ऑर्केस्ट्रासाठीच्या स्टेजवर पुष्कर, प्रसाद ‘जय जय महाराष्ट्र माझा..’चा राग आळवताहेत, एका कोपऱ्यात आनंद इंगळेच्या शब्दांवर हशा आणि टाळय़ा पिकताहेत, एका टेबलावर हृषीकेशने रमीचा डाव मांडलाय तर खालच्या मजल्यावरील आलिशान थिएटरमध्ये मानसी नाईकची जोरदार नृत्य तालीम सुरू आहे.. पण ही पुण्या-मुंबईची किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या ठिकाणावरील दृश्ये नाहीत. साडेचार हजारहून अधिक प्रवाशांना घेऊन युरोपच्या भूमध्य समुद्रातून सफर करणाऱ्या एका क्रूझवरचं हे चित्र होतं. इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल अर्थात इम्फाच्या पुरस्कार सोहळय़ाच्या निमित्ताने या क्रूझवर जमलेल्या कलाकार मंडळींनी एक, दोन नव्हे तब्बल आठ दिवस अशीच धम्माल मस्ती केली.
‘इम्फा’ पुरस्कार सोहळय़ाच्या दुसऱ्याच वर्षांत आयोजकांनी मराठी तारे-तारकांचा मेळा घेऊन थेट युरोपच्या समुद्रातच धडक मारली. स्पेन, इटली आणि फ्रान्सच्या किनाऱ्यांवरून सफर करणाऱ्या नॉर्वेजियन एपिक या क्रूझवर यंदाचा ‘इम्फा’ सोहळा रंगला होता. त्यानिमित्ताने तब्बल आठवडाभर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासह चित्रपट पुरस्कार सोहळय़ाची आयोजक मंडळी अशी एकूण साडेचारशे ते पाचशे जणांचा या क्रूझवरच मुक्काम होता. या काळात क्रूझवरील मराठमोळे वातावरण पाहून मुंबईजवळच्या अरबी समुद्रातच ही सफर सुरू असल्याचा भास होत होता.
स्पेनमधील बार्सिलोना शहराच्या बंदरातून क्रूझवर दाखल झालेल्या मराठी कलाकार मंडळींनी आपापल्या खोल्यांसोबतच क्रूझच्या १५ व्या मजल्यावरील ओपन डेकचाही ताबा घेतला. ओपन डेकवरील खुच्र्यावर ठाण मांडून बसलेल्या कलाकार मंडळींच्या हास्यविनोद गप्पांना दररोज मध्यरात्रीर्पर्यंत रंग चढत होता. या भागाचे कलाकार मंडळींनी ‘कट्टा’ असे बारसेच केले होते. आनंद इंगळे, संजय नार्वेकर, पंढरीनाथ कांबळी, सचिन पिळगावकर, बाप्पा जोशी, दिग्दर्शक रवी जाधव, स्वप्निल बांदोडकर ही या कट्टय़ावर हमखास दिसणारी मंडळी. एकमेकांच्या थट्टामस्करीपासून सिनेचर्चेपर्यंत, कधी पत्त्यांचा डाव मांडत तर कधी मद्याची मैफील रंगवत हा ‘कट्टा’ बहरलेला दिसत असे. ‘या कट्टय़ावर सगळे न सांगता कुणीही कोणाशी न ठरवता सगळे एकत्र जमायचे. मस्तपैकी कॉफी व्हायची, गप्पांची मैफील व्हायची. हा अनुभव विलक्षण होता,’ असे दिग्दर्शक रवी जाधव यांनी या मैफिलीबद्दल सांगितले.

Untitled-6

स्विमिंग पूलमधील मौजमजा
समुद्रावरील तापमानाचा पारा १४ अंशांच्या खाली गेला असतानाही ओपन डेकवरील स्विमिंग पूल आणि वॉटर राइडपासून दूर राहणे कोणालाही शक्य नव्हते. प्रवासाच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धार्थ जाधव, सुशांत शेलार, सोनाली कुलकर्णी, तेजस्वीनी पंडित, मानसी नाईक, पूजा सावंत, अनिकेत विश्वासराव, अंकुश चौधरी यांनी या स्विमिंग पूलमध्ये डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेतला. या पूलमधील पाणी गरम होते. मात्र त्यातून बाहेर येताच ओल्या शरीरावर होणाऱ्या हवेच्या माऱ्यामुळे अक्षरश: गारठल्यासारखे होत होते. पण तरीही कलाकारांचा उत्साह कमी होत नव्हता.
खाण्यावर सारेच फिदा
या १६ मजली क्रूझवर डझनभर रेस्टॉरन्ट आहेत. या प्रत्येक रेस्टॉरंटमधील जेवणावर सारेच फिदा झाले होते. त्यातही १५व्या मजल्यावरील ‘गार्डन कॅफे’मध्ये तर विविध देशांच्या विविध खाद्यसंस्कृतींतील पदार्थाची २४ तास रेलचेल होती. त्यामुळे बहुतेक जण या रेस्टॉरन्टच्या प्रेमात पडले होते. यासंदर्भात् अभिनेत्री पूजा सावंतची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. ती म्हणते, ‘‘इथलं जेवण इतकं छान आहे की बाहेर फिरायला जरी गेलं तरी मी तेथे जास्त काही खात नाही. कारण मला क्रूझवर येऊन इथे पोटभर जेवायचं असतं.’’ पिझ्झा हा इटलीत जन्मलेला पदार्थ. साहजिकच खवय्यांसाठी क्रूझवर पिझ्झाचे अनेक प्रकार उपलब्ध होते. ‘मी खरं तर अस्सल मांसाहारी आहे. पण येथे आल्यापासून मी पिझ्झाच्या प्रेमात पडली आहे. पिझ्झा आणि आइस्क्रीम या दोन पदार्थाशिवाय मला बाकी काहीही नसलं तरी चालेल,’ असंही पूजा म्हणाली.

कॅसिनो ते डिस्को
नॉर्वेजियन एपिक क्रूझचा एक अर्धा मजला कॅसिनो अर्थात जुगारातील विविध खेळांनी व्यापलेला आहे. दिवसभर येथे गजबज असायचीच. पण संध्याकाळनंतर खरे डाव रंगायला सुरुवात होत होती. काही मराठी कलाकारांनी येथे आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्नही केला. पण ते अपयशी ठरले. अर्थात इतक्या मोठय़ा कॅसिनोमध्ये खेळण्याचाच आनंद न्यारा आहे, असे एका अभिनेत्याने सांगितले.
क्रूझवरील वातावरण इतके मोकळे असायचे की, कुठेही गेलं तरी संगीत आपली साथ सोडत नाही. तुम्ही लिफ्टच्या भागात असा, ओपन डेकवर असा की रेस्टॉरन्टमध्ये असा, छतावरील स्पीकरमधून संगीताचे सूर कानी पडायचेच. शिवाय या ठिकाणी एक दोन ठिकाणे खास नृत्यासाठी होती. तेथेही अनेकांनी नृत्याचा आनंद घेतला.