मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये भूमिका साकारल्यामुळे मुक्ताला लोकप्रियता मिळाली होती. तिने ‘घडलंय बिघडलंय’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेसाठी निवड कशी झाली हे मुक्ताने लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादामध्ये सांगितले.

घडलंय बिघडलंयने माझा पाया तयार केला. या मालिकेसाठी माझी निवड गंमतीशीरपणे झाली होती. मी माझ्या आईसोबत सोलापूरला गेले होते. असच कुठल्यातरी नाटकाचे प्रयोग थांबले, तेव्हा करायला काही नव्हते म्हणून अगदीच घाबरले होते. मी एका लो फेजमध्ये होते. तेव्हा माझी आई मला तिचं बालपण कुठे गेलं हे दाखवण्यासाठी सोलापूरला घेऊन गेली होती. तेव्हा मोबाईल वैगरे फार लोकांकडे नव्हते असे मुक्ता म्हणाली.

मी घरी बाबांना जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी इंडियन मॅजिका नावाच्या एका कंपनीतून तुझ्यासाठी फोन आला होता आणि ते एका शो साठी ऑडिशन घेत आहेत असं मला सांगितलं. त्यांनी एक नंबर दिला. त्यावर मला फोन करायला सांगितला. मी सोलापूरच्या एसटीडी बूतमध्ये जाऊन त्यांना फोन लावला. त्यावेळी त्यांनी मला गाणं म्हणता येतं का असं विचारलं होतं. मला वाटलं होतं गाण्याचा शो आहे. त्यांनी मला फोनवर गाणं म्हणण्यास सांगितलं होतं. तेव्हा मी एक भयानक गाणं गायलं. ते म्हणाले वा मस्त! तुला मी काम देतोय आणि माझं कास्टिंग झालं असे तिने पुढे म्हटले.

मुक्ता जवळपास गेली २० वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिने सुरुवातीला अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. तिने पुण्यातील ललित कला केंद्रामधून नाटकाचे धडे घेतले आहेत.