चित्रपट :  द गाझी अ‍ॅटॅक

हिंदीत वर्षभर अनेक पोकळ संकल्पना, गोष्टींवरच्या चित्रपटांवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र एखादा चांगला विषय असूनही केवळ दिग्दर्शक नवीन असल्याने किंवा तो कुठल्या कंपूशाहीतील नसल्याने चित्रपटासाठी निर्मितीचे गणित अवघड होते. आणि मग तो चित्रपट कमी पडतो. समुद्राखालचे युद्ध रंगवणारा पहिला चित्रपट म्हणून ‘द गाझी अ‍ॅटॅक’चा उल्लेख महत्त्वाचा आहेच पण निर्मितीचे हेच गणित फसल्याने पडद्यावर हा चित्रपट जितका परिणामकारक ठरायला हवा तितका तो ठरत नाही. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय नौदल अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, पाणबुडी आणि समुद्रात खोल खेळले जाणारे युद्ध आपल्याला पाहायला मिळते.

‘द गाझी अ‍ॅटॅक’ हा चित्रपट सत्यघटनेवर आहे. १९७१च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यावेळी विशाखापट्टणमच्या बंदरात असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’वर हल्ला करून ते नष्ट करण्याची योजना पाकिस्तानने आखली होती. आणि त्यांनी या योजनेसाठी दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या ‘गाझी’ या पाणबुडीचा वापर करायचे ठरवले. पाकिस्तानच्या या कारवाईची कुणकुण लागलेल्या नौदल अधिकाऱ्यांनी केवळ ‘सर्च ऑपरेशन’साठी ‘एस २१ – आयएनएस राजपूत’ ही पाणबुडी विशाखापट्टणमजवळच्या समुद्रात तैनात केली. या सर्च ऑपरेशनची तयारी करण्यापूर्वीची नौदल अधिकाऱ्यांची परिस्थिती, त्यांच्यावरचे राजकीय दबाव आणि त्यातून त्यांना घ्यावे लागणारे निर्णय या गोष्टी पहिल्या काही मिनिटांत आपल्या समोर येतात. अभिनेता ओम पुरी इथे पूर्व नौदल अधिकारी म्हणून समोर येतात. ओम पुरी यांचा हा शेवटचा चित्रपट असल्याने त्यांची छोटेखानी भूमिकाही इथे लक्ष वेधून घेते. ‘सर्च ऑपरेशन’साठी गेलेल्या ‘एस २१’ने प्रत्यक्षात ‘गाझी’ शोधले आणि ते नष्ट केले, असे इतिहास सांगतो. मात्र गाझी पाणबुडीला मिळालेली जलसमाधी ही भारतीय नौदलाच्या कारवाईमुळे नव्हती तर पाणबुडीत अंतर्गत झालेल्या स्फोटामुळे होती, असा दावा करत पाकिस्तानने आजपर्यंत हा वाद जिवंत ठेवला आहे. या वादग्रस्त घटनेचा वेध घेताना दिग्दर्शक संकल्प रेड्डी यांनी प्रत्यक्षात ‘एस २१’वर काय घडले आणि अशा कोणत्या घटना घडल्या ज्यातून ‘गाझी’ला जलसमाधी देण्याचे नौदलाचे (छुपे) मिशन साध्य झाले, यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

‘द गाझी अ‍ॅटॅक’ हा चित्रपट पूर्णपणे पाणबुडीत घडतो. त्यामुळे पाणबुडीची अंतर्गत रचना, त्यातली कार्यपद्धती, तांत्रिक भाग अशा अनेक गोष्टी चित्रपटात महत्त्वाच्या होत्या. ज्या दिग्दर्शकाने तंतोतंत पाणबुडीचा सेट उभारून पूर्ण केल्या आहेत. त्याचे श्रेय त्याला द्यायलाच हवे. या पाणबुडीचे कॅप्टन रणविजय सिंग (के. के. मेनन), त्यांच्या हाताखाली असलेले कार्यकारी अधिकारी देवराज (अतुल कुलकर्णी) आणि कॅप्टन अर्जुन (राणा डुग्गुबाती) यांच्यात ही कथा प्रामुख्याने घडते. यानिमित्ताने, युद्धावर निघालेल्या अधिकाऱ्यांनी केवळ आपल्या वरती बसलेल्या अधिकाऱ्यांचे आदेश मानावेत की सरळ समोर शत्रू दिसल्यानंतर हल्ला चढवून त्यांचा पराभव करावा, या सैन्यदलात वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या वादावरही बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा परिणाम कमी होतो कारण चित्रपट ठरावीक एका सेटवर घडतो आहे, हे सारखे प्रेक्षकांना पाहताना जाणवत राहते. रणविजय सिंग आणि अर्जुन यांचा पाणबुडीच्या डेकवरून समोर पसरलेल्या समुद्राचा वेध घेणाऱ्या फ्रेमपासून ते पाणबुडीत शिरलेले पाणी, ‘गाझी’ने भारतीय मालवाहू जहाज नष्ट केल्यानंतर पाण्यात बुडणाऱ्यांना वाचवण्याचा अर्जुनचा प्रयत्न या गोष्टींसाठी व्हीएफएक्सचा केलेला वापर सहज लक्षात येतो. त्यामुळे कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी चांगली जमली असूनही त्याचा प्रभाव मर्यादित होतो. पाणबुडीचा सेट प्रभावीपणे उभा राहिला असला तरी त्यातला तोकडेपणा प्रेक्षकांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. शिवाय, शेवटच्या प्रसंगात सैनिकांचे ‘जन गण मन’ म्हणण्यासारख्या ठोकळेबाज प्रसंगांच्या पेरणीमुळे चित्रपटाला असलेला वास्तवाचा आधार खोटा वाटतो. रेफ्युजी म्हणून पाणबुडीवर आलेल्या तापसी पन्नू आणि छोटय़ा मुलीच्या व्यक्तिरेखेलाही फारसा अर्थ नाही. त्यामुळे एक चांगल्या युद्धनीतीचे दर्शन घडवण्याची संधी असलेला ‘द गाझी अ‍ॅटॅक’ त्याच्या ‘चित्र’नीतीमुळे थोडासा फसला आहे.

द गाझी अ‍ॅटॅक

दिग्दर्शक – संकल्प रेड्डी

कलाकार – राणा डुग्गुबाती, के. के. मेनन, अतुल कुलकर्णी, ओम पुरी, तापसी पन्नू.