रेश्मा राईकवार

मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर

लहान मुलांच्या निरागस नजरेतून मोठय़ा समस्यांकडे पाहिले तर त्या सहजसोप्या वाटतात, निदान त्यांच्या पद्धतीने त्या सोडवल्या तर कदाचित होईल सगळे नीट.. असे मूठभर बळ तरी मिळतेच. पण म्हणून प्रत्येकवेळी ते प्रश्न तितक्याच सहजपणे सुटतील असे नाही. हा खटकणारा सहजपणा सोडला तर आजूबाजूला कितीही गुंतागुंत असली तरी आपल्या दोघांचे वेगळे भावविश्व उभारणारी मायलेकांची जोडी आणि त्यांच्या जोडीने मुंबईतली कायम दुर्लक्षित राहिलेली झोपडपट्टी, तिथल्या समस्या आपल्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी अधोरेखित केल्या आहेत. अर्थात, या मांडणीला दु:खाची किनार न देता आहे त्यात सुखाने जगणारी आणि इतरांनाही तितक्याच आनंदाने जगता यावे यासाठी धडपडणारी माणसे या चित्रपटात दिसतात.

छोटा कन्हैय्या (ओम कनोजिया) आणि त्याची आई सरगम (अंजली पाटील) या दोघांची ही मुख्य गोष्ट आहे. सध्या सामाजिक विषयांना धरून त्याची मांडणी करणाऱ्या चित्रपटांची एकच लाट आली आहे. ‘मेरे प्यार प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपटही त्यामुळेच नवीन वाटत नाही, कारण देशभरात अनेक स्त्रियांना आजही बाहेर शौचासाठी जावे लागते. त्यांच्यासाठी शौचालय ही गरज आहे, हा विषय याआधी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातून व्यापक पद्धतीने मांडला होता. इथेही तीच समस्या आहे. मुंबईतील झोपडपट्टय़ांमधून राहणाऱ्या अनेक महिलांना पहाटेला उठून शौचासाठी रेल्वेलाइनच्या बाजूला किंवा पाइपलाइन्सची जागा जवळ करावी लागते. सरगम आणि तिच्या वस्तीतील स्त्रियाही अंधारात एकत्रित शौचासाठी बाहेर पडतात, यानिमित्ताने एकमेकांच्या कहाण्या उगाळतात. एके दिवशी उशिरा उठल्यामुळे एकटीच शौचासाठी बाहेर पडलेल्या सरगमवर बलात्कार होतो. बलात्कार काय हे कन्हैय्याला नीटसे समजत नसले तरी एका पुरुषाने वाईट वर्तन केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवलाय ही गोष्ट छोटय़ा कनूच्या लक्षात येते. आईच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणायचं असेल तर तिची समस्या मुळात दूर व्हायला हवी. तिच्यासाठी शौचालय बांधायला हवं हा विचार त्याच्या मनात मूळ धरतो आणि मग कनूचे आपल्या दोस्तांबरोबर प्रयत्न सुरू होतात. कथेचा जीव तसा छोटा आहे पण तरीही ही गोष्ट सांगण्याच्या ओघात मुंबईतील झोपडपट्टय़ांमध्ये नेत समाजात कायम दुर्लक्षित राहिलेला, आर्थिकदृष्टय़ा मागास असलेला हा खूप मोठा वर्ग आहे. या वास्तवावर पडलेली धूळ साफ करत दिग्दर्शकाने पुन्हा आपल्याला ते दाखवून दिले आहे.

मात्र केवळ या वर्गाचे अस्तित्व दाखवून देणे हा दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा उद्देश नक्कीच नाही. ज्या महात्मा गांधींनी याच समाजाला बरोबर घेत सत्य आणि अहिंसेच्या आधारे चळवळ उभी करत स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांची फक्त शांतचित्ताने बसलेली मूर्तीच या वस्त्यांमधून दिसते. इथे गांधीजींचा विचार हा प्रतीकात्मक का होईना, पण नोटेशीच अर्थकारणाशीच जोडला गेला आहे, या आणि अशा अनेक वास्तव गोष्टी दिग्दर्शक आपल्याला या मुलांच्याच माध्यमातून दाखवतो. एक दुर्दैवी घटना एका मुलाला थेट पंतप्रधानांकडे आपल्या आईसाठी शौचालय बांधण्याची मागणी करण्याचे बळ देते, त्याचे हे धाडस आईला जगण्याची नवी उमेद मिळवून देते. आणि व्यक्ती ते समष्टी या नात्याने हा सकारात्मक बदल सगळ्या वस्तीत झिरपतो, हा या कथेमागचा मुख्य विचार. हा सगळा भाग ज्या तरलतेने सरगम आणि कनूच्या नात्यातून येणे अपेक्षित होते, त्याच प्रभावी पद्धतीने चित्रपटातून येतो. या दोघांमधले अनेक प्रसंग आपल्याला हसवतात आणि डोळ्यांच्या कडा ओलावूनही जातात.

तरीही ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट खूप प्रभावी सामाजिक चित्रपट आहे, असे म्हणता येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कथेतील नावीन्याचा अभाव, छोटय़ांची हसरी खेळकर दुनिया आकर्षित करणारी आहे. मात्र या मुलांकडून सहजपणे केली जाणारी अमली पदार्थाची विक्री, कंडोमचा प्रसार आणि त्यापोटी सहजपणे मिळणारे पैसे, मुंबई ते दिल्ली प्रवास आणि थेट पंतप्रधान कार्यालयात त्यांचे पोहोचणे या सगळ्या गोष्टी नाही म्हटल्या तरी तितक्या सहजपणे होत नाहीत. इथे चित्रपटाचा वास्तवाशी असलेला धागा तुटक वाटतो. राकेश मेहरांचे दिग्दर्शन, त्यांची मांडणी आणि कलाकारांचा अभिनय ही खरोखरच या चित्रपटाची सुखावणारी बाजू आहे. अंजली पाटीलने साकारलेली सरगम एकाचवेळी हळवी, तेवढीच वास्तवाचे भान असलेली आणि आपली कुठलीही इच्छा न लपवता बिनधास्त वावरणारी अशा तिच्या वेगवेगळ्या छटा खूप उत्तम पद्धतीने रंगवल्या आहेत. ओम कनोजियासह सगळ्याच मुलांनी चोख काम केले आहे. नचिकेत पूर्णपात्रे, रसिका आगाशे, मकरंद देशपांडे, अतुल कुलकर्णी असे अनेक मराठी चेहरे असल्याने आपल्याला चित्रपट आणखी जवळचा वाटतो. या चित्रपटातील चांगूलपणाचा, माणुसकीचा भाव आपल्याला चित्रपटाशी जोडून ठेवतो मात्र याची मांडणी अधिक वास्तव पद्धतीने झाली असती तर हा चित्रपट अधिक अर्थपूर्ण ठरला असता!