आपल्याकडे दिवाळी, दसऱ्यापेक्षा इतर काही महत्त्वाचं असेल तर ते ‘लग्नाचे मुहूर्त’. ज्याक्षणी घरातल्या थोऱ्यामोठय़ांना लग्नाचे मुहूर्त जवळ येण्याची चाहूल लागते तेव्हा ते वयात आलेल्या मुलांच्या मागे लग्नाचा ससेमिरा लावतात. आपल्याकडे लग्नसोहळे कोणत्याही सणापेक्षा कमी नसतात. त्यामुळे लग्नांचे मुहूर्त मालिकावाल्यांनाही चुकवून चालत नाहीत. मोठमोठे सेट, भरजरी कपडे आणि दागिने, गाणी यांमध्ये मालिकांचे काही भाग सहज ढकलता येतात. त्यामुळे सध्या टीव्ही वर पात्रांच्या जोडय़ा जुळवण्याची खटपट चालू आहे. त्यात पहिलं, दुसरं नाहीतर दहावं लग्न करावं लागलं तरी मालिकेला टीआरपी मिळवून देण्यासाठी ते पथ्यावरच पडत असल्याचा अनुभव वाहिन्यांना येतो आहे.
लग्नाचा विषय निघताच ‘जय मल्हार’चा विषय पहिल्यांदा निघतो. या मालिकेची कथाच मुळात खंडोबाचे बानूशी लग्न या विषयाभोवती आहे. गेल्या आठवडय़ात खंडोबा आणि बानूचं थाटामाटामध्ये लग्न पार पडलं. आता बानूची तपश्चर्या पूर्ण झाली असली तरी खंडोबाची सत्त्वपरीक्षा सुरू झाली, असे म्हणायला हरकत नाही. खंडोबाच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळताच म्हाळसेचा पारा चढला आहे. तिने बानूला जेजुरी गडावर येण्यास बंदी घातली आहेच, पण खंडोबांनाही गड सोडून जाण्यास बंदी केली आहे. त्यामुळे आता बानू आणि खंडोबाच्या भेटीसाठी नवनवीन शकला लावण्याची खटपट सर्व करू लागले आहेत. एकीकडे या दोघांना एकत्र येत असतानाच दुरावा सहन करावा लागतो आहे. तिकडे ‘साथिया’मध्ये मालिका काही वर्षांनी पुढे गेल्यावर अहम आणि गोपीची ताटातूट झाली आहे. सध्या त्याची मैत्रीण गोपीशी स्पर्धा करतेय. कारण, तिलाही अहमशी लग्न करायचंय. पण, कोकीला मात्र अहम आणि त्याच्या मुलींना या आठवडय़ापर्यंत गोपीचा खरेपणा पटवून देण्यात यशस्वी होईल. त्यामुळे आता तो काय निर्णय घेतोय यावर मंडपात कोण उभं राहील हे ठरेल.
‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’मध्ये तर सध्या ‘लग्न लग्न’ हा खेळच सुरू आहे. आरवचं अंकिताशी, अंकिताचं कोण्या दुसऱ्याशी, आरवचं ईश्वरीशी कितिंदा लग्न होतंय काहीच समजायला मार्ग नाही. नुकतीच आरवची स्मरणशक्ती गेली आहे. त्याचा फायदा घेत अंकिताने पुन्हा त्याच्याशी लग्न करण्याचा घाट घातला होता. पण, त्याने तिचा डाव फसवला आहे. हा खेळ सध्या ‘ये है महोबत्ते’मध्येही सुरू आहे. रमण इशिताचं लग्न झाल्यापसून ते दोघं इतरांचे लग्न करून देण्याचा घाट घालत आहेत. त्यामुळे आधी मिहीर मग रिम्मीच्या लग्नाच्या मागे ते लागलेत. यापुढे मिहिकासुद्धा रांगेत आहेच. तिचं या आधी एक लग्न झालंय. पण, परत लग्न करायला मालिकांमध्ये काहीच हरकत नसते. सध्या मालिकेत आलेला एसीपी तिच्यासोबत घुटमळताना दिसतोय. त्यामुळे या मालिकेतील लग्नांचा सिलसिला काही केल्या संपणार नाही हे नक्की.
‘मेरी आशिकी तुमसे ही’मध्ये इशानी अजूनही रणवीरपासून दूर पळतेय. त्याचं कारण मात्र त्यांना अजूनही कळतच नाही आहे. ते कारण समजल्यावर आणि ते एकत्र आल्यावर त्यांचंही लग्न होणार आहे. ‘इतना करो ना मुझसे प्यार’मध्ये नचिकेत आणि रागिणीमधले सर्व गैरसमज दूर झालेत आणि ते परत लग्न करण्याच्या बेतामध्ये आहेत. त्यामुळे सध्यातरी लग्नाचे मुहुर्त आहेतच म्हणून आयती संधी का सोडा?, या विचाराने मालिकाही लग्न कार्यामध्ये गुंतल्या आहेत. पण, या ‘शुभमंगल’च्या खेळामध्ये प्रेक्षकांवर ‘सावधान’ म्हणण्याची पाळी येऊ नये म्हणजे मिळवलं.
संग्रहित लेख, दिनांक 17th May 2015 रोजी प्रकाशित
शुभमंगल ‘सावधान’
आपल्याकडे दिवाळी, दसऱ्यापेक्षा इतर काही महत्त्वाचं असेल तर ते ‘लग्नाचे मुहूर्त’. ज्याक्षणी घरातल्या थोऱ्यामोठय़ांना लग्नाचे मुहूर्त जवळ येण्याची चाहूल लागते तेव्हा ते वयात आलेल्या मुलांच्या मागे लग्नाचा ससेमिरा लावतात.

First published on: 17-05-2015 at 12:29 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriages in serials