|| रवींद्र पाथरे

लहान मुलांचं भावविश्व कोवळं, निरागस असतं. त्यांच्या कुतूहलाला सीमा नसते. अन् कल्पनेच्या भरारीलादेखील! स्वाभाविकपणेच ‘अशक्य, अतक्र्य, अविश्वसनीय’ हे शब्द त्यांच्या शब्दकोशातच नसतात. ‘हे कसं घडू शकेल?’ हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही. किंबहुना, कशावरही त्यांचा सहज विश्वास बसतो. काळ कुठलाही असो; मुलांची ही निरागसता कायम आहे. म्हणूनच एकेकाळी ‘गोटय़ा’, ‘फास्टर फेणे’, ‘पंचतंत्र’, ‘सिंदबादची सफर’सारखं साहित्य जन्माला आलं आणि त्याने मुलांचं भावविश्व व्यापून टाकलं. त्याच धर्तीवर जगभरात ‘सुपरमॅन’, ‘हॅरी पॉटर’, ‘सिन्चेन’ अशा हिट् व्यक्तिरेखा निर्माण झाल्या आणि त्यांनी बालमनांवर अधिराज्य गाजवलं. बालांसाठीचं साहित्य, नाटकं, चित्रपट हे चिरंजीव होतात, याचं कारण हेच : मुलांच्या कल्पनाशक्तीला कुंपण नसतं! असो.

सत्तर-ऐंशीच्या दशकांत आपल्याकडे बालनाटय़ चळवळ रुजली. रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर, सुलभा देशपांडे या मंडळींनी त्यात पुढाकार घेतला. स्वत: प्रौढांच्या रंगभूमीवर सक्रीय असतानादेखील त्यांनी मुलांसाठीची नाटकंही आवर्जून सादर केली. त्यातून उत्तम कलावंतांची एक पिढी तर घडलीच; त्याचबरोबर सुजाण प्रेक्षकपिढीही निर्माण झाली. ज्याचा मराठी रंगभूमीला दीर्घकाळ लाभ झाला. परंतु बालनाटय़ चळवळ थंडावल्यावर कलावंतांचं घडणं थांबलं नसलं तरी नव्या प्रेक्षकांचं घडणं मात्र थांबलं आहे. ज्याची फार मोठी किंमत आज मराठी रंगभूमी चुकवत आहे. आज प्रेक्षकांअभावी फक्त शनिवार-रविवारीच नाटय़प्रयोग करण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे.

या पाश्र्वभूमीवर आज पुन्हा नव्याने जुनी बालनाटय़ं सादर होत आहेत. रत्नाकर मतकरींच्या ‘अलबत्या गलबत्या’च्या यशाने अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे यांचा हुरुप वाढला असून त्यांनी बुक माय शोच्या सहकार्याने मतकरींच्याच ‘निम्माशिम्मा राक्षस’ या दुसऱ्या बालनाटय़ाची निर्मिती केली आहे. मात्र, ‘निम्माशिम्मा राक्षस’ला काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी ते अधिक प्रेक्षणीय केलं आहे.

