ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळ्ये यांची भावना

कलेला वय नसते. त्यामुळेच दिग्गज तबलावादकांकडून मी शिकलो तसा वयाने लहान असलेल्या कलाकारांचे तबलावादनही ऐकले आहे. मधुकर वृत्तीने प्रत्येकाकडून काही ना काही शिकता आले, अशी भावना स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्यासह दिग्गज कलाकारांना साथसंगत करणारे ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळ्ये यांनी गुरुवारी व्यक्त केली. गायकांसमवेत वादनाचा आनंद लुटण्याची माझी वृत्ती. त्यामुळेच अनेकदा संधी उपलब्ध झालेली असतानाही चित्रपटसृष्टीमध्ये जावेसे वाटले नाही, असेही त्यांनी सांगितले.

आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ६५ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवानिमित्त आयोजित ‘अंतरंग’ उपक्रमात मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी मुळ्ये यांच्याशी संवाद साधला. पं. जगन्नाथबुवा पुरोहित, पं. पंढरीनाथ नागेशकर, उस्ताद घम्मण खाँ यांच्यासह पं. अनोखेलाल, पं. सामता प्रसाद, उस्ताद अल्लारखाँ, उस्ताद निजामुद्दीन खाँ यांच्याकडून लाभलेले मार्गदर्शन, ‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘मत्स्यगंधा’ नाटकांसाठी केलेले तबलावादन अशा अनेक आठवणी आपल्या खुसखुशीत शैलीत उलगडत मुळ्ये यांनी रसिकांमध्ये हास्याची कारंजी फुलविली. त्यापूर्वी ‘षड्ज’ उपक्रमांतर्गत प्रजना परिमिता पराशेर दिग्दर्शित पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील लघुपट दाखविण्यात आला.

माझा मोठा भाऊ वासुदेव हा पं. नागेशकर यांचा शिष्य होता. तो रियाझ करायचा. त्याचे पाहून मी तबल्याचे कायदे पाठ करायचो आणि तो घरात नसला की मी तबलावादन करायचो. एकदा तो घरामध्ये नसताना निरोप देण्यासाठी आलेले पं. नागेशकर माझे तबलावादन ऐकत अर्धा तास उभे होते, अशी आठवण सांगून मुळ्ये म्हणाले, ‘हा चांगला मुलगा आहे,’ अशा शब्दांत पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांनी माझी पं. भीमसेन जोशी यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा ‘दिसायला चांगला नसला तरी चालेल. तबल्याला वजन असलेला चांगला’ अशी कोटी पं. जोशी यांनी केली होती. जोशी यांची मुंबईला मैफील असताना पं. वसंतराव आचरेकर तबल्याची साथ करायचे. नंतर ती संधी मला मिळाली. बनारस येथे पं. अनोखेलाल यांच्याकडे एका ठेक्याचा प्रसाद मिळाला. एका मैफिलीमध्ये डॉ. वसंतराव देशपांडे यांनी ‘शतजन्म शोधिताना’ पद सुरू केले, तेव्हा माझा ठेका ऐकून वसंतरावांनी चक्क हात जोडले होते. तबलावादन ही कला आहे. कलाकाराचा रियाझ आणि त्याच्या गळ्यातील सुरानुसार तबलावादन करणे महत्त्वाचे असते. तबलावादक म्हणून रियाझ करावा लागतो. किती रियाझ करायचा हे कळेपर्यंत जगातून जाण्याची वेळ येते.

ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन आणि राहुलदेव बर्मन मैफिलींना येत असत. माझा तबला ऐकून खूश झालेल्या या संगीतकारांनी चित्रपटामध्ये वादन करण्यासाठी येण्याचे निमंत्रणही दिले होते. ज्येष्ठ पाश्र्वगायक मन्ना डे यांच्यासमवेत मी वादन केले होते. पण, गायकांसमवेत वादन करून आनंद लुटायचा ही माझी वृत्ती असल्यामुळे चित्रपटाच्या दुनियेमध्ये रमावे असे मला वाटले नाही, असे मुळ्ये यांनी सांगितले.

पं. भीमसेनजींचे ड्रायव्हिंग

एकदा मंगलोर येथे ‘कटय़ार काळजात घुसली’ नाटकाचा प्रयोग होता. त्याच्या आदल्या दिवशी रात्री सोलापूर येथे पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाची मैफील होती. त्यांनी मला तबल्यासाठी येण्याचा आग्रह केला, तेव्हा मी नाटय़प्रयोग असल्याची अडचण सांगितली. मग त्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांना दूरध्वनी केला. ‘नाटकाचा प्रयोग दहा वाजता आहे तर, त्याआधी मी नानांना आणून पोहोचवतो,’ असे भीमसेन जोशी यांनी सांगताच वसंतरावांनी संमती दिली. भीमसेनजी यांची मैफील रात्री दोन वाजता संपली. जेवण करून पहाटे आम्ही गाडीने निघालो. अर्थात मोटार भीमसेनजी चालवीत होते. त्यांचे ड्रायव्हिंग पाहून मी घाबरलो होतो. रात्री साडेआठ वाजताच आम्ही मंगलोरला पोहोचलो. भीमसेनजी यांनी जाताना वसंतराव यांच्यासाठी दह्य़ाचा वाडगा, भजी, भरीत आणि भाकरी बरोबर घेतले होते. आम्ही एकत्र जेवण केले. नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी भीमसेन जोशी आवर्जून उपस्थित होते, अशी हृद्य आठवण नाना मुळ्ये यांनी सांगितली.