नीलेश अडसूळ

‘हरिदासाची कथा मूळ पदावर’ ही म्हण आपल्याला सुपरिचित आहे. तशीच काहीशी गत आपल्या मालिकांची आहे. यात दोष मराठी मालिकांचा नाही, तर एकंदर मालिकाविश्वच या म्हणीची अनुभूती घडवून देणारे आहे. टाळेबंदीनंतर सुरू झालेली मालिकांची यात्रा काहीशी रंजक असेल, ट्विस्ट घडवणारी असेल असे वाटले होते खरे. पहिले दोन आठवडे तसे झक्कास गेलेही; पण आता पुन्हा घरगुती क्लेशाची घरघर मालिकांना लागली आहे.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

मालिका सुरू होऊन दोन आठवडे उलटले. श्रावणसरी बरसून झाडे स्वच्छ लकाकू  लागल्यासारखे हे दिवस गेले; पण आता मात्र नेहमीचीच पानझड सुरू झाली. सासू-सुनांची भांडणं, नवरा-बायकोचा प्रणय, तिसऱ्याच्या येण्याचे दोघांत वाद वगैरे वगैरे.

कहीं पे निगाहे कहीं पे निशाना.. अशी काहीशी गडबड झालेल्या वैभवच्या आयुष्यात अवनीऐवजी अंजीशी लग्न करायची वेळ आली आहे. या लग्नाच्या निमित्ताने त्या दोघांची गाठ बसणार असली तरी मामीनामक संकट मोरे परिवाराच्या पदरी पडणार आहे. आता या लग्न प्रसंगात एक दृश्य असे घडणार आहे जे जागतिक कल्पित आहे. ते म्हणजे प्रियकराच्या लग्नात प्रेयसीची एन्ट्री. पुढे काही वेगळ्याने सांगायला नको. फक्त ती मंडपात कशी आली, तिला कोणी फूस लावली याचा उलगडा या आठवडय़ात होईल. बरं आता ती आली खरी; पण नुसतीच परत जाईल की वैभवशी लग्न करूनच जाईल हे कळण्यासाठी मात्र आपल्याला स्टार प्रवाहवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका पाहावी लागेल. याच वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’मध्ये कार्तिक-दीपाचे लग्न झाले असले तरी त्यांचा संसार सुखाचा होईल अशी चिन्हे दिसत नाहीत. आता तर चक्क गुरुजींनी एक भविष्यवाणी केली आहे, त्यानुसार कार्तिक-दीपाने पुढचे पंधरा दिवस तरी एकत्र येऊ नये नाही तर कार्तिकच्या जिवाला धोका असेल. हे ऐकल्यानंतर मात्र गुरुजींचा शोध घ्यावासा वाटतो आहे. कारण अशा भविष्यवाणीचा देशसंरक्षणासाठी उपयोग करून घेता आला तर.. संकल्पना चांगली आहे, फक्त आता भविष्यवाणी खरी होते आहे का हे पाहू या.

तरुणींच्या मनातलं ‘फुलपाखरू’ यशोमान आपटे आता आनंदीच्या आयुष्यात रंग भरायला येणार आहे. मोठी झालेली आनंदी आता राजकुमाराची स्वप्न पाहू लागल्याने वाहिनीने थेट गोंडस राजकुमार आनंदीसाठी तयार केला आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ात सोनी मराठीवरील ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत नव्या प्रेमकथेचा आगाझ होणार आहे, तर सरकारच्या विरोधात कारवाया करण्याबद्दल बंडखोरीच्या संशयात सापडलेल्या जोतिरावांची कशी सुटका होईल हे ‘सावित्रीजोती’च्या आगामी भागात कळेल. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेत संशयाची नांदी झाली आहे. मालिकांमध्ये होणारा टिपिकल दोघात तिसरा हा संशयकल्लोळ आता उदय आणि पूर्णाच्या आयुष्याला कोणता रंग देईल हे मात्र लवकरच कळेल.

एरव्ही स्त्रियाच कुरघोडी करतात असा पायंडा मालिकेबाबत असायचा, पण स्त्रियांनाही मागे टाकेल अशा कुरघोडी सोहम करतो आहे. नाना क्लृप्त्या, नाना युक्त्या. त्यामुळे रडगाणे तेच असले तरी सोहमच्या युक्त्या काही थांबत नाहीत. आसावरी सुधारेल या आशेने लोकांनी टीव्ही लावला खरा, पण तिचा सोशीकपणा आता लोकांना आंधळेपणा वाटू लागला आहे. गेल्या आठवडय़ात सोहमने शुभ्राला घराबाहेर काढण्याची तयारी केली होती. येत्या आठवडय़ात तो अभिजित राजेंना घराबाहेर काढणार आहे. त्यामुळे नेमके याला घरात कोण राहणे अपेक्षित आहे हेही अजून स्पष्ट झालेले नाही. आता अभिजित खरंच घराबाहेर पडणार की सोहमचे घोळ निस्तरत घरीच राहणार हे झी मराठीवरील ‘अगं बाई सासूबाई’ मालिकेच्या पुढच्या भागांत दिसेल, तर ‘माझा होशील ना’ या मालिकेत मात्र प्रेमकथा आणि त्यामागचे गूढ अगदी अलगद उलगडलं जातं आहे. श्रीमंत घरात वाढलेली सई आणि मामांच्या शब्दात असलेला आदि यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सईला प्रेमापासून मागे ओढणारी तिची आई नेमकी प्रेमाला का विरोध करते आहे हे आता कळू लागले आहे. एवढेच नव्हे तर तिच्या आईचे अर्धवट राहिलेले प्रेम कोण आहे याचाही अंदाज प्रेक्षकांना आला आहे. मैत्रीच्या पलीकडे जाणाऱ्या प्रेमाची अद्याप त्या दोघांना जाणीव झालेली नाही. ती जाणीव घट्ट होईल की विरत जाईल हे मात्र त्यांच्या कुटुंबीयांवर ठरेल. कारण आदि आणि सई यांच्या प्रतिमा एकमेकांच्या घरच्यांसमोर पुरत्या नकारात्मक होणार आहेत. आता त्या कशा होतील हे पाहण्यासाठी मात्र मालिका पाहावी लागेल.

तर कलर्स मराठी वाहिनीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत अनुने गोड बातमी दिली खरी, पण अनु आई होऊ शकत नाही हे सत्य सिद्धार्थ जाणतो. आता तो हे अनुपर्यंत कसे पोहोचवणार आणि त्यानंतरची तिची अवस्था हे या आठवडय़ाचे चित्र असेल, तर ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत पत्रिकेवरून क्लेश सुरू होणार आहे. लग्नासाठी संजूची खरी पत्रिका लपवून खोटी पत्रिका समोर केली खरी, त्यातही दोष निघाला आहे. आता ही पत्रिका आईसाहेबांच्या हाताला लागल्याने तिची शांती करण्याचा घाट घातला जातो. आता हा यशस्वी होतोय की खरी पत्रिका समोर येतेय हे लवकरच कळेल; पण खरी पत्रिका समोर आली तरी संजूच्या मागचा संकटाचा तगादा काही थांबणार नाही. ‘नवी उमेद नवी भरारी’ असे नवे शीर्षक ‘कलर्स मराठी’ने घेतले आहे. त्यासाठी खास कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून अवधूत गुप्ते, महेश काळे, सचिन पिळगावकर, आदर्श शिंदे, सुमित राघवन असे अनेक दिग्गज कलाकार यात सामील होणार आहेत. आज सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल.