बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा रिअल लाइफमध्येसुद्धा तितकीच दबंग आणि खमक्या स्वभावाची आहे. अनेकदा ती तिच्या बेधडक वक्तव्यांसाठीही चर्चेत असते. बॉलिवूडमधल्या ‘कॅटफाइट’बद्दल बऱ्याचदा बोललं जातं. बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड, सगळीकडे नेहमीच स्त्रियांमध्ये भांडणं होत असल्याचं चित्र रंगवलं जातं. दोन अभिनेत्रींमधील धुसफूस, त्यांच्यातली कॅटफाइट, स्पर्धा असं सगळं गॉसिप चवीनं चघळलं जातं. पण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक असते आणि महिलांपेक्षा जास्त गॉसिप पुरुषच करतात, असं सोनाक्षीच म्हणण आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘कॅटफाइट फक्त अभिनेत्रींमध्येच होते असं नेहमी का म्हटलं जातं, हेच मला कळत नाही. खरंतर, पुरुषांमध्ये असुरक्षिततेची भावना जास्त असते आणि ते गॉसिपसुद्धा आमच्यापेक्षा जास्त करतात.’ तिच्या या वक्तव्यासाठी बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींनी तिची पाठ थोपटली आहे.

सोनाक्षीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, नुकतेच तिने ‘हॅपी भाग जाएगी २’चे शूटिंग पूर्ण केली. ‘हॅपी भाग जाएगी’ या चित्रपटाचा हा सिक्वल असून यामध्ये ती डायना पेंटीसोबत भूमिका साकारणार आहे.