‘किजी और मैनी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुशांतसिंह राजपूतने अभिनेत्री संजना सांघीशी  लगट करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा असतानाच आता खुद्द संजनानेच या प्रकरणात सुशांतला क्लीनचिट दिली. चित्रीकरणादरम्यान सेटवर माझ्यासोबत कोणीही असभ्य वर्तन किंवा लगट करण्याचा प्रयत्न केला नव्हता’ , असे संजनाने म्हटले आहे.

नवोदित अभिनेत्री संजना सांघी आणि सुशांत सिंह राजपूत हे दोघे ‘फॉल्ट इन अवर स्टार’च्या रिमेकमध्ये काम करत आहे. ‘किजी और मैनी’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुशांतनं संजनाशी वारंवार लगट करण्याचा प्रयत्न केला असा आरोप सुशांतवर केला जात होता. सुशांतमुळे अस्वस्थ झालेली संजना सेटवरून निघून गेल्याची चर्चा होती.

अखेर संजनाने या प्रकरणावर मौन सोडले असून तिने ट्विटरवरद्वारे बाजू मांडली. ट्विटमध्ये संजना म्हणते, मी पर्यटनासाठी काही काळ अमेरिकेत गेले होते. तिथून परतल्यानंतर मला ‘किजी और मैनी’च्या चित्रीकरणादरम्यान सेटवर माझ्यासोबत असभ्य वर्तन झाल्याची बातमी समजली. मी यावर स्पष्ट करु इच्छिते की चित्रीकरणादरम्यान सेटवर असा कोणताही प्रकार घडलेला नाही. यावरुन तर्कवितर्क काढणे आता थांबवले पाहिजे, असे तिने सांगितले.

दरम्यान, नवोदित अभिनेत्रीशी लगट केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्याने सुशांतवर अनेकांनी टीका केली होती. ‘मी टू’च्या पार्श्वभूमीवर सुशांत देखील अडचणीत आला होता. अखेर सुशांतने ट्विटरवरुन संजनासोबतचे चॅट शेअर केले होते. माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे आहेत आणि हे चॅट्स वाचून खरं -खोटं सर्वांना कळेल, असे त्याने सांगितले होते. आता खुद्द संजनानेच क्लीन चिट दिल्याने सुशांतला दिलासा मिळाला आहे.