सध्या देशात लॉकडाउन सुरु असल्यामुळे अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे.  त्यामुळे कोणतीही व्यक्ती कामाव्यतिरिक्त बाहेर पडताना दिसत नाहीये. या लॉकडाउनमुळे प्रत्येक व्यक्तीला घरातच रहावं लागत आहे. यामध्ये सेलिब्रिटींचाही समावेश होतो. विशेष म्हणजे घराबाहेर पडणं शक्य नसल्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी त्यांचं फिटनेस कसं सांभाळत असतील असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र या साऱ्यात फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता, ‘आयर्न मॅन ऑफ इंडिया’ मिलिंद सोमणने त्याच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.

अलिकडेच मिलिंदने त्याला आवडणाऱ्या काही पदार्थांविषयी सांगितलं. यामध्ये खासकरुन त्याला फळं आवडत असल्याचं त्याने म्हटलं आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ केवळ त्याला आवडत नसून ते शरीरासाठी तितकेच पोषक असल्याचं पाहायला मिळत आहे. या पदार्थांमध्ये फळांचा सर्वाधिक समावेश असल्याचं दिसून येत आहे.

“मला स्नॅक्स म्हणून अ‍ॅव्होकॅडो खायला प्रचंड आवडतं. त्याची चव अप्रतिम असून ते शरीरासाठीही लाभदायक आहे. सोबतच मला केळी आणि रताळ्याचे वेफर्सदेखील आवडतात. माझ्या आवडत्या स्नॅक्समध्ये यांचा आवर्जुन समावेश असतो”, असं मिलिंद म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “मला बदाम आणि अन्य फळंदेखील आवडतात.  यामधून व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन इ आणि मॅग्नेशियम मिळते. ज्यामुळे हृदयाचं कार्य सुरळीत राहतं आणि वजनदेखील नियंत्रणात राहतं. त्यामुळे मी कायम माझ्या दिवसाची सुरुवात बदाम आणि कोमट पाणी पिऊन करतो. तसंच सकाळी शक्यतो फळंच खातो. यामध्ये पपई, कलिंगड या सारख्या फळांचा समावेश असतो”.

दरम्यान, मिलिंद शक्यतो बाहेरील पदार्थ खाण्याचं टाळतो. तसंच अ‍ॅव्होकॅडो हे त्याचं आवडतं फळ असून ते खाल्ल्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. तसंच सुर्यापासून निघणाऱ्या अल्ट्राव्हॉयोलिट किरणांपासूनही त्वचेचं रक्षण होतं. मिलिंद सोमण याची आजही तरुणींमध्ये कमालची क्रेझ अशून तो सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत राहत असतो.