अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना अद्याप ठोस पुरावा मिळू शकलेला नाही. गुन्हा दाखल करुन सात महिन्यांचा कालावधी झाला असून पोलिसांनी त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या किमान 12 ते 15 साक्षीदारांचा जबाब घेतला आहे.  मात्र, यातील एकाही साक्षीदाराला 10 वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते, हेच आठवत नव्हते, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने गेल्या वर्षी नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला होता. 2008 साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. या प्रकरणी तनुश्रीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी या प्रकरणी 12 ते 15 साक्षीदारांचे जबाब घेतले. यात डेझी शाह, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आदींचा समावेश आहे. साक्षीदारांपैकी अनेक जण हे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत. या साक्षीदारांचा जबाब आणि तनुश्री दत्ताचा जबाब यात साम्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मिड- डे या इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. एकाही साक्षीदाराला 10 वर्षांपूर्वी सेटवर नेमके काय घडले हेच आठवत नव्हते. साक्षीदारांची साक्ष अत्यंत महत्त्वाची असते, याकडेही सूत्रांनी लक्ष वेधले. यासंदर्भात पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी ‘तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असून सध्या अधिक भाष्य करता येणार नाही’, असे म्हटले आहे.

तर दुसरीकडे तनुश्री दत्ताने साक्षीदारांवरच शंका उपस्थित केली आहे. 12 ते 15 साक्षीदार हे नाना पाटेकर यांच्या बाजूचे होते. यातील एकही साश्रीदार माझ्या बाजूचा नव्हता. त्यामुळे त्यांची साक्ष आणि माझा जबाब यात तफावत येणारच, माझा छळ झाला असून हे सिद्ध करण्यासाठी मला साक्षीदारांची आवश्यकता नाही, असे तनुश्रीने सांगितले.