मॉडेल, अभिनेता म्हणून प्रसिद्ध असणारा मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठीही नेहमीच चर्चेत असतो. सध्या ‘मोबीफिट’ आयोजित ‘द ग्रेट इंडिया रन’साठी आयर्नमॅन मिलिंद सोमण अहमदाबाद ते मुंबई अनवाणी धावतो आहे. या दोन्ही शहरांमधले अंतर ५२७ किमी आहे. मिलिंद सोमणच्या अनवाणी धावण्याच्या या संकल्पात चक्क त्याच्या आईनेही त्याला साथ दिली आहे. मिलिंद सोमणची आई उषा सोमण यांचे वय ७८ वर्षे असून त्यांचा हा उत्साह खरेच कौतुकास्पद आहे. मिलिंद सोमणने त्याच्या आईने त्याला दिलेल्या साथीचा व्हिडिओ त्याच्या फेसबूक अकाउंटवरुन शेअर केले आहे. यापूर्वीही उषा सोमण यांनी काही मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे मनाची तयारी असेल तर त्याआड वयोमर्यादेचे अडथळे कधीच येत नाहीत हेच मिलिंद सोमणच्या आईच्या या कृतीतून सिद्ध होत आहे.
गेल्या वर्षी जगात अत्यंत खडतर अशी ट्रायथलॉन त्याने पूर्ण केली होती. मिलिंद सोमणने ५२७ किमीपैकी १३० किमीचे अंतर पहिल्या दोन दिवसातच पूर्ण केले होते. पहिल्या दिवशी ६७ किमीचे अंतर पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी ६२ किमीचे अंतर कापले. तिसऱ्या दिवशी कडक ऊन असूनही भरुचपर्यंतचे ६२ किमी अंतर त्याने कापले. चौथ्या दिवशीही ६२ किमीचे अंतर त्याने पूर्ण केले. पाचव्या दिवशी ६५ किमी अनवाणी धावून तो नवसारीपर्यंत पोहचलेला. २७ जुलै पासून सुरु झालेली ही ‘द ग्रेट इंडियन रन’ ६ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून ही होणार आहे. यात जगभरातल्या १५ अल्ट्रा मॅरोथॉन धावपटूंनी भाग घेतला आहे.