वयाच्या ६७ व्या वर्षीदेखील मेरिल स्ट्रीप हिचे नाव ऑस्करच्या शर्यतीत सर्वोत्तम अभिनेत्रीच्या गटात या आठवडय़ात झळकले, तेव्हा आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नव्हते. आकडय़ांच्या भाषेत चारशेहून अधिक मानाच्या पुरस्कारांसाठी (त्यातली २० ऑस्करची) नामांकन मिळविणारी ही एकमेव अभिनेत्री आहे. नामांकन आणि पुरस्कार याबाबतचा मेरिल स्ट्रीप हिचा विक्रम कुणी मोडेल याची शक्यताच नाही; पण शिरस्त्याप्रमाणे तिचे नाव ऑस्कर स्पर्धेत घुसडले जात नाही, तर पडद्यावर लाभलेली भूमिका ‘शॅमेलियन’ वकुबाने निभावल्याची पावती तिला दरएक सिनेमात मिळते. ‘ज्युली अ‍ॅण्ड ज्युलिया’, ‘इनटू द वुड्स’ अशा कलात्मक व व्यावसायिकदृष्टय़ा दुसऱ्या फळीतील चित्रपटांनाही तिने केवळ आपल्या भूमिकांनी ऑस्करच्या दारात आणून ठेवले.

यंदा ते भाग्य  ‘फ्लॉरेन्स फॉस्टर जेन्किन्स’ या विचित्र चरित्रपटाला लाभले आहे. हॉलीवूडमध्ये दरवर्षी चरित्रपट येतात; पण त्यातले वैविध्य स्तिमित करणारे असते. ते लोकनायक- राष्ट्रपुरुषांवर (लिंकन, माल्कम एक्स) असतात, तितकेच प्रसिद्ध व्यक्तींवरही (विनोदवीर अ‍ॅण्डी कॉफमनवर- मॅन ऑन द मून, महायुद्धात ज्यूंचा जीवनदाता ऑस्कर शिंडलरवरील ‘शिंडलर्स लिस्ट’) बनतात. याहून वेगळा प्रकार म्हणजे कुप्रसिद्ध व्यक्तींचे चरित्र चित्रपटांमधून मांडण्याचा सोस येथे अधिक पाहायला मिळतो. समाजविघातक किंवा समाजासमोर कोणताही आदर्श ठेवता न येण्यासारख्या व्यक्तीदेखील चित्रपटांचे विषय ठरतात. उदाहरणांची लांबलचक यादी कमी करायची झाल्यास पहिले आठवतात सर्वात वाईट चित्रपट दिग्दर्शक म्हणून इतिहासात नोंद झालेल्या एडवर्ड डेव्हिस ज्युनिअरवर टिम बर्टनने तयार केलेला ‘एड वुड’ (१९९४), पिनअप गर्ल बेट्टी पेजने अश्लीलतेच्या आरोपाविरोधात लढविलेल्या आणिजिंकलेल्या खटल्यावर दिग्दर्शिका मेरी हारून हिने केलेला ‘नटोरिअस बेट्टी पेज’ (२००५) आणि साम्यवादी विचारसरणीच्या आरोपाखाली हॉलीवूडमध्ये निष्कासित केलेल्या पटकथाकाराची लेखन लढाई मांडणारा गेल्या वर्षीचा ‘ट्रम्बो’ हे चित्रपट. या विचित्र चरित्रपटांच्या पंगतीत ‘फ्लॉरेन्स फॉस्टर जेन्किन्स’ चपखल बसतो.

‘फ्लॉरेन्स फॉस्टर जेन्किन्स’ ही अमेरिकी ऑपेरा गायिका आपल्या हयातभर सर्वात वाईट आवाजासाठी हिणवली गेली; पण गडगंज संपत्ती, सतत पाठीशी घालणारा प्रेमळ नवरा आणि स्वत:वरील अचाट आत्मविश्वासाच्या बळावर तीन दशके तिने न्यूयॉर्क संगीत वर्तुळ गाजवले. दिग्दर्शक स्टीफन फ्रिअर्स आणि मेरिल स्ट्रीपने या व्यक्तिरेखेला पुन्हा तिच्या नावाचेच शीर्षक वापरत पडद्यावर जिवंत केले आहे.

