संपूर्ण डिसेंबर महिना विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या आणि रिसेप्शनच्या बातम्यांनीच गाजला. २१ डिसेंबरला दिल्ली येथील ताज हॉटेलमध्ये त्यांनी पहिले रिसेप्शन दिले. या रिसेप्शनला अनुष्काने लाल रंगाची साडी नेसली होती. या लाल साडीला सोनेरी रंगाची बॉर्डर होती. अनुष्काची ही साडी काहींना आवडली तर काहींनी नाकं मुरडली. पण ही साडी तयार करायला किती मेहनत लागली हे जर तुम्हाला कळले तर तुम्हीही थक्क व्हाल.

ही साडी तयार करायला तब्बल ६ महिने लागले. ही साडी नेसून जेव्हा अनुष्का स्टेजवर आली तेव्हा साऱ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या यात काही शंका नाही. तिची ही साडी तयार करणारेही बॉलिवूडमध्ये तेवढेच प्रसिद्ध आहेत. ही साडी दिल्ली किंवा मुंबईमध्ये तयार करण्यात आली नसून बनारसमध्ये ही साडी विणली गेली.

रिपोर्ट्सनुसार, एकाच वेळी तीन कारागिरांनी ही साडी विणली. साडी विणताना तिन्ही कारागिरांची उपस्थिती आवश्यक असे. साडी विक्रेत्याच्या मते, अशा पद्धतीची साडी विणताना एखादा कारागीर जरी अनुपस्थित राहीला तर काम पुर्ण होऊ शकत नाही. त्या दिवशी कारखाना बंद ठेवावा लागतो.

मुअज्जम अंसारी आणि अब्दुल मजीद या दोघांनी मिळून ही साडी विणली आहे. तिसऱ्याचे नाव अजूनपर्यंत स्पष्ट झाले नाही. ही साडी अनुष्कासाठी विणत आहोत याची त्यांना पूर्वकल्पना नव्हती. जेव्हा त्यांनी टीव्हीवर अनुष्काला या साडीत पाहिले, तेव्हा त्यांनी या साडीचे फोटो फेसबुकवर शेअर केले. अनुष्काच्या या साडीमुळे या दोन्ही व्यक्ती एका रात्रीत प्रसिद्ध झाल्या. सध्या अंसारी आणि मजीद दोघंही फार खूश असून साडी विक्रेता मकबूल हसन यांच्याही आनंदाला पारावार उरलेला नाही. ही साडी विणताना खऱ्या जरीचा अर्थात सोन्याचा वापर करण्यात आला आहे. पाच लाख रुपयांपासून अशा साड्यांच्या किंमतीची सुरूवात होते.

अनुष्काच्या आधी ऐश्वर्या राय बच्चनची साडी आणि अभिषेक बच्चनची शेरवानीही इथूनच मागवण्यात आली होती. तसेच अमिताभ बच्चननी त्यांच्या अनेक शाली इथूनच मागवल्या आहेत.