मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या ‘पॅडमॅन’ चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खिलाडी कुमार आणि त्याची संपूर्ण टीम विविध मार्गांचा अवलंब करतेय. यातच एक नवी शक्कल लढवत त्याने प्रसिद्ध यु ट्यूब व्लॉगर अरण्या जौहर हिच्या साथीने ‘ब्लीडिंग रानी’ ही कविता सादर केली.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्याने ही कविता सादर केली. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यापासून ते मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मुलींवर कशा प्रकारे विविध नियमांच्या रुपात निर्बंध लावण्यात येतात यावरसुद्धा या कवितेतून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. कवितेतील प्रत्येक शब्दामागे बरेच अर्थ आणि असंख्य महिलांचा आवाज दडल्याची अनुभूती होते. पण, ‘आज कर्फ्यू लगा बाजार में मेघा को पिरियड्स आए स्कूलिंग गई भाडमे’, ही ओळ आजही आपली विचारसरणी किती खालावली आहे याचा विचार करायला भाग पाडते.

महिला एक असं समीकरण आहे जे अनेकांना कळलं नाही, कळणारही नाही. पण, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्नही केला जात नाही ही खंतसुद्धा कवितेतून व्यक्त केल्याची चाहूल लागते. पाळी आली का, डाग लागला तर.. अशाप्रकारे अनेकजणींना कोणकोणत्या प्रश्नांचा सामना करावा लागतो हेसुद्धा कवितेतून मांडण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अवघ्या काही क्षणांमध्येच व्हायरल झाला असून त्याला अनेकांनी शेअरही केला आहे. त्यामुळे एका अर्थी अक्षयने मासिक पाळीच्या अनुषंगाने सुरु केलेला हा उपक्रम यशस्वी होताना दिसतोय हेच खरे.