|| रवींद्र पाथरे

माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींचं मोहोळ उठवून दिलं काय; आणि समाजातील जवळजवळ प्रत्येक घटकाला आपल्या मागासलेपणाचा साक्षात्कार होऊ लागला. शिक्षण, नोकरी तसंच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आरक्षण मिळालं तरच आपलं मागासलेपण दूर होईल, हे सोप्पं गणित मागास समाजघटकांतल्या तथाकथित पुढाऱ्यांनी आपल्या समाजबांधवांच्या गळी उतरवलं. या मंडळींना समाजाचं भलं करायचं आहे, असा अंध विश्वास मागास समाजांत निर्माण करण्यात त्यांना यश आलं. त्यासाठी या पुढाऱ्यांनी भावनिकतेचे व अस्मितेचे कडवट डोस पाजण्याचं काम अहमहमिकेनं केलं. त्याचीच कटु फळे आज संपूर्ण समाजाला आणि देशाला भोगावी लागत आहेत. कॉंग्रेस असो वा भाजपा; सगळेच राजकीय पक्ष सत्तेचे सोपान चढण्यासाठी या जातीपातींच्या पुढाऱ्यांना हवा देऊ लागले. त्यातून सत्ता मिळवणं एवढाच त्यांचा हेतू होता; आणि आजही तोच आहे. त्या बदल्यात या मागास समाजांतील पुढाऱ्यांना सत्तेचा एखादा छोटा तुकडा फेकला की काम भागतं; त्यावर ते खूश होतात हे त्यांच्या लक्षात आलंय. या नेत्यांच्या मंत्री-संत्रीपदानं समाजांचं मागासलेपण कसं काय दूर होतं, हा मात्र प्रश्नच आहे. या सगळ्या प्रकारात समाजात दुही, दुभंगाची दरी आणि परस्परद्वेष निर्माण होतो त्याचं काय? याचा विचार कुणीच करीत नाही. मागास समाजांची उन्नती करणं हे सरकारचं घटनादत्त कर्तव्य आहे. परंतु सत्ता आणि त्यातून प्रचंड मत्ता कमावण्याच्या नादात मश्गुल राहणाऱ्या गेंडय़ाच्या कातडीच्या सत्ताधीशांना ना याचं भान असत, ना जाण! असो.

आज २१ व्या शतकात आधुनिक विचारांचा अंगाकार करण्याऐवजी आपण अधिकच संकुचित होत आपापल्या जातीपातीपुरताच विचार करू लागलो आहोत. त्यापायी देशातली हवा इतकी गढूळली आहे, की मध्ययुगीन मानसिकतेच्या गाळात रुतत चाललेल्या या देशाचं भवितव्य काय, ही चिंता समाजचिंतकांना आणि संवेदनशील व्यक्तींना भेडसावते आहे. यावर पर्याय म्हणून देशातील सर्वानाच- ते ज्या जातीपातीचे असतील त्या जातीपतीच्या लोकसंख्येत असलेल्या प्रमाणाइतकं आरक्षण प्रत्येकास देऊन टाकावं, म्हणजे मग प्रत्येक समाजघटकाचं समाधान होईल, या विचारांपर्यंत अनेक येऊन पोचले आहेत. त्यामुळे एक होईल, की प्रत्येक समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल आणि कुणालाच मग तक्रारीला वाव उरणार नाही.

या स्वैर चिंतनास पाश्र्वभूमी आहे ती ‘जुगाड’ या समांतर रंगभूमीवर आलेल्या नव्या नाटकाची! पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरची निर्मिती असलेलं हे नाटक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या कथाबीजावर आधारित आहे. नितीन अग्निहोत्री यांनी त्याचं लेखन अन् दिग्दर्शन केलं आहे. देशभरात जंगल व डोंगरकपाऱ्यांमध्ये विखुरलेला नालमाची हा अल्पसंख्य आदिवासी समाज. नागर जगाशी संबंध न आल्याने सर्वच बाबतींत मागास राहिलेला. अंधश्रद्धा व शोषणात खितपत पडलेला. त्यांच्या अज्ञान-अंधश्रद्धेचा फायदा घेत अ‍ॅड्. हणमंतराव हा त्यांच्यातलाच, पण शिकून वकील झालेला तरुण त्यांचा नेता बनतो. समाजबांधवांचा व्यवस्थेकडून होणारा छळवाद आणि त्यांच्या शोषणाबद्दलचे कज्जे तो लढवतो. समाजबांधवांना न्याय मिळवून देणं व त्यांच्या हातून घडलेल्या गुन्ह्य़ाला कमीत कमी शिक्षा कशी होईल हे पाहणं, हे तो आपलं कर्तव्य मानतो. अर्थातच तो त्यांचा देव होतो. या लोकांवर भगत महाराजाचाही पगडा आहे.

