अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या संभाव्य पंचवार्षिक निवडणुकीने सोमवारी नाटय़पूर्ण वळण घेतले. पात्र उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाटय़ परिषदेचे विद्यमान अध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह अभिनेते तुषार दळवी, सुनील तावडे, अशोक शिंदे यांचेही उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत या सर्वाच्या नावापुढे अपात्र असे नमूद करण्यात आले आहे.

वाचा : पुरुषांचा स्टॅमिना वाढवणारा वायग्रा टॅक्स फ्री पण..

नाटय़ परिषद निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी ही निवडणूक होणार आहे. जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ९ ते १८ जानेवारी या कालावधीत अर्ज सादर करायचे होते. १९ जानेवारी रोजी अर्जाची छाननी होऊन २२ जानेवारी रोजी पात्र उमेदवारांची यादी नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली.

येत्या ४ मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा निकाल ७ मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे. दरम्यान या संदर्भात मोहन जोशी, अशोक िशदे यांच्याशी संपर्क साधला पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

वाचा : कॅन्सरवर मात केलेला हा बॉडी बिल्डर लवकरच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

मोहन जोशी यांच्यासह तुषार दळवी, सुनील तावडे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून अभिनेते अशोक शिंदे यांनी स्वाक्षरी केली होती. अशोक शिंदे यांचे नाव मतदार यादीत नाही आणि ते नाटय़ परिषदेचे सदस्यही नाहीत. त्यामुळे त्यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेले अर्ज बाद ठरविण्यात आले. तसेच स्वत: शिंदे यांचाही उमेदवारी अर्ज त्यांचे नाव मतदारयादीत नसल्याने आणि ते नाटय़ परिषदेचे सदस्य नसल्याने त्यांचाही अर्ज बाद झाला आहे.

-गुरुनाथ दळवी, माहिती निवडणूक निर्णय अधिकारी