‘हॅप्पी जर्नी’ असा इंग्रजी नावाचा आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘हिंदी चित्रपटांची कुठलीही नक्कल न करत केलेला ग्लॅमरस मराठी फँटसीपट’ सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. मुळात फँटसी चित्रपट आपल्याकडे केले जात नाहीत. ‘हॅप्पी जर्नी’मध्ये फँटसीच्या अंगाने एका काल्पनिक विषयाची अतिशय खरी वाटावी अशी मांडणी करण्यात आली आहे, असा दावा या टीमने केला. मात्र, ‘हॅप्पी जर्नी’ हा जसा मराठी चित्रपटांच्या आजवरच्या प्रवासातला बदल म्हणून आलेला चित्रपट आहे. तसाच या चित्रपटाच्या निमित्ताने वेगळी मांडणी करताना पहिल्यांदाच कलात्मक मांडणी आणि व्यावसायिकता यांचे भान ठेवून हा चित्रपट करणं हा दिग्दर्शक म्हणून सचिन कुंडलकर यांच्यात झालेला बदल, अभिनेता म्हणून अतुल कुलकर्णी यांच्यात झालेला बदल आणि प्रिया-सिद्धार्थसारख्या तरुण कलाकारांना त्यांच्या पद्धतीच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं हाही बदल असे अनेक ‘बदलते प्रवाह’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात उलगडून सांगितले..

बदल दाखवावे लागतात, दिसावे लागतात..
भावा-बहिणीचं नातं हे सततचं आहे आणि ते इतक्या जवळचं आहे की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे भाऊ असतो नाहीतर बहीण असतेच ना.. पण, काळ जसा बदलत जातो, वय जसं बदलत जातं तसं हे जे rv06सगळ्यात जवळचं नातं आहे जे तुम्ही गृहीत धरलेलं आहे त्या नात्यात होणारे बदल बाहेरून कुणीतरी आपल्याला दाखवावे लागतात, दिसावे लागतात. म्हणजे प्रिया नेहमी तिच्या भावंडांचं उदाहरण देते की तिचे भाऊ हे तिच्यापेक्षा मोठे आहेत. तिचं लग्न झाल्यानंतर ते तिच्याशी जास्त मित्रत्वाने वागायला लागले. तोपर्यंत ती लहान आहे, अशीच त्यांची भूमिका होती. हे नकळतपणे होत जाणारे बदल होत असतात. म्हणजे माझ्या सख्ख्या बहिणीशी असलेलं माझं नातं हे अगदी आता आता तिच्यावर आलेल्या मोठय़ा संकटांनंतरचं नातं आणि त्याच्याआधीचं नातं यात खूप फरक आहे. मला वाटतं न्यूक्लिअर फॅमिली झाल्यापासून हे नातं रक्षणकर्ता वगैरैतून बाहेर पडलं आहे आणि ते अधिक मित्रत्वाचं होऊ लागलं आहे. कारण, तुमची सिक्रेट्स शेअर करणारी पहिली व्यक्ती, जिला तुम्ही माहिती आहे, जिला सगळं घर माहिती आहे आणि तरीही कुणाला काय सांगायचं आहे आणि काय नाही हेही माहिती आहे अशा पद्धतीचं तुमचा पहिला मित्र किंवा पहिली मैत्रीण तुमच्या घरातली ती ही व्यक्ती असते. हा या बदललेल्या नात्याचा शोध हे या चित्रपटातलं नावीन्य आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत मी माझ्या अभिनयाच्या शैलीत बदल करण्याचा प्रयत्न करतो आहे. ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये तसा प्रयत्न होता. याच्यामध्ये एका अर्थाने तो पुढचा प्रवास आहे. त्याच पद्धतीने मी माझ्या स्वत:मध्ये काही बदल करायचा प्रयत्न करतो आहे. कशाकशात तर तो माझ्या विचारांत आहे, माझ्या कपडय़ांत आहे, मी ऐकणाऱ्या संगीतामध्ये आहे, माझे जे ठाम विचार होते ते पुन्हा पुन्हा तपासून पाहण्यामध्ये आहे. याबाबतीत गांधीजी हे माझे आदर्श आहेत. ते म्हणायचे की मी परस्पर विरोधी विधाने केली असतील तर त्यातलं शेवटी केलेलं जे विधान आहे ते सत्य माना.. इतका प्रवाहीपणा जर एखाद्या माणसामध्ये असेल तर मला वाटतं तो खरा जिवंत माणूस आहे. बऱ्याच वेळेला एखादं पुस्तक आपल्याला भेटतं. आपण काहीतरी विचार करत असतो आणि अचानक तुम्हाला पुस्तक वाचायला मिळतं. तुमच्या मनात पहिला विचार उमटतो अरे याचाच तर मी विचार करत होतो आणि तुमच्यात बदल घडून येतो. सिनेमांच्या बाबतीतही असंच असतं. सगळ्या चित्रपटांच्या बाबतीत असं म्हणता येत नाही. ‘हॅप्पी जर्नी’च्या बाबतीत ते झालं. मी स्वत:त बदल करायच्या प्रयत्नात असतानाच ‘हॅप्पी जर्नी’सारखा चित्रपट मला करायला मिळाला. जिथे मी निळे बूट, त्यावर हिरवे टी-शर्ट, जॅकेट, गॉगल हे सगळं परिधान करणं अपेक्षित होतं. तेही आधुनिक पद्धतीने आणि सुंदर दिसेल, अशा पद्धतीने घालायचे होते. हे करायचं म्हणजे ते मुळात माझं झालं पाहिजे ना.. ते अंगावर वागवायचं म्हणजे मानसिकरीत्या ते स्वीकारणं ही एक कलाकार म्हणून माझी जबाबदारी होती. त्यासाठी मला सचिनची मदत झाली. त्याने मला काही सिनेमे पाहायला सांगितले, क पडय़ांचा सराव करायला सांगितला आणि हळूहळू करत ते माझे व्हायला लागले.
अतुल कुलकर्णी