एके दिवशी अ‍ॅड्. हणमंतराव तालुक्याच्या ठिकाणी प्राध्यापकी करणाऱ्या एका लेखकाला घेऊन पाडय़ावर येतात. आपल्या समाजावर त्यांनी एखादी लघुकथा लिहावी- यासाठी! मात्र, लेखकमहाशय पाडय़ावर आल्यावर तो त्यांना आपल्या समाजाचा इतिहास लिहिण्याची गळ घालतो. पण त्याकरता प्राचीन संदर्भ लागतील, समाजात एखादा महापुरुष होऊन गेला आहे का हे शोधावं लागेल, असं लेखकमहाशय सांगतात. असा लिखित दस्तावेज नसल्याने मी तुमच्या समाजाचा इतिहास लिहू शकत नाही, हे ते परखडपणे सांगतात. प्राध्यापकांच्या खातीरदारीची ‘सगळी’ व्यवस्था करून आणि त्यांनी मागितलेली मानधनाची रक्कम देण्याची तयारी दर्शवून हणमंतराव त्यांना इतिहास लिहिण्यासाठी भरीस घालू बघतो. दरम्यान, तिथल्या वास्तव्यात या समाजाचं जगणं समजून घेण्याची उत्सुकता लेखकाच्या मनात निर्माण झालेली असते. ते समाजाचा इतिहास लिहिण्याचं काम हो-ना करत शेवटी स्वीकारतात. त्यासाठी लागणारे संदर्भ मात्र गोळा करावे लागतील, हे ते स्पष्ट करतात. हणमंतराव कुठून कुठून हे संदर्भ गोळा करतात. ते विश्वासार्ह नसल्याचं लेखकमहाशय प्रथमदर्शनीच ओळखतात. पण समाजाच्या भल्यासाठी त्याचा इतिहास लिहिला जाणं कसं गरजेचं आहे, हे पटवून देत हणमंतराव त्यांना ते संदर्भ ‘चालवून’ घ्यायचा आग्रह धरतो. काकाराव नावाचे गांधीजींसोबत त्यांच्या सावलीसारखे राहिलेले गृहस्थ आपल्या समाजाचे महापुरुष होते, असा एक दस्तावेज हणमंतराव घेऊन येतो. ते कागद त्याने कुठून तरी पैदा करून आणलेले असतात. मात्र, हा ऐवज बनावट आहे आणि आपण हणमंतरावच्या जाळ्यात अडकलो आहोत, हे लेखकास कळून चुकतं. त्यांच्या गंभीर आजारी मुलीच्या औषधोपचाराची परस्पर व्यवस्था करून हणमंतरावने त्यांना भावनिकदृष्टय़ाही कोंडीत पकडलेलं असतं. पण ते सदसद्विवेकबुद्धीशी प्रतारणा करू शकत नाहीत. काकाराव हा एक गुंड, बलात्कारी पुरुष असल्याची माहिती त्याच्या पूर्वेतिहासाचा शोध घेता कळते. मात्र, हणमंतरावने परस्पर काकारावला महापुरुष म्हणून घोषित करून टाकलेलं असतं. काकारावला पुढे करून आपल्या समाजास उज्ज्वल इतिहास असल्याचा देखावा निर्माण करायचा आणि त्याआधारे देशभर रान उठवून समाजाच्या मागासलेपणावर आरक्षणाचा उतारा पदरी पाडूा घ्यायचा अस हणमंतरावाचा बेत असतो. त्याकरताच त्याने हा सर्व घाट घातलेला असतो. त्याच्या या कुकर्मात आपण सामील व्हायचं नाही असं लेखक ठरवतो. पण..

