मॉडेल आणि अभिनेता म्हणून आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या मिलिंदने त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. सध्याच्या घडीला तो चित्रपटांमध्ये फारसा सक्रिय नसला तरीही सोशल मीडियावर मात्र त्याचीच चर्चा आहे हे नाकारता येणार नाही. फिटनेस फ्रिक असलेल्या मिलिंदने नवीन वर्षात अनोखाच संकल्प केला आहे. यासाठी त्याने ट्विटरवर चाहत्यांनाही एक आवाहन केले आहे. पण त्याच्या आवाहनाला सर्वसामान्य नेटकऱ्यांनी खोचक आणि गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारा मिलिंद शारीरिक सुदृढतेकडे अधिक लक्ष देतो. अनवाणी पळण्यापासून ते अगदी योगसाधना आणि सोप्या मार्गाने कशा प्रकारे निरोगी राहता येईन याच्या टीप्स देण्याकडे त्याचा कल असतो. नवीन वर्षात त्याने दररोज ७ तास धावण्याचा संकल्प केला आहे. त्याच्या या संकल्पात सहभागी होण्याचे आवाहन त्याने ट्विटरवर चाहत्यांना केले आहे. काहींनी त्याचे कौतुक केले, तर अनेकांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिल्या.

वाचा : ‘सलामानची मैत्रीण म्हणून लोक मला ओळखतात, त्यात गैर काय?’

सात तास धावल्यावर नोकरी कधी करु? असा खोचक प्रश्न एका युजरने मिलिंदला विचारला. तर ऑफीसमध्ये केलेले आठ तास काम हे काही मॅरेथॉनपेक्षा कमी नाही, असेही एकाने म्हटले. या सर्व गमतीशीर प्रतिक्रियांवर अखेर मिलिंदलाही हसू आल्याचे पाहायला मिळाले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही त्याने एक संकल्प ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितला होता. रात्री नऊ वाजल्यानंतर फोन ते अगदी मनोरंजनाची कोणतीही उपकरणे न वारपण्याचा संकल्पही त्याने केला आहे.