अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची प्रेयसी अंकिता कोनवार या दोघांनी अलिबागमध्ये लग्नगाठ बांधली. मात्र तरीदेखील त्यांच्या रिलेशनशिपपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. मिलिंदनेही त्याच नात जगापासून न लपवता ते सर्वांसमोर खुलेपणाने मांडले. अनेकांनी त्यांच्या नात्यावर प्रश्नही उपस्थित केले पण तरीही मिलिंद आणि अंकिताने त्यांच्यातील प्रेमातून सर्वांची तोंडे बंद केली. इतकंच नाही तर मिलिंदने नुकतंच त्यांच्या नात्यावर एक वक्तव्य केलं आहे.

लग्नाला २ महिने झालेलं हे जोडपं सध्या एकमेकांना वेळ देत असून त्यांच्या हनिमूनचे फोटो अद्यापही सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या या फोटोवरही काही जणांनी टीका केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या टीकाकारांना मिलिंदने चांगलंच उत्तर दिलं आहे.

‘मी आणि अंकिताने विचार करुनच लग्नाचा निर्णय घेतला होता. आमच्या वयातील अंतर आम्हा दोघांनाही ठाऊक होतं. त्यामुळे लग्नानंतर आमच्या नात्यामध्ये यत्किंचितही बदल झालेला नाही. आमचं पूर्वी जे नातं होतं तेच आता सुद्धा आहे’, असं मिलिंदने सांगितलं.

पुढे तो असंही म्हणाला, ‘आमच्या वयात किती अंतर आहे यावरुन आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्यासाठी आमचं वय महत्वाचं नाही,तर प्रेम महत्वाचं आहे. आम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो. त्यामुळेच लग्न करण्याचा आमचा निर्णय योग्य होता’. दरम्यान, अंकिता आणि मिलिंदने नुकतंच फोटोशूट केलं असून या फोटोच्या माध्यमातून आमच्या आठवणी जतन करता येतील असंही त्याने सांगितलं.