‘जुगाड’ हे नितीन अग्निहोत्री लिखित-दिग्दर्शित नाटक वर्तमान धगधगत्या विषयास हात घालणारं असलं तरी त्यासाठी जी कल्पित नेपथ्यरचना केली गेली आहे ती अत्यंत भुसभुशीत पायावर उभी असल्याने अपेक्षित परिणामाप्रत हे नाटक जात नाही. त्यातल्या अनेक अंतर्विरोधांमुळे नाटकाच्या हेतूबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होतं. हा नेमका कुठला आदिवासी समाज आहे; ज्याला पुस्तकं म्हणजे काय हेसुद्धा माहीत नाही; परंतु मोबाइल टॉवरची रेंज कशी मिळवायची, हे मात्र माहीत आहे! ‘बाई’ची ‘पेशगी’ पुरवून कोणतंही काम करून घेता येतं, हा समज त्यांच्यात का रूढ झाला? एकीकडे हणमंतराव आपण समाजाच्या भल्यासाठी झटतो आहोत असं चित्र निर्माण करताना दिसतो, तर दुसरीकडे तो त्यांचंच शोषणही करतो असं गुलाब सांगते. तरीही तो त्यांचा ‘देव’ कसा? सर्वार्थानं मागासलेल्या या आदिवासींचे पेहेराव मात्र टापटिप कसे? समाजाचा इतिहास लिहायचा तर त्याला एखाद्या महापुरुषाची गरज आहे, असं आधी म्हणणारे लेखकमहाशय नंतर अशा महापुरुषाची काहीच गरज नाही, अशी परस्परविरोधी भूमिका कशी काय मांडू शकतात? नाटकात मांडलेल्या हणमंतराव व लेखकाच्या वैयक्तिक समस्या या त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी निर्माण केल्यासारख्या वाटतात. अन्यथा, हणमंतरावचा प्रवास हा धूर्त कावेबाजपणा आणि समाजाला वेठीला धरून आपली पोळी भाजून घेण्याची त्याची धडपड या मार्गे सध्याच्या बाजारबुणग्या पुढाऱ्यांशी साम्य दर्शवणारा आहे. लेखकमहाशयांची सदसद्विवेकाची टोचणीही खरी वाटत नाही. कारण हणमंतरावचा डाव लक्षात आल्यावर खरं तर त्यांनी तिथून निघून जायला हवं. पण तरीही त्यांनी तिथंच मुक्काम करण्याचं कारण काय? गुलाब या पात्राचं नेमकं प्रयोजन काय? या सगळ्यामुळे इथली व्यवस्था जशी भ्रष्ट आहे, तसेच तिच्या विरोधात लढणारेही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, हाच संदेश नाटकातून जातो. परिणामी नाटकाचा हेतू काय, याबद्दल भलंमोठं प्रश्नचिन्ह मनात वागवत प्रेक्षक नाटय़गृहाबाहेर पडतो. नाटकातील या अंतर्विरोधांचा, त्रुटींचा विचार लेखकापासून संबंधित सर्वानीच करणं आवश्यक आहे. नुसतंच कथाबीज समकालीन असून भागत नाही, तर त्यामागील वैचारिक मांडणीही तितकीच स्पष्ट, स्वच्छ असायला हवी. त्यासंदर्भात संभ्रम असणे योग्य नाही. असो.

शेखर नाईक यांनी नेपथ्यात विषयाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला असला तरी वेशभूषेत मात्र आदिवासींच्या मागासलेपणाचा अंश दिसत नाही. प्रफुल्ल दीक्षित यांची प्रकाशयोजना आवश्यक ती वातावरणनिर्मिती करते. रंगभूषेत शहरी तोंडवळ्याच्या आदिवासींना अस्सलता प्राप्त करून देण्याचं काम अपेक्षित होतं. त्याबाबतीत निराशा पदरी पडते. पाश्र्वसंगीत कौशल इनामदार यांचं आहे.

यातील सर्वच कलाकारांनी अपेक्षित ऊर्जेनं कामं केली आहेत. मात्र, मूळ आशयाच्या मांडणीतच गडबड असल्यानं त्यांच्या मेहनतीचं चीज होत नाही. चिन्मय मांडलेकरांचा अ‍ॅड्. हणमंतराव हा गणंग पुढारी कसे जन्माला येतात याचा नमुना आहे. हृषिकेश जोशींनी तत्त्वांशी इमान राखण्याकरता धडपडणारा आणि त्यापायी उद्ध्वस्त होत परिस्थितीला शरण जाणारा लेखक उत्तम वठवला आहे. शुभांगी भुजबळ यांनी गुलाबचं दु:ख, तिची वेदना लक्षवेधी केली आहे. सत्तेच्या सोपानाचं हे ‘जुगाड’ आपण नित्य अनुभवतो आहोतच.