महिलांवरील लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या ‘मी टू’ मोहिमेवर संगीतकार ए. आर. रेहमान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून ‘मी टू’ मोहीमेकडे माझं लक्ष होतं. यातील काही नावं वाचून मलाही धक्काच बसला. आमचं क्षेत्रही (मनोरंजन) स्वच्छ असलं पाहिजे. या क्षेत्रातही महिलांचा आदर होताना पाहायला नक्कीच आवडेल’, असे ए. आर. रेहमान यांनी म्हटले आहे.

‘मी टू’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संगीतकार ए.आर रेहमान यांनी ट्विटरवरुन भूमिका मांडली. रेहमान म्हणतात, माझं गेल्या काही दिवसांपासून मी टू मोहिमेकडे लक्ष होते. यातील काही नावं वाचून मला धक्काच बसला. यात पीडित आणि त्यांच्यावर अत्याचार करणारा हे दोघंही आलेच.आमचं मनोरंजन क्षेत्रही स्वच्छ असलं पाहिजे. या क्षेत्रातही महिलांचा आदर होताना पाहायला नक्कीच आवडेल. मी आणि माझे सहकारी सर्वांनाच सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी कटीबद्ध आहोत. सोशल मीडियाने पीडितांना त्यांच्यावरील अन्यायाला फोडण्याची संधी आणि स्वातंत्र्य दिले. पण याचा गैरवापरही होऊ शकतो. यामुळे आपण सावधही राहायला पाहिजे, असे रेहमान यांनी नमूद केले.

मनोरंजन आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिला सहकाऱ्यांशी लैंगिक गैरवर्तनाच्या अनेक घटनांना सध्या ‘मी टू मोहिमे’च्या निमित्ताने वाचा फुटत आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर भारतातही या मोहीमेला बळ मिळाले. मनोरंजन क्षेत्रातील अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली. अभिनेते आलोकनाथ, संगीतकार अनु मलिक, गायक कैलाश खेर, दिग्दर्शक साजिद खान, विकास बहल अशा दिग्गज मंडळींची नावे या प्रकरणात उघड झाली.