पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी मनसेनं केली आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट येत्या ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात हा चित्रपट येत असल्यानं त्यावरून राजकीय वाद सुरू आहे. निवडणुका तोंडावर असताना मतदारांना प्रभावित करण्यासाठी हा बायोपिक प्रदर्शित केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर ‘मोदीमुक्त’ भारतासाठी मैदानात उतरलेल्या मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेनं सेन्सॉर बोर्डावर हल्लाबोल केला आहे.
‘सेन्सॉर बोर्डाच्या नियमानुसार कोणत्याची चित्रपटाची फायनल कॉपी ही प्रदर्शनाच्या ५८ दिवस आधी सेन्सॉर बोर्डाकडे येणं अपेक्षित असतं. पण मोदींवरील चित्रपटाच्या बाबतीत असं काहीही झालेलं नाही. या चित्रपटाला झुकतं माप का?,’ असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्माचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी सेन्सॉर बोर्डानं नियम धाब्यावर बसवले आहेत. आम्ही याचा निषेध करतो. प्रसून जोशी यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.