‘आमचा हसवण्याचा धंदा’ असे म्हणत चॅनल्सवाल्यांनी सध्या कॉमेडीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसत आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी असलेला कॉमेडीचा ट्रेंड आता दुप्पटीने वाढला असून प्रत्येक वाहिनी आपल्याकडे एखादा कॉमेडी शो व मालिका असावी याची काळजी घेत आहे. कॉमेडी शोच्या माध्यमातून अनेक वेळा चित्रपटांचे प्रमोशन्स आणि इतर अनेक गोष्टी साध्य करता येत असल्यामुळे या शोंजना मागणी वाढू लागली आहे.
प्रतिस्पर्धी वाहिनीच्या सुपरहिट कलाकाराला बक्कळ पैसे देऊन आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्नही काही वाहिन्यांकडून होताना दिसत आहेत. कॉमेडीच्या वाढत्या मागणीमुळे कॉमेडी कलाकारांची मात्र पुरती भंबेरी उडालेली आहे. नेमके कोणत्या वाहिनीकडे जावे याबाबत कलाकार संभ्रमात पडले आहेत. सध्या ‘कलर्स’वर सुरू असलेला ‘कॉमेडी नाइटस् विथ कपिल’ हे याचेच एक उदाहरण आहे. या शोच्या प्रत्येक भागासाठी कपिल शर्मा अंदाजे बारा ते पंधरा लाख रुपये घेत असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात अधिक बोलताना कृष्णा अभिषेक म्हणाला की, सध्या कॉमेडीला उत्तम दिवस आले आहेत. आम्ही महिन्यातील किमान २२ दिवस काम करतो. यामध्ये शुटींग, लाइव्ह कार्यक्रम आणि परदेशातील शो आदींचा समावेश असतो. त्यासाठी काही लाखांमध्ये मिळते.
आजघडीला कॉमेडीचे सुपरस्टार कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, सुदेश मेनन आणि भारती सिंग आघाडीवर आहेत. या प्रत्येकाचे एका दिवसांचे मानधन साडेतीन ते पाच लाखांपर्यंत आहे. त्यांना इतके मानधन देण्यासाठी वाहिन्याही आखडता हात घेत नाहीत हे विशेष. कॉमेडीच्या प्रत्येक शोसाठी नामांकित कलाकारांसह काम करणाऱ्या त्यांच्या सहकलाकारांचे मानधनही लाखाच्या घरात जाते. म्हणूनच अनेक कलाकार कॉमेडीला प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यात उपासना सिंग, अली असगर आदींचा समावेश आहे.