|| रवींद्र पाथरे

लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे म्हटलं की काही वर्षांपूर्वी रंगमंचावर आलेलं त्यांचं ‘आम्ही आलो रे..’ हे हसून हसून गडाबडा लोळायला लावणारं नाटक आठवतं. त्यात संजय नार्वेकर आणि विजय कदम या दोन भुतांनी उडवलेली धम्माल आठवली तरी हसता भुई थोडी होते. तेच राजेश देशपांडे आता संजय नार्वेकरांना घेऊन ‘होते कुरूप वेडे’ हे विनोदी नाटक मंचित करते झाले आहेत. हसविण्याचा आपुला धंदा त्यांनी इथेही कायम ठेवला आहे.

राजहंस कुसरूप (संजय नार्वेकर) हा नावाशी फटकून असलेला असामी.  त्याच्या कुरूप चेहऱ्यामुळे कुणीही त्याला जवळ करत नाही. उलट, उठसूट अपमानच करतात. घरी-दारीही तेच. त्याची बायको मात्र नावाप्रमाणेच ‘मदनिका’ (शलाका पवार) आहे. त्यांना एक मुलगा आहे: ‘स्वरूप’! पण तोही बापावर गेलाय!! दस्तुरखुद्द ‘राजहंस’ही आपल्या वडलांचंच रूप घेऊन जन्माला आलाय. सबब वडलांचा तो राग राग करतो. आपलं हे कुरूप रूप आणि त्यावरून होणारी आपली अवहेलना त्याला असह्य होते आणि ते दु:ख तो मद्याच्या प्याल्यात विसरू पाहतो. स्वाभाविकपणेच घरी-दारी त्याचा पाणउतारा व्हायला आणखीन एक कारण मिळतं.

अशात एके दिवशी प्रसन्न प्रसादे (नयन जाधव) नावाचा एक सेल्समन राजहंसच्या घरी चेहरा झटपट सुंदर करण्याचे एक पेय विक्रीसाठी घेऊन येतो. नक्कीच कुणीतरी भामटा आहे हे ओळखून राजहंस त्याला आपल्याबरोबरीने ते पेय जबरदस्तीने घ्यायला लावतो.

आणि काय आश्चर्य!

राजहंसचा कुरूप चेहरा जाऊन तो एक गोरापान, सुस्वरूप. गृहस्थ बनतो. तर प्रसन्न प्रसादेचा सुंदर चेहरा विद्रूप होऊन त्याला राजहंसचा चेहरा प्राप्त होतो. चेहऱ्यांच्या या अदलाबदलीमुळे दोघांचंही आयुष्य बदलून जातं खरं; पण ते आपली खरी ‘ओळख’ हरवून बसतात. बदललेल्या राजहंसला मदनिका नवरा म्हणून स्वीकारत नाही. मात्र, लफंग्या प्रसन्न प्रसादेचे कारनामे त्याच्या बदललेल्या चेहऱ्यामुळे झाकण्याची संधी त्याला मिळते. परंतु आपली बायको मदनिका ही बदललेल्या चेहऱ्याच्या परपुरुषाबरोबर संसार करणार या कल्पनेनंच राजहंसचे धाबे दणाणतात. तो घरी फोन करून त्या लफंग्यापासून सावध राहा असं बायकोला कळवतो. पण आपल्या बदललेल्या रूपाचा फायदा घेऊन तो प्रसन्न प्रसादेनं ठकवलेल्या घरमालकाला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला (तीही राजहंससारखीच कुरूप असते. तिच्या संपत्तीकडे बघून प्रसन्न प्रसादेनं तिच्यावर जाळं टाकलेलं असतं.) दूर लोटण्यात यशस्वी होतो. तिकडे प्रसन्न प्रसादेला मदनिकासारखी सुंदर बायको मिळाल्याचा आनंद होतो. आपला कटू भूतकाळ आणि त्यातली आपली वणवण संपल्याने तो खरोखरच प्रसन्न होतो.

पुढे काय?

या चमत्कृतीपूर्ण फॅन्टसीत लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांना नेमकं काय दाखवायचंय, या बाबतीत मात्र संभ्रमित व्हायला होतं. प्रसन्न आणि राजहंसचे फक्त चेहरेच बदलले आहेत की मेंदूही? कारण त्यांचे मेंदू त्या शरीरांत कायम असतील तर त्यांचं वर्तन बदलता कामा नये. त्यांचा स्वभाव, लकबी, मानसिकता यांत काहीही बदल होता नये. पण इथं एकीकडे मेंदूही बदलल्याचं दाखवलं आहे आणि तरीही प्रसन्नचं रूप लाभलेला राजहंस बायकोला ‘त्या’ भामटय़ापासून सावध राहा, असंही सांगताना दिसतो. अशा प्रकारचे अनेक घोळ होतात. फक्त प्रयोगाच्या गतिमानतेमुळे त्यावर फारसा विचार करायला लेखक-दिग्दर्शकानं प्रेक्षकांना सवड दिलेली नाही. जे समोर घडत असतं तेच इतकं हास्यस्फोटक आहे, की प्रेक्षकही त्यात वाहवत जातो. असो.

