एकपानी कथेच्या जोरावर सलग वर्ष-दोन र्वष चालणारी मालिका तयार करण्याचं कसब गेल्या दशकभराच्या काळामध्ये टीव्ही मालिकांना सहजपणे जमू लागलंय. त्यांच्या या सवयीची पूर्ण कल्पना असूनही प्रेक्षकांनी ही गोष्ट आनंदाने स्वीकारली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या संगनमताने लांबचलांब मालिकांचं सूत्र वर्षांनुर्वष rv10सुरू राहतं. सध्या या सूत्राला बडय़ा सोहळ्यांची साथही मिळू लागली आहे. मालिकेच्या मूळ कथानकाचा जीव छोटासा असतो. कथानक संपले तर मालिकेला काहीच अर्थ राहात नाही. हे ठाऊक असल्यामुळे या कथानकाला एपिसोडगणिक फाटे फुटत जातात. पण एका ठरावीक क्षणाला कथानकाचा शेवट करण्याची वेळ येऊन ठेपते तेव्हा तितक्याच भव्य सोहळ्याचे आयोजन करतात. सध्या टीव्हीवरील अनेक मालिका याच सोहळ्यांच्या गडबडीत गुंतल्या आहेत.
गोष्टीच्या शेवटी राजा-राणी सुखाने नांदू लागतात, हे सर्वानाच ठाऊक असतं. पण हे एका वाक्यात सांगायचं की शंभर भागांच्या मालिकेत? हे गोष्ट रंगवणाऱ्या कथाकाराचं कौशल्य असतं आणि ते मालिकाकर्त्यांना सुंदर रीतीने जमतं. ‘इतना करो ना मुझसे प्यार’चे मूळ कथानक एकमेकांपासून दुरावलेलं जोडपं नचिकेत आणि रागिणी यांना एकत्र आणणं हे होतं. त्यानुसार मालिकेची सुरुवात त्यांच्या विभक्त होण्यापासून, त्यांचा एकमेकांसाठीचा द्वेष, मुलांची ताटातूट, दोघांच्या पुनर्विवाहाच्या निर्णयाभोवती फिरत होती. त्यात नचिकेतच्या बहिणीचा रागिणीविषयी कारण नसताना असलेला राग, त्यांच्या मुलीच्या लग्नात येणारी असंख्य विघ्ने, मुलांमुळे ओढवलेली संकटं या सगळ्यातून वेळ काढताना त्यांचं दोघांच्या नात्याकडे दुर्लक्ष झालं. पण कालांतराने नचिकेतने मानलेल्या मुलीची डीएनए चाचणी, त्यावरून रागिणीला त्याच्या चारित्र्याविषयी पटलेली खात्री आणि नंतर त्यांच्यात शाहरुख-काजोलप्रमाणे काही सिनेमॅटिक गाणी चित्रित झाल्यावर आता त्यांना जवळ आणलं गेलं. ‘ये है मोहोबत्ते’मध्ये इशिता-रमणमध्ये लग्नानंतर फुलणारं प्रेम आणि रमणच्या मुलांनी इशिताला आई म्हणून स्वीकारणं हा कथानकाचा पाया होता. पण त्यादरम्यान दोघांच्या बहीणभावांची प्रेमप्रकरणे, त्यांची जोडणारी आणि मोडणारी लग्नं याभोवतीच मालिका फिरत राहिली. आता त्याची पहिली बायको मुलांना ऑस्ट्रेलियाला घेऊन जात असताना घराला आग लागणार, त्यात अडकलेल्या मुलांना सोडवणारी इशिता त्यांच्यासाठी थोर ठरणार असा मोठा घाट घातला गेलाय. सुदैवाने मागच्या वेळी या मालिकेच्या सेटवर खरी आग लागल्यामुळे ते फुटेज निर्मात्यांकडे आहे. त्यामुळे यंदाचा आगीचा प्रसंग कमी खर्चीक होईल, अशी आशा करायला हरकत नाही. पण खरं तर मुंबईमध्ये घरांची कमतरता असताना एकाच मालिकेत सतत घर जळणं हेही असामान्यच आहे. ‘निशा और उसके कझिन्स’ मालिका सुरुवातीपासून निशाच्या प्रेम आणि लग्न