चित्रपटावरून प्रेरित असलेला नाटय़ आविष्कार; फिरोझ खान यांचे दिग्दर्शन

‘जब प्यार किया तो डरना क्या..’ म्हणत काळजाचा ठाव घेणारी अनारकली म्हणजेच मधुबाला आणि अभिनयाचा बेताज बादशहा अशी ज्यांची ओळख त्या दिलीपकुमार यांनी साकारलेला सलीम यांच्या प्रेमाचा भव्यदिव्य रुपेरी आविष्कार ‘मुघल-ए-आझम’ची मोहिनी आजही चित्रपट रसिकांवर कायम आहे. के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाला होता. आज ५६ वर्षे झाली तरी या चित्रपटाची जादू कायम आहे. भव्य सेट्स, महागडे पोशाख, अफलातून दिग्दर्शन, तितकाच देखणा अभिनय, श्रवणीय संगीत अशा सगळ्याच बाजूंवर सर्वोत्तम ठरलेल्या या चित्रपटाचा रंगमंचीय आविष्कार शुक्रवारी एनसीपीएत पाहायला मिळणार आहे.

नाटकांवरून प्रेरित होऊन अनेक चित्रपट जन्माला आले आहेत मात्र चित्रपटावरून प्रेरित होऊन रंगमंचावर आलेला हा पहिलाच आविष्कार म्हणता येईल. के. असिफ  यांच्या अभिजात ‘मुघल-ए-आझम’ची निर्मिती शापुरजी पालनजी यांनी केली होती. आज इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा सलीम-अनारकलीच्या याच प्रेमाची जादू तितक्याच प्रभावीपणे रंगमंचावर उतरवण्याचा ध्यास ‘शापुरजी पालनजी अँड कंपनी’ने घेतला आहे. एनसीपीएच्या सहकार्याने ‘मुघल-ए-आझम’चा रंगमंचीय आविष्कार पाहायला मिळणार आहे. ‘मुघल-ए-आझम’ ही आमच्यासाठी नेहमीच एक अमर कलाकृती राहिली आहे. सलीम-अनारकलीच्या प्रेमाची कथा रंगभूमीवर आणण्यामागे चित्रपटातला भव्यपणा आणि नाटकाचा आत्मा या दोन गोष्टींतून ही कलाकृती साकार करावी हा उद्देश असल्याचे ‘शापुरजी पालनजी अँड कंपनी’चे दीपेश सलगिया यांनी सांगितले. मुघल-ए-आझमच्या कथेतच भव्यपणा असल्याने रंगभूमीवर नाटय़स्वरूपात आणताना प्रसिद्ध ब्रॉडवे तंत्रज्ञांची मदत घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. नाटकाच्या दिग्दर्शनाची धुराही प्रसिद्ध नाटय़-चित्रपट दिग्दर्शक फिरोझ अब्बास खान यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

आज पहिला प्रयोग

‘मुघल-ए-आझम’ या नाटकासाठी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी मुघल काळाला साजेलशी वस्त्रप्रावरणे निर्माण केली आहेत. चित्रपटाला नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर गाण्यांची साथ लाभली होती. नाटकासाठीही लाइव्ह संगीताचा वापर करण्यात आला आहे. रंगमंचावर हा भव्यदिव्य नेत्रदीपक प्रेमसोहळा साकारण्यासाठी ‘टोनी अ‍ॅवॉर्ड’ नामांकित लाइट डिझायनर जॉन नुरान, सीनिक डिझायनर नील पटेल, कोरिओग्राफर आणि प्रसिद्ध साऊंड डिझायनर रिचर्ड नॉवेल यांची मदत घेण्यात आली असून नाटकाचा प्रीमिअर २१ ऑक्टोबरला एनसीपीए येथे होणार आहे.