या फॅन्टसीत खरं तर अनेकानेक शक्यता दडलेल्या आहेत. राजहंस आणि प्रसन्नच्या चेहराबदलीमुळे त्यांचंच नव्हे, तर त्यांच्या अवतीभवतीच्या लोकांमध्येही संभ्रम, गोंधळ निर्माण होऊन विनोदाची तुफान फटकेबाजी शक्य होती. परंतु त्या गुंतागुंतीच्या डोहात उतरण्याचं लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी टाळलं आहे. तसं होतं तर या नाटकातही ‘आम्ही आलो रे..’ सारखं विनोदाचं धूमशान पाहायला मिळालं असतं. असो. तसं घडलं नाही, खरं. त्यामुळे ‘होते कुरूप वेडे’ हे नाटक विनोदाच्या चाकोरीत अडकून पडलं आणि तिथंच रेंगाळत राहिलं. राजहंसचं आपल्या बायको-मुलाला आपणच खरे त्यांचे पती व पिता आहोत हे पटवून देण्याची धडपड अनावश्यक इतका काळ लांबवली गेली आहे. संजय नार्वेकरांभोवतीच नाटक फिरतं ठेवण्याचा अट्टहास त्यामागे असावा. मात्र, त्यामुळे प्रयोगातल्या अनेक शक्यता बाहेरच येऊ शकलेल्या नाहीत. बदललेल्या चेहऱ्याच्या राजहंसने आपल्या बायको-मुलाला आपली ओळख पटविण्यात आणि प्रसन्न प्रसादेच्या कुरूप प्रेयसीस नाकारण्यात सगळी ऊर्जा दवडली आहे. ज्यामुळे नाटक एका जागीच घुटमळत राहतं. लेखक व दिग्दर्शक म्हणून राजेश देशपांडे यांचं हे अपयश घरात आणि बाहेरही होणारी गोची यावर नाटकात भर दिला गेला असता तर अनेक हास्यस्फोटक प्रसंगांची मालिका निर्माण करता आली असती. यातलं फद्याभाई हे पात्र तर निव्वळ पीजेछाप विनोदासाठीच निर्माण केलं गेलं आहे. अशा काही त्रुटी असल्या तरी केवळ चार घटका विरंगुळा अपेक्षिणाऱ्या प्रेक्षकांचं मनोरंजन हे नाटक नक्कीच करतं.

नाटकाच्या तांत्रिक बाजू ठीकठाक आहेत.

संजय नार्वेकर नेहमीप्रमाणे राजहंस कुसरूपच्या भूमिकेत तुफान बॅटिंग करतात. शेवटचं त्यांचं प्रदीर्घ स्वगत त्यांच्यातल्या कसलेल्या अभिनेत्याची साक्ष देणारं आहे. त्यांचा जबर दमसास त्यातून प्रतीत होतो. दिसायला कुरूप, पण मनानं निर्मळ असलेल्या राजहंसची भावनिक आंदोलनं त्यांनी छान दाखवली आहेत. हशे वसूल करणं हा तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ! ते त्यांनी चोख वसूल केले आहेत. शलाका पवार यांनी मदनिकेच्या भूमिकेत फार्सिकल अभिनयाचं उत्तम दर्शन घडवलं आहे. भरत सावले यांनी आपल्या शारीरसंपदेचा विनोदासाठी वापर केला असला तरी त्यांना संहितेचं पाठबळ नसल्यानं ते प्रभावहीन वाटतात. मीनाक्षी जोशी यांनी वैविध्यपूर्ण भूमिका निभावल्या असल्या तरी प्रसन्न प्रसादेच्या प्रेयसीच्या भूमिकेत त्या लक्ष वेधून घेतात. नितीन जाधव यांच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. त्यांनी राजहंस कुसरूपचं आगाऊ करट लक्षवेधी केलं आहे. नयन जाधव यांनी प्रसन्न प्रसादेची सेल्समनगिरी चोख वठवली आहे. कल्पेश बाविस्कर छोटय़ा भूमिकांत चपखल वाटतात.