ‘मास्टर’ केले असून चित्रपट दिग्दर्शनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तीन वर्षांपूर्वी मी भारतात परतलो. अमेरिकेत असतानाच एका दिवाळी अंकात डॉ. महेश केळुस्कर यांनी लिहिलेली कादंबरी माझ्या वाचनात आली होती. तेव्हाच या विषयावर चित्रपट तयार करायचा हे नक्की केले होते. त्यानंतर डॉ. केळुस्कर यांच्याशी संपर्क साधला. आमच्या गाठीभेटी झाल्या. चित्रपटावर आम्ही काम सुरू केले. चित्रपटाची कथा व संवाद डॉ. महेश केळुस्कर यांचे असून पटकथा मी व डॉ. केळुस्कर यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन चव्हाण हे आहेत. हा चित्रपट म्हणजे आजच्या सामाजिक, राजकीय वास्तवतेचे दर्शन आहे. शाम जगताप हा पत्रकार एका राजकीय भोवऱ्यात अडकला जातो आणि त्यातून ही गोष्ट घडते. कोणत्याही व्यवस्थेच्या केंद्रस्थानी सर्वसामान्य नागरिक हाच महत्त्वाचा असतो, असला पाहिजे. आज या सर्वसामान्य नागरिकाचे वेगवेगळ्या पद्धतीने शोषण होत आहे, सामाजिक-राजकीय परिस्थितीत तो तटस्थ राहतो आहे. मात्र या परिस्थितीतूनही हाच सर्वसामान्य नागरिक मार्ग काढू शकतो, असा हा ‘नागरिक’ आहे. चित्रपटातून आम्हाला तेच दाखवायचे आहे.
चित्रपटात सचिन खेडेकर हे ‘शाम जगताप’ ही भूमिका करत असून दिलीप प्रभावळकर, मिलिंद सोमण, सुलभा देशपांडे, राजेश शर्मा, देविका दफ्तरदार आदी कलाकार आहेत. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू एका महत्त्वाच्या आणि विशेष भूमिकेत या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याने आता प्रेक्षक याचा कसा स्वीकार करतात याचे थोडे दडपण व उत्सुकता आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”