बगदादमधील तरुण मासेविक्या अब्दुल्ला हा मासेविक्रीच्या धंद्यातून आपल्या कुटुंबाचं पोट भरत असतो. त्याच्या साधेपणामुळे गिऱ्हाईकं त्याचा अनेकदा गैरफायदाही घेत. पण तो आहे त्या परिस्थितीतही सुखी, समाधानी जीवन जगत असतो. तरुण असल्याने साहजिकच तो श्रीमंत होण्याची, शाही घराण्यातील मुलीशी लग्न करण्याची स्वप्नं पाहत असतो. परंतु ती पुरी व्हायची तर काहीतरी जादूची कांडी मिळणं आवश्यक होतं. एकदा मासे पकडताना त्याच्या जाळ्यात एक काचेची बाटली येते. अब्दुल्लाने ती हातात घेऊन सहज घासली असता त्यातून एक बुटका राक्षस बाहेर येतो. तो अब्दुल्लाला ‘काय वाट्टेल ते माग, मी तुझी निम्मी इच्छा नक्कीच पुरी करेन..’ असं सांगतो. याचं कारण तो राक्षस निम्माशिम्मा असतो. अब्दुल्लाला त्याच्याकडे नक्की काय मागावं ते लगेचच सुचत नाही. तो ‘मला राजाचा पेहेराव दे’ असं सांगतो. त्याप्रमाणे राक्षस त्याला मंत्राने राजवस्त्रं देतो. त्यामुळे अब्दुल्लाची खात्री पटते, की हा खरोखरच इच्छापूर्ती करणारा राक्षस आहे. तो मग त्याच्याकडे आलिशान घर मागतो. तीही इच्छा पुरी होते. त्यामुळे खूश होऊन तो सुलतानाच्या मुलीशी लग्न करण्याची आपली इच्छा बोलून दाखवतो. राक्षस त्याप्रमाणे शहजादीला त्याच्यासमोर हजर करतो. परंतु शहजादी अब्दुल्लाची परीक्षा घेऊन मगच मी त्याच्याशी लग्न करायचं की नाही हे ठरवेन असं सांगते. त्यानुसार ती त्याची परीक्षा घेते. त्यात अब्दुल्ला खरा उतरतो.  मात्र, मौलवीसाहेब त्याला स्पष्टपणे सांगतात की, जोवर सुलतान परवानगी देत नाही तोवर शहजादीशी तुझं लग्न होणं शक्य नाही. तेव्हा अब्दुल्ला आपल्याला बादशहा व्हायचंय असं राक्षसाला सांगतो. पण सुलतान जिवंत असेतो अब्दुल्ला बादशहा होणं शक्य नसतं..

पुढे सुलतान आणि अब्दुल्ला यांच्यात काय घडतं हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य. रत्नाकर मतकरींनी ‘सिंदबादची सफर’मधील अद्भुतरम्य गोष्टींसारखी ‘निम्माशिम्मा राक्षस’ची गोष्ट रचली आहे. वेगळा देश, वेगळं वातावरण, वेगळे लोक, त्यांची वेगळी संस्कृती असं सारं नवं या बालनाटय़ात मांडलं गेल्यामुळे बालप्रेक्षकांना ते भावलं नसतं तरच नवल. अब्दुल्ला, त्याची दाढीधारी मा, निम्माशिम्मा राक्षस, अब्दुल्लाच्या शेजारचं जोडपं- हसन व हसीना, सुलतान, शहजादी आणि ‘नाटकातलं नाटक’ या फॉर्ममुळे नाटय़-व्यवस्थापक, मौलवी, शिपाई, जादुगार राक्षस अशी पात्रांची फौज नाटकात आहे. ‘नाटकातलं नाटक’ हा फॉर्म योजल्याने भूमिकेबाहेर येऊन प्रेक्षकांशी संवाद साधण्याची मुभा यात पात्रांना मिळाली आहे; ज्यामुळे नाटकं अधिक जिवंत, सळसळत झालं आहे. नाटकात नित्य परिचयाच्या पात्रांपेक्षा वेगळीच पात्रं असल्याने त्यांच्या लकबी, बोलण्या-चालण्याची ढब, त्यांचं चित्रविचित्र वागणं यांतून हास्याची कारंजी फुटत राहतात.

दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी आजच्या मुलांची बदललेली रुची लक्षात घेत त्यानुरूप शीर्षकगीत आणि इतर गाणीही आधुनिक संगीतात घोळवून पेश केली आहेत. शिवाय आजच्या स्मार्ट मुलांना खिळवून ठेवायचं तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावाचून गत्यंतर नाही, हेही त्यांनी जाणलं आहे आणि त्याबरहुकूम दृक-श्राव्य-काव्यमय नजरबंदीसाठी थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर आविष्करणात केला आहे. चपखल पात्रयोजनेतही ते यशस्वी झाले आहेत. यातले सगळे कलावंत आपापल्या भूमिकांत फिट्ट आहेत. यातली गाणी व नृत्यं आजच्या बालप्रेक्षकांना बांधून ठेवणारी झाली आहेत. मुलांना विश्वासात घेत नाटक पुढे सरकत असल्याने साहजिकपणेच त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येतो आणि नाटक उत्तरोत्तर रंगत जातं. ‘नाटकातलं नाटक’ फॉर्ममुळे कलावंतांच्या मुक्त वावराला अवकाश मिळाला आहे. त्याचा पुरेपूर फायदा उठवत सगळ्याच कलावंतांनी नाटक अधिक चैतन्यमय केलं आहे. प्रत्येक पात्राला त्याची त्याची अशी स्वतंत्र ओळख दिग्दर्शकाने दिली आहे. त्या परीघात ती छान बागडतात. पात्रांच्या लकबी, क्रिया-प्रतिक्रिया आणि प्रतिक्षिप्त क्रियांनी प्रयोगात छान रंगत येते. विनोदाच्या जागा अचूक हेरल्याने नाटक हसतंखेळतं राहिलंय.

संदेश बेंद्रे यांनी बालनाटय़ाच्या रूढ नेपथ्यास फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बगदादमधलं वातावरण आकारलं आहे. नदीचा वाहता प्रवाह, त्यातली मासेमारी, बाटलीतून निम्माशिम्मा राक्षसाचं प्रकट होणं वगैरे गोष्टी जादुई भासण्यात नेपथ्याचा मोलाचा वाटा आहे. मयूरेश माडगावकर यांनी संगीताच्या नवीन प्रवाहाचा उपयोग करत नृत्यं आणि गाणी ठेकेदार केली आहेत. जसराज जोशी यांनी लय-तालाचा आघाती ठेका असलेली ही गाणी उत्तम गायली आहेत. दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांचीच गीतरचना आहे. कुंदन अहिरेंचं नृत्यआरेखन पात्रांनाच नाही, तर बघणाऱ्यांनाही ताल धरायला लावतं. मेघा जकाते (वेशभूषा) आणि उल्लेश खंदारे (रंगभूषा) यांचं ‘निम्माशिम्मा राक्षस’ जिवंत करण्यातलं योगदान महत्त्वाचं आहे.

अब्दुल्लाच्या भूमिकेत मयूरेश पेम हा सर्वगुणसंपन्न, हरहुन्नरी नट अक्षरश: छा जाता है. त्यांचं नृत्यकौशल्य तर तोंडात बोट घालायला लावतं. सबंध नाटकभर ते ज्या सळसळत्या ऊर्जेनं रंगावकाश व्यापून उरले आहेत, त्यास तोड नाही. निम्माशिम्मा राक्षस झालेला अंकुर वाढवे हा कलावंत शब्दश: धूमशान घालतो. त्याचं संवादफेकीचं आणि अत्रंगगिरीचं टायमिंग अफलातून. एखादी गोष्ट आवडली नाही की जमिनीवर लोळण घेऊन तो जे आकाश-पाताळ एक करतो, ते पाहताना त्यांच्या बेअरिंगचं कौतुक वाटतं. दाढीधारी अब्दुल्लाची मां गणेश पवार यांनी तिच्या हुच्चपणासकट धम्माल साकारली आहे. विकास चव्हाण यांनी मौलवी, व्यवस्थापक आदी छोटय़ा छोटय़ा भूमिकांना त्याचं त्याचं असं वेगळेपण दिलं आहे. त्यात ते गल्लत करीत नाहीत. हसन झालेले नितीन जंगम आपली छाप पाडून जातात. त्यांचं फाटकं व्यक्तिमत्त्व लाजवाब. अमृता कुलकर्णी हसीनाच्या अदांनी जखडून ठेवतात. गायत्री दातार शहजादी म्हणून शोभल्यात. सुलतानाचा राणा भीमदेवी ताठा अभिजीत भोसले यांनी नेमका दाखवलाय.

‘निम्माशिम्मा राक्षस’च्या रूपात एक छान, रंजक बालनाटय़ पाहिल्याचं समाधान मुलं आणि त्यांच्या पालकांनाही नक्कीच मिळतं.