याबद्दलच्या नकारात्मक संकल्पनेभोवती धुटमळत होती. त्यासाठी तिला पहिल्यांदा प्रेमात पडल्याचं दाखविलं गेलं. त्यानंतर प्रेमभंग, नंतर रोडट्रिप, तिथे अचानक झालेलं लग्न हे सर्व झाल्यावर तिला ‘खऱ्या प्रेमाचा’ साक्षात्कार झालाय. मुळात लग्न, प्रेम यांच्या पलीकडे आपल्या कामाला महत्त्व देऊन, आई-वडिलांची जबाबदारी उचलणारी मुलगी ही प्रतिमा अजूनही मालिकाकारांना पटत नसल्याचं स्पष्ट दिसतं. ‘कुमकुमभाग्य’ची गोष्टही काही वेगळी नाही. प्रग्याला तिचं खरं प्रेम मिळवून देणं हे मालिकेचं कथानक होतं. पण त्या गोंधळात अचानकपणे तिचं लग्न रॉकस्टारशी झालं. इतके दिवस त्यांच्यात चाललेल्या अर्थहीन भांडणांवर हसावं की रडावं, हेच प्रेक्षकांना कळतं नव्हतं. त्या दोघांना एकमेकांवरील प्रेमाची सत्यता पटवून देण्यासाठी अपहरणाचा घाटही निर्मात्यांना घालावा लागला. पण तेवढय़ात त्याच्या प्रेयसीच्या गरोदरपणाची बातमी आली आणि सर्व मुसळ केरात गेलं.
‘जय मल्हार’मध्ये सुरुवातीपासून मालिका बानू आणि खंडोबा यांच्या लग्नावर आधारित असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण त्यापूर्वी म्हाळसा आणि खंडोबांचं लग्न, बानूची खंडोबांना मिळविण्यासाठीची तपश्चर्या यामध्ये बराच काळ लोटला. यथावकाश भारतीय संस्कृतीप्रमाणे तब्बल २५ लाखांचा महागडा लग्नसोहळा पार पाडून बानू आणि खंडोबांचं लग्न झालं आहे. आता मालिकेत म्हळसा आणि बानूच्या संघर्षांची खरी कथा सुरू होईल.
 ‘असे हे कन्यादान’ मालिकेचं मूळ कथानक होतं वडील-मुलीचं नातं आणि त्यात तिच्या जोडीदाराच्या प्रवेशाने होणारी वडिलांची घालमेल यावर. इतकी स्पष्टता असूनही मालिका सुरू झाल्यापासून गायत्रीच्या कॉलेजमधील नृत्यस्पर्धा आणि त्यासाठी तिचा सराव, वडील सदाशिव कीर्तने यांच्या कामातील प्रामणिकपणाची उदाहरणं यांच्याभोवती फिरत होती. मध्येच कार्तिकला अचानकपणे गायत्रीवर असलेल्या प्रेमाची खात्री पटते आणि तो तिच्या वडिलांचं मन जिंकण्याची खटपट सुरू करतो. आता सरतेशेवटी मालिकेत तिच्या स्पर्धेचा दिवस येऊन ठेपला आहे. त्यासाठी भव्यदिव्य सेट उभारून साग्रसंगीतपणे स्पर्धा पार पाडली जाणार आहे. त्यानंतर त्यांचं प्रेमप्रकरण, तिच्या वडिलांची त्यात भूमिका या सर्व घटनाक्रमाला हात लावला जाईल. ‘होणार सून मी या घरची’मध्येसुद्धा अखेर श्री-जान्हवीचा दुरावा संपणार आहे.
 सरतशेवटी श्रीला तो वडील होणार असल्याचं कळणार आहे. पण हे सहज कळून कसं चालेल? त्यासाठी योगा सेंटरमध्ये खास कार्यक्रम आई-आजीच्या देखरेखीत होणार आहे. त्यामुळे याही मालिकेचं कथानकं पूर्णत्वास जाईल. एरवी गोष्टीत असा सोहळा
झाला की गोष्ट संपल्याचं कळतं. पण मालिकांच्या विश्वाला हे सूत्र लागू होत नाही. हे मोठे सोहळे म्हणजे नव्या कथानकाची नांदी असतात. त्यामुळे मालिका पुढे चालत राहणार हे ठरलेलं ..