चित्रपटाला सुरुवात होते, फ्लॉरेन्सचा नवरा क्लेअर (ह्य़ू ग्राण्ट) याने शिताफीने आखलेल्या एका संगीत-नाटक मैफलीद्वारे. या मैफलीत आघाडीला सर्व काही फ्लोरेन्स असते आणि त्याबाबत तिचा उदोउदो करणारा प्रेक्षकवर्ग दिसतो. या मैफलीनंतर आपल्या आयुष्याला संगीताने कसे घडविल्याचे व्याख्यान वगैरे देत फ्लोरेन्स पुन्हा गाण्याच्या स्वतंत्र मैफलीचा विचार करू लागते. शिकण्यासाठी ती दिग्गज संगीतकारांची फळी उभी करते, तर साथसंगतीसाठी कॉस्मे मॅकमून (सायमन हेल्बर्ग) या पियानोवादकाची नेमणूक करते. ही चित्रपटातील फ्लॉरेन्सइतकीच महत्त्वाची भूमिका आहे.

संगीतात कर्तबगारी दाखविण्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आलेला मॅकमून तिच्या गायनातील खोली पहिल्याच मिनिटात ताडतो; पण या भेटीपासून फ्लॉरेन्सच्या चुकणाऱ्या पट्टीची, हास्यास्पद ठरणाऱ्या गायकी अंदाजाची थट्टा न करता तिला प्रामाणिकपणे साथ करतो. केवळ पत्नीची संगीतहौस म्हणून तिच्यासाठी संगीतसभा, संगीत सभेतील प्रेक्षक, वृत्तपत्रीय परीक्षणे, खुशामतखोर या सर्वाशी सांगड घालणाऱ्या क्लेअरच्या वागण्याचे मॅकमूनला कौतुक वाटते; पण तो तक्रार न करता त्या कौतुकात नाइलाजाने समाविष्ट होतो.

पण पुढे नवऱ्याकडून होणाऱ्या या लोकप्रियतेच्या बनावात फ्लॉरेन्सची महत्त्वाकांक्षा वाढत जाते. नवऱ्याला अंधारात ठेवून ती काही संगीत व्यवहार करते. त्यामुळे फ्लॉरेन्सचा आवाज रेडिओवर पोहोचतो आणि कार्नेगी हॉलमध्ये अनियंत्रित, असंख्य प्रेक्षकांसमोर सादरीकरणाची मोठी संगीतसभा जाहीर होते. या सर्वामुळे गोष्टी सांभाळणे क्लेअर, मॅकमूनच्या आवाक्यापलीकडे जाते आणि अतिभीषण ऑपेरा गायनाचा इतिहासात नोंद झालेला, सर्वाधिक प्रेक्षकसंख्येचा कन्सर्ट कार्नेगी हॉलमध्ये घडतो.

चित्रपटात वाईट आवाज अत्यंत वाईटरीत्या काढणारी आणि आत्मप्रौढीने संगीतबातांचा उद्योग रचणारी ‘फ्लॉरेन्स फॉस्टर जेन्किन्स’च्या रूपातील मेरिल स्ट्रीप हसवतानाही प्रचंड गंभीरतेने पडद्यावर वावरली आहे. आपल्या आवाजातील सुमारतेची जराही तमा न बाळगता या व्यक्तिरेखेची संगीतलढाई समोर आणून मेरिल स्ट्रीपने त्या व्यक्तिरेखेविषयी अमाप सहानुभूती निर्माण केली आहे. त्यासाठी यंदा तिला ऑस्कर मिळण्याची शक्यता सांगता येणार नसली, तरी तिच्या सर्वोत्तम भूमिकांच्या यादीत ‘फ्लॉरेन्स फॉस्टर जेन्किन्स’ हीदेखील ठळकपणे नोंदली जाईल, याची खात्री आहे.