धारदार आवाज आणि अभिनयशैलीच्या जोरावर कलाविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये. कोणतीही भूमिकेची काळजीपूर्वक निवड करणाऱ्या या अभिनेत्याने आजवर अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कायम विविध भूमिकांना प्राधान्य देणारा हा अभिनेता पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘प्रीतम’ या आगामी चित्रपटात उपेंद्र लिमये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून या चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो एका गायकाच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये उपेंद्र हार्मोनिअम वाजवताना आणि गाणं म्हणताना दिसून येत आहे. ‘पावलो म्हसोबा रे’ ‘धावलो पिसोबा रे’ असे बोल असलेलं एक गाणं उपेंद्र आणि प्रणव रावराणे यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. त्याच गाण्यातील उपेंद्रचं हे पोस्टर आहे.या गाण्यातून कोकणातल्या संस्कृतीच दर्शन घडवतानाच प्रेमाचा व आपुलकीचा रंगही जाणवतो.

दरम्यान, ‘प्रीतम’ हा बहुचर्चित ठरत असलेला चित्रपट १९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमयेसोबत प्रणव रावराणे आणि नक्षत्रा मेढेकर ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसंच अजित देवळे, विश्वजीत पालव, समीर खांडेकर, आभा वेलणकर, शिवराज वाळवेकर, अस्मिता खटखटे, नयन जाधव, आनंदा कारेकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.