जगणं आनंदाने साजरं करायला शिकलं पाहिजे
शहरी समाज आणि त्याच्या मानसिकतेवर उत्खनन करायला मला नेहमी आवडतं. स्वत: या गुंतागुंतीच्या शहरी जीवनात वाढल्यामुळे या जीवनशैलीतील बारीकसारीक गमती, नात्यांचे पदर चित्रपटांमधून सुंदररीत्या rv08मांडावेत, ही माझी कायम इच्छा असते. त्यामुळे ‘हॅप्पी जर्नी’ या चित्रपटात शहरी भाऊ-बहीण आहेत, त्यांची कथा आहे. पण, यानिमित्ताने मराठी चित्रपटांमध्ये वास्तववादी विषय हाताळले जात असले तरी त्यांच्यात ग्लॅमर आणि आजच्या काळाला सुसंगत असं जगणं मांडलं जात नाही.. हे मान्य करायला हवं. आणि त्याचं मोठं कारण म्हणजे मराठी माणूस समृद्धीला फार घाबरतो. त्यामुळे त्याच्या जगण्यात असलेली समृद्धी ही त्याच्या चित्रपटात कधीच उतरत नाही. मराठी चित्रपटकर्मीनी वास्तववादी सिनेमा करू नयेत, असे आपले म्हणणे नाही. मात्र, आज मराठी माणसाच्या जगण्यात समृद्धी आलेली आहे आणि ती चित्रपटांमधून दिसायची असेल तर मुळात ते जगणं आनंदाने साजरं करायला शिकलं पाहिजे. मला स्वत:ला भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांची आठवण होते. त्यांना तो सिनेमा भव्य-दिव्य दिसायचा. मराठी चित्रपटांमधली ती भव्यता- तो साज निघून गेला आहे. तो साज पुन्हा एकदा मराठी चित्रपटांतून यायला हवा. ‘हॅप्पी जर्नी’मध्ये तसा प्रयत्न आम्ही केला आहे.
सचिन कुंडलकर

मराठी चित्रपटातली अमराठी व्यक्तिरेखा
एका मराठी सिनेमात अमराठी व्यक्तिरेखा करायला जास्त मजा आली. सगळेजण आपापल्या चौकटीत जगत असतात त्याचा अजिंक्यला राग असतो. म्हणजे अगदी शहरी, आत्मकेंद्री असा हा तरुण आहे. म्हणजे त्याच्या अवतीभोवती कितीतरी मित्र असतात. आणि तरीही त्याच्या मनात काय सुरू आहे याचा कोणालाच थांगपत्ता लागत नाही. आणि म्हणूनच तो जानकीकडे आकर्षित होतो. तिचं जे त्या क्षणा-क्षणाचं जगणं आहे ते त्याला भावतं. तो तिच्याकडे मोकळा होतो, अशी अजिंक्यची व्यक्तिरेखा आहे आणि सचिन कुंडलकर यांनी ती अप्रतिमपणे मांडणी केली आहे.
सिद्धार्थ मेनन

सुखद जर्नी..
‘हॅप्पी जर्नी’ ही खूपच सुखद जर्नी होती. जानकी खूप लाइव्हली आहे. तिला जगण्याची किंमत माहिती आहे. जगणं म्हणजे काय असतं आणि प्रत्येक क्षण भरून जगणं का आवश्यक आहे, हे तिला माहिती असतं. म्हणूनच तिच्या भावाला तिला बदलायचं आहे. तिच्या जगण्याचा जो फंडा आहे की आज मिळालेला क्षण मला उद्या मिळेल की नाही माहिती नाही त्यामुळे तो मी आज पूर्ण जगून घ्यावा. तेच तिचा भाऊ करत नाही आहे. त्याने ते करावं, त्याने जगण्याचा दृष्टिकोन बदलावा म्हणजे त्याच्यासमोरच्या ज्या समस्या आहेत ज्या त्याने उगाच कठीण करून ठेवल्यात त्या सोप्या होतील. आपल्या अरसिक भावाला आंतरबाह्य़ बदलायचा प्रयत्न करणारी अशी जानकीची व्यक्तिरेखा आहे. भावा-बहिणीची गोष्ट असली तरी त्यापलीकडे नेणारी त्यांच्यातल्या मित्रत्वाच्या नात्याकडे नेणारी अशी ही गोष्ट आहे. अतुलबद्दल माझ्या मनात एक वेगळी प्रतिमा होती. मी अ‍ॅवॉर्ड फंक्शनला जाते तिथे अतुलला कधी बघितलेलेच नाही. चॅनेल्सच्या पार्टीला गेलो तर अतुल तिथे येतच नाही.त्याच्याकडे टीव्ही नाही. हे सगळं ऐकल्यानंतर त्या माणसाबद्दल तुमच्या मनात एक वेगळी प्रतिमा निर्माण होतेच. त्यामुळे ती केमिस्ट्री कशी निर्माण होणार हा प्रश्न होता. पण सुदैवाने माझ्या मनातलं चित्र पुसलं गेलं. म्हणजे त्याच्यातल्या बदलाची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती त्यामुळेच असेल बहुधा, पण मला बदललेल्या अतुलबरोबर माझ्या सहज अभिनयाच्या पद्धतीनेच काम करता आलं.
प्रिया बापट