दिवसेंदिवस मराठी चित्रपटाच्या कक्षा अधिकाधिक रूंदावत आहेत. याचे श्रेय प्रयोगशील दिग्दर्शकांना जातं. नवनवीन प्रयोग करणारा दिग्दर्शक मिलिंद कवडे पुन्हा एकदा काहीतरी नवीन देण्यासाठी सज्ज झाला असून, ‘एडल्ट्स ओन्ली’नावाच्या चित्रपटावर तो काम करत आहेत. विषयाचं गांभीर्य ओळखून मिलिंदने ‘एडल्ट्स ओन्ली’ हा चित्रपट ‘आयफोन ६’ वर चित्रीत करण्याची योजना आखली. ‘येडयांची जत्रा’, ‘फोर इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद कवडे याचा ‘एडल्ट्स ओन्ली’ हा चित्रपटही त्यातील वेगळे पणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, आता या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टरदेखील हटके असल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच या चित्रपटाचे हटके पोस्टर तयार करण्यात आले आहे. मिलिंद कवडेने त्याच्या फेसबुक अकाउन्टवरून चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. त्याचसोबत मिलिंदने एक पोस्टही केली आहे. त्यात त्याने लिहलेय की, मित्रांनो, २०१७ च्या शुभ मुहूर्तावर ‘ऍडल्टस ओन्ली’ या माझ्या नवीन सिनेमाचा टिझर पोस्टर खास तुमच्यासाठी…. ‘फक्त प्रौढांसाठी’ असलेली मराठीतील पहिली ‘सेक्स कॉमेडी’ लवकरच घेऊन येतोय खास प्रौढ प्रेक्षकांसाठी…. प्रौढांनी लाईक, कमेंट आणि शेअर करण्यास काहीच हरकत नाही.

only

मराठीत यापूर्वी कधीच असा प्रयोग करण्यात आला नसल्याची माहिती यापूर्वीच मिलिंदने दिली होती. अशा प्रकारचं कथानक सादर करण्यासाठी महागडा कॅमेरा वापरण्याची गरज नसल्याचं सांगत चित्रपटाच्या शीर्षकावरून या विषयाचा अंदाज येतो. त्यानुसार या प्रकारची कथा चित्रीत करण्यासाठी ‘आयफोन ६’चा वापर करायचं ठरवल्याचंही मिलिंद म्हणाला होता. सेव्हन हॉर्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्माते अमित धुपे  ‘एडल्ट्स ओन्ली’ ची निर्मिती करत असून, ‘तानी’,‘ फुंतरू’ या मराठी चित्रपटांची निर्माती करणारे अजय ठाकूर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोडयुसर आहेत. केवळ काहीतरी नवीन करण्यासाठी म्हणून ‘एडल्ट्स ओन्ली’चित्रपट आयफोनवर चित्रीत करण्यात आला नसून विषय आणि कथानकाची गरज असल्याने हा विचार पुढे आल्याचं मत अजय ठाकूर यांनी व्यक्त केलं.