सध्या चित्रपटसृष्टीत स्टार किड्सचीच सर्वाधिक चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये आता नवीन पिढी हळूहळू पाऊल टाकत आहे. श्रीदेवी- बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी, सैफ अली खान – अमृता सिंगची मुलगी सारा अली खान, शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर हे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले असून, चंकी पांडेची मुलगी अनन्या, शाहरुखची मुलगी सुहाना आणि यांसह अनेक सेलिब्रिटींची मुलं लवकरच आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतील. बॉलिवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटसृष्टीतही स्टार किड्सची हवा पाहायला मिळतेय. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनी, लक्ष्मीकांत – प्रिया बेर्डेंचा मुलगा अभिनय यांनीही रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण केले. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटी किडचे नाव जोडले जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय.

वाचा : ‘शर्मा’मुळे दोन्ही लग्नांच्या रिसेप्शनमध्ये झाला गोंधळ?

मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा अगदी लहानपणापासूनच चित्रपट जगला आहे. सुरुवातीपासूनच तो चित्रपटाच्या वातावरणात वावरला आहे. रंगभूमी आणि चित्रपटामध्ये पदवी घेतलेल्या विराजसने मोठं झाल्यावर याच क्षेत्रात करियर करणे स्वभाविकच होते. प्रख्यात दिग्दर्शक अजय नाईक यांच्या ‘हॉस्टेल डेज’ने तो चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, अक्षय टाकसाळे आणि संजय जाधव यांच्याही भूमिका असून, हॉस्टेल डेज येत्या १२ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

वाचा : विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये रणबीर-कतरिनाची टक्कर होते तेव्हा..

संहिता लेखन आणि पडदा लेखनामध्ये विराजसने प्रशिक्षण घेतले असून या दोन्ही बाबतीत तो नवीन प्रकल्प स्वीकारताना काळजी घेतो. २२ वर्षांच्या विराजसने अभिनयाचा वारसा आपल्या आईकडून घेतला आहे. तो अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही करतो. ‘रमा माधव’ या मृणाल कुलकर्णी यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणात त्याने आपल्या आईसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. मृणाल कुलकर्णी अभिमानाने म्हणतात, ‘तांत्रिकदृष्ट्या पहिले तर तो माझ्याआधीच स्वतंत्र दिग्दर्शक झाला होता. मी ‘रमा माधव’ काढण्यापूर्वीच त्याने ‘अनाथेमा’ या त्याच्या पहिल्या नाटकाचे दिग्दर्शन केले होते आणि त्यात अभिनयही केला होता. मला आनंद आहे की त्याने त्याच्या कारकीर्दीचा निर्णय स्वतः घेतला. त्याने यात यश मिळवावे अशी माझी इच्छा आहे.’

विराजस त्याच्या कामाबद्दल नेहमीच आपल्या आईसोबत चर्चा करतो. चित्रपट स्वीकारल्यानंतर त्याबद्दल मी माझ्या आईशी चर्चा केली. तिने मला काही महत्त्वाच्या गोष्टींचा कानमंत्र दिला. तिचा अनुभव आणि चित्रपटाविषयी असलेले तिचे ज्ञान यांच्या आधारे निर्णय घेतल्याने आता मी चूक करू शकत नाही, असेही विराजस म्हणाला.

https://www.instagram.com/p/BcrP1iOlYOm/

https://www.instagram.com/p/BcwUWESlg6x/

https://www.instagram.com/p/BbnFwvpFBGj/

https://www.instagram.com/p/Ba0nIRWlsYT/

https://www.instagram.com/p/BZnnErGlFtK/