कुख्यात गुंडाच्या प्रेमात चांगली सुशिक्षीत मुलगी पडूच शकत नाही असा सर्वसामांन्यांच्या मनाला न पटणार आहे. पण प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी वास्तवाचं भान विसरायला लावते. अभिनेत्री मोनिका बेदी हिने हे दाखवून दिलंच. वयाच्या २० व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मोनिकाने यशस्वी अभिनेत्री होण्याची अनेक स्वप्ने पाहिली असतील पण तिच्या नशिबात मात्र काही वेगळंच होतं. निव्वळ प्रेम केल्याची एवढी मोठी किंमत चुकवावी लागेल असे तिला स्वप्नातही वाटले नसेल. आज १८ जानेवारी मोनिकाचा वाढदिवस. तिचा जन्म १९७६ साली पंजाबच्या होशियारपुरमध्ये झाला. मोनिका आणि डॉन अबू सालेम यांचे प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय होते. ती अबू सालेमला कशी भेटली आणि कशाप्रकारे त्याने तिला सिनेमे मिळवून दिले हे जाणून घ्यायची आजही अनेकांना उत्सुकता असते.

२००८ मध्ये रेडिफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत मोनिकाने सांगितले की, ‘एक दिवस मला दुबईवरुन फोन आला आणि त्याने सांगितले की तो एक कार्यक्रम आयोजित करत आहे, ज्यात मीही सहभागी व्हावे. त्या माणसाने पुढे सांगितले की, सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्यावर तो मला पुन्हा फोन करेल. काही दिवसांनंतर त्या माणसाने पुन्हा फोन केला आणि थोडा वेळ बोलत होता. काही दिवसांनी परत त्याचा फोन आला. यावेळी आम्ही फार सहजरित्या एकमेकांशी बोलत होतो. त्याने त्याचे नाव काही तरी वेगळेच सांगितले होते. मला माहित नव्हते की तो अबू सालेम आहे. जरी त्याने आपले नाव अबू सालेम असे सांगितले असते तरी मला काही कळले नसते. कारण तेव्हा मला फक्त दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचीच नावे माहित होती.’ मोनिकाच्या मते, दुबईवरुन फोन करणाऱ्या व्यक्तिला भेटण्याआधीच ती त्याला पसंत करु लागली होती. ती नेहमीच त्याच्या फोनची वाट बघायची.

त्यानंतर मोनिकाचे दुबईला जाणे वाढले. तिच्यात आणि सालेममध्ये कालांतराने जवळीक निर्माण झाली. साधारणतः १९९५ मध्ये मोनिकाने आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. पण सालेमला भेटेपर्यंत तिचा एकही सिनेमा फारसा गाजला नव्हता. असे म्हटले जाते की, मोनिकाच्या प्रेमात अडकल्यानंतर सालेमनेच तिला मोठ्या सिनेमात भूमिका देण्यास मदत केली होती. १९९९ मध्ये आलेला सलमान खानचा ‘जानम समझा करो’ या सिनेमात मोनिकाला रोल मिळवून देण्यात सालेमचा फार मोठा हात होता.

अबू सालेमचे चरित्र लिहिलेले पत्रकार ए हुसैन जैदी यांच्या मते, २००१ मध्ये आलेला संजय दत्त आणि गोविंदा यांचा ‘जोडी नंबर १’ या सिनेमात सालेमच्या सांगण्यावरुनच मोनिकाला ती भूमिका मिळाली होती. या सिनेमात गोविंदासोबत ट्विंकल खन्नाची जोडी होती. यावेळी बी- ग्रेडची अभिनेत्री मानल्या जाणाऱ्या मोनिकासोबत संजय दत्त काम करण्यास तयार नव्हता. संजय तर हा सिनेमा सोडण्यासही तयार होता पण त्याला एक फोन आला आणि संजयने त्याचा निर्णय बदलला, असा उल्लेख जैदी यांनी अबू सालेमवरील चरित्रात केला आहे. डेविड धवन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

१८ नोव्हेंबर २००२ मध्ये पोर्तुगाल पोलिसांनी सालेम आणि मोनिका यांना पकडले आणि त्यांना भारताकडे सुपूर्द केले. २००६ मध्ये मोनिकाला बनावट पासपोर्टप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि तिला शिक्षा सुनावली गेली. मोनिकाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयानेही तिला दोषी ठरवले, परंतु तिची शिक्षा कमी करण्यात आली. मोनिकाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, तिला अटक केल्यानंतर ती कधीच सालेमला भेटली नाही. २०११ मध्ये एका तामिळ सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पुनरागमन केले. असे असले तरी त्यानंतर ती सिनेमांमध्ये कमीच दिसली.