हिंदी सिनेमासृष्टी गाजवलेल्या अभिनेत्यांमध्ये देवेन वर्मा हे एक प्रमुख नाव. पुण्यात २ डिसेंबरला त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी देताना प्रसारमाध्यमांनी त्यांचा उल्लेख विनोदी अभिनेता असा केला. देवेन वर्मा हे उत्तम कॉमेडियन होतेच, मात्र त्यांच्यावर केवळ तसा शिक्का बसणं दुर्दैवीच.
अभिनयाची ओढ माणसाला कुठे घेऊन जाईल, हे कोणी सांगू शकत नाही. त्यात हे वेड नाटकांत काम करण्याचं असेल, तर बघायलाच नको. राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात पदवी मिळविलेला एक तरुण उपजत कलागुणांच्या बळावर नाटकांत आणि कालांतराने सिनेमासृष्टीत मोठी झेप घेईल, असं कोणी सांगितलं तर खरं वाटणार नाही, मात्र देवेन वर्मा या तरुणाच्या बाबतीत ते घडलं. देवेन हे मूळचे गुजरातचे, त्यांचे कुटुंब स्थायिक झालं पुण्यात. बालपण व शिक्षणही पुण्यातच. पुढे हौशी नाटकांमधून देवेन काम करू लागले. योग असा की, त्यांची एक भूमिका प्रसिद्ध दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या पाहण्यात आली. देवेनचं काम चोप्रांच्या नजरेत भरलं आणि त्यांनी थेट सिनेमाची ऑफर दिली. हा सिनेमा म्हणजे १९६१ मध्ये आलेला ‘धर्मपुत्र’. सिनेमा चालला नाही तरीही देवेनचा चंचूप्रवेश यशस्वी ठरला. देवेन देखणे होते, वाचनही अफाट, त्यामुळे व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास होता. चोप्रांच्याच ‘गुमराह’ या गाजलेल्या सिनेमात त्यांना पहिली विनोदी भूमिका करण्याची संधी मिळाली. अशोककुमारच्या नोकराची ती भूमिका फार लांबीची नव्हती, मात्र भोळसट चेहऱ्याने विशिष्ट प्रकारे संवादफेक करण्याची त्यांची शैली प्रेक्षकांना आवडली. एका भावी कॉमेडियनची ही नांदी असली तरी लगेचच त्यांच्यावर तशा भूमिकांचा वर्षांव झाला नाही. उलटपक्षी, सेकंड हिरोच्या भूमिका त्यांना मिळू लागल्या. हृषीकेश मुखर्जी यांचा ‘अनुपमा’ आणि मोहन सगल यांच्या ‘देवर’ या सिनेमांत ते शर्मिला टागोरचे सहनायक होते. दोन्ही सिनेमांत मुख्य नायक धर्मेद्र होता. बाळबोध अभिनय आणि एकसुरी संवादफेक असणाऱ्या धर्मेद्रच्या तुलनेत देवेन खरं तर उजवे, मात्र बलदंड शरीरयष्टीमुळे धर्मेद्रची नय्या पार झाली. ‘देवर’मध्ये तर देवेन यांची भूमिका काहीशी खलनायकी होती. लांडीलबाडी करून नायिकेला गटविणारा सहनायक त्यांनी उत्तम प्रकारे वठविला. यात मुकेशनं गायलेलं ‘बहारों ने मेरा चमन लुटकर, खिजाको ये इल्जाम क्यू दे दिया..’ हे एक अप्रतिम गीत आहे. धर्मेद्रच्या तोंडी असलेल्या या गीतात देवेन यांनी अप्रतिम मुद्राभिनय केला आहे. लबाडी पकडली गेल्यामुळे मनाची झालेली घालमेल त्यांनी देहबोलीतून ज्या प्रकारे व्यक्त केली आहे, ती दाद देण्यासारखीच. ‘अ‍ॅिक्टग इज रिअ‍ॅिक्टग’, हे मर्म त्यांना उमगल्याचं दिसतं. ‘मिलन’मध्येही नायिकेवर एकतर्फी प्रेम करणारा कॉलेजकुमार त्यांनी छान रंगविला आहे. ‘सावन का महिना’ या गाण्यासाठी नायिकेला जेव्हा पहिलं बक्षीस मिळतं, तेव्हा तिचं अभिनंदन करताना हा प्रेमी लोचटपणे तिला म्हणतो, ‘‘तुम्ही जिंकावं म्हणूनच मी स्पध्रेत भाग घेतला नाही.’’ rv20हा प्रसंग पाहाताना प्रेक्षकांना हसूही येतं आणि रागही येतो. देवेन यांच्या अभिनयाला मिळालेली ही पावतीच.
यानंतरही ‘बहारे फिर भी आएंगी’, ‘मोहब्बत जिंदगी है’, ‘खामोशी’ या सिनेमांत त्यांना चांगल्या भूमिका मिळाल्या. पुढे मात्र ‘बुढ्ढा मिल गया’पासून त्यांच्या वाटय़ाला विनोदी भूमिकाच अधिक आल्या, मात्र यातही त्यांनी स्वतंत्र शैली जोपासली. अचकट-विचकट विनोद करणं त्यांनी टाळलं. अंगविक्षेप, चित्रविचित्र हालचाली करून हशे वसूल करण्याची त्यांना गरज नव्हती. निरागस चेहरा करून विनोदनिर्मिती करणं त्यांना सहजसाध्य होतं. त्यामुळेच ‘नादान’ (१९७१), ‘चोर के घर चोर’ (१९७९) आणि ‘अंगूर’ (१९८३) साठी त्यांना विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार लाभला. ‘अंगूर’मधली दुहेरी भूमिका तर त्यांच्या कारकीर्दीतली सर्वोत्तम भूमिका ठरावी. गुलजार यांच्या या सिनेमात संजीवकुमार यांचीही दुहेरी भूमिका होती. संजीवकुमार यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर ते कमी पडले नाहीत, उलट त्यांचं मेतकूट छान जुळून आलं.
नायक-दिग्दर्शकांची पिढी बदलल्यानंतर त्यांनी काहीसं अंग काढून घेतलं. या कालावधीतही ‘चमत्कार’, ‘दिवाना’, ‘अंदाज अपना अपना’, ‘दिल तो पागल है’ आदी सिनेमांत त्यांनी धमाल केली. ‘अंदाज अपना अपना’मध्ये आपल्या ‘गुणी’ मुलाला ते जेव्हा, ‘तू जब जब खुश हुआ है, मैं बरबाद हुआ हँू’ असं म्हणतात, तेव्हा हसून-हसून मुरकुंडी वळते. मागणी असतानाही मनाप्रमाणे काम करता येत नाही म्हणून या चंदेरी दुनियेपासून दूर होण्याचं धारिष्टय़ त्यांनी दाखवलं. ‘अंगूर’चा हा बहादूर कायम स्मरणात राहील.