सध्या देशभरात आणि खासकरुन बॉलिवूडमध्ये #MeToo चं वादळ आलं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची नावे समोर आली आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींवर लैंगिक गैरवर्तवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. अनेकांना या मोहिमेचा फटका बसला असून त्यांच्यासोबत काम करण्यास सहकारी कलाकारांनी नकार दिला आहे. यामध्ये एक नाव सहभागी झालं आहे ते म्हणजे बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तर याचं.

बॉलिवूडमधील महिला दिग्दर्शकांनी आरोप सिद्ध होणाऱ्यांविरोधात काम न करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. फरहान अख्तरने या निर्णयाला पाठिंबा दर्शवत आपणही अशा सेलिब्रेटींसोबत काम करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

#MeToo प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली असून त्यांच्यावर लैंगिक शोषण, गैरवर्तनासोबतच मानसिक छळाचेदेखील आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळेच अशा व्यक्तींसोबत काम न करण्याचा निर्णय बॉलिवूडमधील ११ दिग्गज महिलांनी घेतला आहे. अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने तिच्या ट्विटर खात्यावरुन याविषयी माहिती दिली.

हा महत्वाचा निर्णय घेणाऱ्या ११ महिलांमध्ये अलंकृता श्रीवास्तव, किरण राव, एकता कपूर, कोंकणा सेन शर्मा, नंदिता दास, नित्या मेहरा, गौरी शिंदे, रिमा कागती, सोनाली बोस, झोया अख्तर, रूची नारायण यांसह बॉलिवूडमधील अन्य काही महिलांचा समावेश आहे.

‘एखाद्या महिलेवर अन्याय झाला तर तिच्या वेदना, दु:ख आम्ही समजू शकतो. त्यामुळेच एक महिला आणि दिग्दर्शक या नात्याने आम्ही #MeToo ला पाठिंबा देत आहोत. अन्यायाला वाचा फोडणाऱ्या या महिलांसोबत आम्ही कायम खंबीरपणे उभे आहोत’, असं अलंकृता श्रीवास्तवने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

नुकतंच फरहान याने अभिनेत्री अमृता पुरीला साजिद खानवर आरोप करताना त्याच्या कुटुंबीयांना टार्गेट केल्याने सुनावलं होतं. अमृता पुरीने साजिद खानबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना कसं काय माहित नव्हतं यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. यावर फरहानने तुमचा राग समजू शकतो, पण षडयंत्र सिद्धांत नाही असं म्हटलं होतं.

सध्या फरहान लंडनमध्ये असून ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटासाठी शुटिंग करत आहे. शोनाली बोस चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून प्रियांका चोप्रादेखील मुख्य भूमिकेत असणार आहे.